Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 23 August, 2009

गणेशाच्या स्वागताला तमाम गोवेकर सज्ज


किशोर के.नाईक गांवकर

पणजी, दि. २२ - उद्या रविवार २३ ऑगस्ट, भाद्रपद शुद्ध तृतीया; अर्थात गणेश चतुर्थीचा उत्सव. समस्त हिंदूंचे लाडके व आराध्यदैवत श्रीगणेशाच्या स्वागतासाठी गोमंतकीय जनता सज्ज झाली आहे. श्रीगणेश ही सुखाची पखरण करणारी आणि व दुःखाचा विनाश करणारी देवता. त्यामुळे दिवसेंदिवस महागाई आणि स्वाईन फ्लूसारखी संकटे ओढवत असताना त्यांचे निवारण करणारा गणराय आपल्या घरी येणार या कल्पनेनेच लोकांत आगळेचैतन्य पसरले आहे. यंदा श्री गणेशाचे केवळ स्वागत नव्हे तर जनतेकडून विघ्नहर्त्याचा धावाच केला जात आहे.
उत्सव किंवा सणाच्या बाबतीत गोमंतकीय कधीच मागे राहात नाही. त्यात गणेशोत्सव हा तर हिंदूंचा महत्त्वाचा सण. साहजिकच त्याच्या तयारीला सर्वत्र उधाण आले आहे. विविध भागांतील बाजारपेठा खचाखच भरल्या असून आर्थिक चणचण भासत असतानाही लोकांच्या खरेदीला उत्साह दिसतो. केवढेही आर्थिक संकट असले तरी उत्सवाची मजा कमी करणे किंवा हात राखून सण साजरा करणे गोमंतकीयाला कधीच जमले नाही.एकवेळ पैसे नसले तरी कर्ज काढील; पण सण साजरा करण्यात गोमंतकीय कधीच मागे राहणार नाही.यंदाची परिस्थिती अनेक दृष्टीने काहीशी चिंतनीय व उत्साहावर विरजण आणणारी ठरली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत.जागतिक मंदीमुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. गेल्या वर्षभरात खाजगी क्षेत्रातील अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड ओढवली आहे.बाजारात विविध वस्तूंच्या किमती अव्वाच्या सव्वा दरात विकल्या जात आहेत. सणाच्या वेळी काटकसर करणेही शक्य नाही, त्यामुळे यंदा बाजार खरेदीवेळी मात्र अनेकांचे नियोजन पूर्णपणे ढासळले आहे हे मात्र नक्की.
परदेशातून भारतात आगमन झालेल्या "स्वाईन फ्लू'च्या साथीने तर सर्वत्रच भीतीचे सावट पसरले आहे.गोव्यात अद्याप या साथीमुळे अधिकृतरीत्या कोणीही दगावलेला नाही. ही साथ रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. गोव्यात या साथीचा जोर काही प्रमाणात कमी झाला असे आढळल्याने सरकारी यंत्रणाही ढिली पडली आहे.यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने "गर्दी टाळा'असा मंत्र वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. त्याचे लोकांनी प्रामाणिकपणे पालन करावे .सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा उत्सवाच्या लोकप्रियतेला काही प्रमाणात आवर घालावा व या साथीचा प्रसार होणार नाही याची दक्षता घ्यावी,असे आवाहन सरकारनेही केले आहे.
चतुर्थीनिमित्त मुंबई, पुणे आदी ठिकाणांहून हजारो गोमंतकीय आपल्या मूळ घरी येतात. सध्या मुंबई, पुणे येथे या साथीचे थैमान सुरूच असल्याने लोकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. स्वाईन फ्लू या रोगाची प्राथमिक लक्षणे ही सर्दी,खोकला,डोकेदुखी, ताप अशी असल्याने त्याकडे कानाडोळा करून अजिबात चालणार नाही.अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन तपासणी करून घेणेच सुरक्षित ठरणार आहे.चतुर्थीच्या या सणानिमित्ताने लोक एकत्र येतात त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त चर्चा करून या साथीबाबत एकमेकांना सावध करणे उचित ठरणार आहे.
गोव्यात घरोघरी श्रीगणेशमुर्तीचे पूजन केले जाते. हा उत्सव दीड, पाच, सात,नऊ,अकरा व एकवीस दिवस असा साजरा केला जातो. विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी भरघोस कार्यक्रमांची घोषणा केली आहे.धार्मिक उत्सव साजरा करताना भीती बाळगण्याची मानसिकता आपल्या भारतीय जनतेत नाही, त्यामुळे या उत्सवावर मोठा परिणाम होणार नाही, हे जरी बरोबर असले तरी केवळ भावनिक पातळीवर या संकटाचा विचार करणे योग्य नाही. स्वाइल फ्लू ही साथ आहे व एकमेकांच्या संपर्काने ही साथ झपाट्याने पसरू शकते त्यामुळे " देव बघून घेईल' असा विचार करून वागणे धोकादायक ठरू शकते.देव रक्षण करीलच; परंतु आपण जर स्वतःहून संकट ओढवून घेतले तर देवही काही करू शकणार नाही, याचे भान ठेवावे लागेल.
गोव्यातील विद्यमान सरकारने आपली विश्वासार्हता पूर्णपणे गमावली आहे त्यामुळे आता विविध संकटांत सापडलेले लोक आपापल्या दैवतांचा धावा करू लागले आहेत.जनतेचे प्रश्न सोडवण्याचे सोडून आपली नेतेमंडळी केवळ आपसातच झगडत आहेत. प्रशासकीय कारभार पूर्णपणे कोलमडला आहे. सर्वसामान्य जनता विविध प्रश्नांनी ग्रासली आहे व सरकारकडून त्यांना कोणताही आधार मिळत नाही,अशीच परिस्थिती बनली आहे. सरकारी पातळीवर सहाव्या वेतन आयोगाच्या निमित्ताने "खुशी' असली तरी खाजगी पातळीवर मात्र नेमके वेगळे चित्र आहे व तिथे "गम' च जास्त आहे.
या परिस्थितीतून केवळ देवच आपले रक्षण करू शकेल,अशीच भावना लोकांची बनली आहे. धारगळ येथील नियोजित क्रीडानगरीच्या नावाखाली येथील शेतकऱ्यांची शेतजमीन व बागायती संपादन करून त्यांना आपल्या भूमिपासून वेगळे करू पाहणाऱ्या सरकारच्या कृतीविरोधात या लोकांनी या जमिनीचा राखणदार श्री देव बांदेश्वराचा धावा केला आहे. ब्रह्मकमळी या निसर्गाने नटलेल्या गावात खाण सुरू करण्याचा बेत असल्याने हे संकट दूर करण्यासाठी या लोकांनी चक्क श्री ब्रह्मदेवालाच साकडे घातले. आता तर संकटमोचन करणारे व दुःखहरण करणारे गजाननच सर्वांच्या घरात प्रवेश करणार आहेत, त्यामुळे सर्वच बाजूने हैराण झालेले लोक संकटमुक्तीसाठी गणरायाकडे प्रार्थना करणार आहेत. साहजिकच " गणा धाव रे, मला पाव रे' या गजरानेच ही चतुर्थी साजरी केली जाईल यात शंका नाही..

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys