Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 29 August, 2009

सांत इस्तेव्हवासीयांनी रेती वाहतूक रोखली

रस्त्यावर रेतीची साठवणूक
माशेल, दि. २८ (प्रतिनिधी): आखाडा येथून रेतीची वाहतूक करणारे सुमारे ७० ट्रक आज जुवे सांत इस्तेव्ह येथील नागरिकांनी सकाळी ८ वाजल्यापासून अडवल्याने दुपारी १२.३० पर्यंत सांत इस्तेव्ह - आखाडा येथील अरुंद रस्त्यावरील बसवाहतूक बंद पडली होती. जुवे सांत इस्तेव्ह येथील सुमारे ५०० नागरिक तसेच जवळपासच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सकाळी ८ वाजल्यापासून ट्रकवाहतूक अडवली होती. यावेळी उपस्थितांच्या हातात "आमचा पूल वाचवा', "पर्यावरण राखा' अशा घोषणा लिहिलेले फलक होते. सांत इस्तेव्ह सरपंच वैजयंती तारी, उपसरपंच ओर्लांद मिनेझीस, पंचसदस्य अजय तारी, इरास्मो मागालाज, नोलास्को मिनेझीस आदी उपस्थित होते.
नार्वे तसेच आखाडा परिसरातील सुमारे २० होडीधारकांनी नदीतून काढलेली आखाडा येथील बसथांब्याजवळ तसेच इतर ठिकाणी बेकायदा साठवणूक केली जाते. कारवारहून रेतीची वाहतूक ठप्प असल्याने दर दिवशी सुमारे १५० ते २०० ट्रक या भागातून वाहतूक करतात. जुवेच्या पुलापासून आखाड्यावर जाणारा रस्ता अरुंद असून रस्त्याच्या दुतर्फा घरेही आहेत. सकाळी ६ ते रात्री ८ दरम्यान होणाऱ्या या वाहतुकीदरम्यान कर्कश अशा हॉर्नच्या आवाजामुळे तसेच वाऱ्यासोबत उडून येणाऱ्या रेतीच्या कणांमुळे रहिवाशांना प्रदूषणातला सामोरे जावे लागत आहे. अरुंद रस्त्यामुळे पादचाऱ्यांना येथून चालणे कठीण बनले असून रेती रस्त्यावर सांडल्याने दुचाकीस्वारांनाही अपघातांना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय जुवे येथील माशेल - सांत इस्तेव्हला जोडणारा पूल मोडकळीस आलेला आहे. अवजड वाहतुकीमुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे.
उपजिल्हाधिकारी साबाजी शेट्ये यांनी दुपारी १२ वाजता घटनास्थळाला भेट देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. सरपंच सौ. तारी आणि उपसरपंच श्री. मिनेझीस यांनी नागरिकांतर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले. रेती काढणाऱ्यांना आमचा विरोध नसून येथून होणाऱ्या रेतीच्या वाहतुकीला असल्याचे नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले. सदर निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून आजच्या घटनेची माहिती त्यांना देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडे हा विषय मांडून येत्या काही दिवसांत याबद्दल निर्णय घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर जमलेल्या नागरिकांतर्फे ट्रकमालकांना तसेच वाहनचालकांना जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय येईपर्यंत वाहतूक करू दिली जाणार नसल्याचे नागरिकांतर्फे स्पष्ट करण्यात आले. जबरदस्तीने वाहतूक केल्यास त्याचं गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला.
यावेळी वाहतूक खात्याचे अधिकाऱ्यांनी वाहनचालकांचे परवाने तसेच वाहनांची कागदपत्रे आदींची तपासणी केली. रस्त्यावर रेती साठवून ठेवण्यासंदर्भात संबंधित मालकांकडून परवाने मिळालेले नसल्याचे यावेळी उघडकीस आले. आखाडा येथे साठवण्यात येणाऱ्या रेतीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे यावेळी बसचालकांनी सांगितले.
यावेळी जुने गोवे पोलिस निरीक्षक गुरुदास गावडे, उपनिरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. स्थानिक आमदार पांडुरंग मडकईकर यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली.

No comments: