Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 26 August, 2009

प्रसन्न आचार्य यांच्याकडे
मडगाव पालिकेचे शिवधनुष्य!

(प्रतिनिधी): सत्ताधारी गटातील रोषास पात्र ठरलेले मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत तावडे यांना अखेर त्या पदावरून हटविताना सरकारने दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रसन्न आचार्य यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त ताबा दिलेला आहे. उद्या बुधवारी ते या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. मात्र सत्ताधारी गटाला संतुष्ट करण्याच्या प्रयत्नात सरकार पणजी महापालिकेतील संजीत रॉड्रिक्सप्रमाणे मडगावातही एका कार्यक्षम अधिकाऱ्याला बळीचा बकरा तर बनवत नाही ना? असा सवाल अनेकांकडून केला जात आहे.
मुख्यमंत्र्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या मडगाव नगरपालिकेत गेल्या वर्षी सत्ताबदल करून कॉंग्रेसप्रणीत मंडळ सत्तारूढ झाले. परंतु, सत्तेवर आरूढ होऊनही मूळ धरण्यास अपयश आलेल्या मंडळाने सत्तांतर झाल्यापासून तावडे यांची बदली करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पण, कोणताच अधिकारी येथे येण्यास तयार नव्हता, असे सांगितले जात होते.
नंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तावडे यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी तर एल्विस गोम्स यांची पालिका मुख्याधिकारी म्हणून बदली करण्यात आली. प्रत्यक्षात बदलीचे आदेश निघाले तेव्हा गोम्स हे सुट्टीवर विदेशात होते, आदेश मिळताच त्यांनी आपली रजा वाढवली आणि पदावर रुजू झालेच नाहीत. यामुळे मुख्याधिकारीपदी म्हणून तावडे यांनीच काम पाहिले. तावडे हे भाजप धार्जिणे, कर्मचाऱ्यांबाबत मवाळ धोरण स्वीकारणारे असे आरोप सत्ताधाऱ्यांकडून वारंवार होत होते. मागे एकदा पालिका प्रशासन संचालकांच्या परवानगी शिवाय कामावर घेण्यात आलेल्या ३५ कामगारांना वेतन देण्याबाबतच्या प्रश्र्नावरून तर तावडे हे सत्ताधाऱ्यांचे विशेष लक्ष्य झाले होते. पण ही टीका झेलूनही त्यांनी कोणाशीच व्यक्तिशः आकस येऊ दिला नव्हता. सर्वांशी ते साधेपणानेच वागत आले होते.
या पार्श्र्वभूमीवर त्या पदी आलेल्या आचार्य यांना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची कसरत करावी लागणार आहे. सरकारला कोणत्याही परिस्थितीत ही पालिका आपल्या हातात ठेवणे अपरिहार्य आहे. विरोधी नगरसेवकांप्रमाणेच सत्ताधाऱ्यांकडूनही मंडळावर कामे वेगाने होत नसल्याचे आरोप होत आहेत. न्यायालयासमोर असलेली अनेक प्रकरणे, सोनसोडो येथे होऊ घातलेला नवा कायमस्वरूपी कचरा प्रक्रिया प्रकल्प व त्याबाबत विविध थरांतून घेतल्या जाणाऱ्या शंका, पालिका कर्मचारी व मंडळ यांच्यात असलेला बेबनाव, काही सत्ताधारी नगरसेवकात असलेली महत्त्वाकांक्षा या सर्व बाबी लक्षात घेऊनच आचार्य यांना पुढे जावे लागणार आहे. एक प्रकारे त्यांच्यासाठी ते शिवधनुष्य ठरेल असे मानले जात आहे.
आचार्य एक निर्णय कठोर अधिकारी म्हणून ओळखले जातात, सरकारने निवडक तरुण अधिकाऱ्यांना एम.बी.ए.साठी पाठविलेले असून त्यात आचार्य यांचाही समावेश होतो. मडगाव पालिकेची विस्कटलेली घडी बसविण्यात तेथे मिळालेल्या अनुभवाचा कितपत उपयोग होतो यावरच बरेच काही अवलंबून राहणार आहे.
गेल्या चार वर्षांत ९ ते १० वरिष्ठ अधिकारी या पदावर आले व त्यात तावडे हे एकटेच तीनदा येऊन गेले. कोणीही वरिष्ठ अधिकारी येथे न येण्याचे मुख्य कारण येथील राजकीय हस्तक्षेप हेच असल्याचे सांगितले जाते. गेल्या वर्षी सत्ताधारी नगरसेवकांनी मुख्यमंत्र्याकडे जाऊन तावडे यांना हटविण्याची मागणी केली तेव्हा दुसरा कोणीच अधिकारी येथे येण्यास तयार नसल्याचे दिसून आल्याने सरकारची विचित्र कोंडी झाली होती व तावडे हे येथेच राहिले होते.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पालिकेतील एका कारकुनावर शिस्तभंग कारवाई करण्याची सूचना नगराध्यक्षांनी करूनही तावडे यांनी ती कारवाई केली नाही व त्यामुळे संतप्त नगराध्यक्षांनी केलेल्या तक्रारीनंतर तावडे यांना हटविले गेले.

No comments: