Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 29 August, 2009

कालेचे माजी सरपंच बार्रेटो यांचे निधन

कुडचडे, दि. २८ (प्रतिनिधी): कालेचे माजी सरपंच आन्सेंटो बार्रेटो (६९) यांचे आज संध्याकाळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. येथील रेल्वे स्थानकावर आज सकाळी रेल्वेखाली सापडून त्यांच्या पायाचा जबर दुखापत झाल्याने त्यांना जखमी अवस्थेत इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी ८.१५ च्या सुमारास बार्रेटो काले येथे जाण्यासाठी वास्को कुळे ट्रेनची वाट पाहत होते. यादरम्यान स्टेशनवर आलेल्या अमरावती एक्सप्रेसला लोकल गाडी समजून ते आत शिरले. गाडी सुरू झाल्यानंतर त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने चालत्या गाडीतून खाली उतरण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला व डावा पाय रेल्वेच्या खाली आला. या अपघातात त्यांच्या पायाचा चुराडा झाला व बरेच रक्तही वाहून गेले. तत्काळ १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना सर्वप्रथम हॉस्पिसियो व नंतर गोमेकॉत दाखल करण्यात आले. इस्पितळात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.
काले येथून आज सकाळी कुळे - वास्को ट्रेनमधून ते आपल्या धाकट्या मुलीसह कुडचडे येथे आले होते. यादरम्यान दोघांनी कुडचडे येथील हॉटेलमध्ये चहा घेतला व शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलीला बसमधून निरोप दिला. सकाळी ८.३० च्या ट्रेनमधून ते घरी परतणार होते. काले पंचायतीमध्ये बार्रेटो तीनवेळा निवडून आले होते. दोन वेळा त्यांनी सरपंचपदही भूषवले होते. याशिवाय काले येथील अवर लेडी ऑफ फातिमा चर्चमध्ये अनेक वर्षे अध्यक्षपद व सध्या सदस्य म्हणून ते कार्यरत होते. ज्ञान संपादन करताना गरजूंना मदतीचा हात देणारे बार्रेटो मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून सुपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुली व १ मुलगा असा परिवार आहे, पैकी ज्यो हा त्यांचा मुलगा विदेशात बोटीवर कामाला आहे. गोमेकॉत त्यांच्या मृतदेहावर उद्या उत्तरीय तपासणी करण्यात येणार असून रविवारी काले येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. बार्रेटो यांच्या निधनाने काले परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी वास्को रेल्वे पोलिस उपनिरीक्षक आनंद देसाई अधिक तपास करत आहेत.

No comments: