Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 27 August, 2009

मासेवाहू ट्रक अडवून नासधूस

चिंचीणी येथील घटना
अडीच लाखांचे नुकसान
वास्कोतील विक्रेते भयभीत


वास्को, दि. २६ (प्रतिनिधी)- खारीवाडा मच्छीमार जेटीवरुन मासे घेऊन निघालेला ट्रक "कुटबण बोट ओनर्स डेव्हलपमेंट युनियन'च्या काही सदस्यांनी चिंचीणी येथे अडवून आतील मालावर फिनाईल व ऍसिड ओतले. यामुळे "डब्ल्यूएफके' या आस्थापनाचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. काल रात्री वास्कोहून मासे घेऊन निघालेल्या ट्रकला काही जणांनी चिंचीणी येथे अडवून टायर "पंक्चर' करून आतील माल खराब केल्याच्या वृत्ताला कुंकळ्ळी पोलिस स्थानकाचे निरीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी दुजोरा दिला. येथून मासे घेऊन जाऊ नका, अशी धमकी ट्रक चालकाला दिल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकाराचा तीव्र निषेध करताना बेकायदा कृती करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी "गोवा फिशींग बोट ओनर्स असोसिएशन'च्या सदस्यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. आज सकाळी खारीवाडा वास्को येथील मच्छीमार जेटीवर असलेल्या "गोवा फिशींग बोट ओनर्स असोसिएशन'च्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी संघटनेचे अध्यक्ष सायमन परेरा यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, काल रात्री १२ च्या सुमारास खारीवाडा येथून सुमारे साडेसहा टन मासे घेऊन निघालेला ट्रक (क्रः केए २० बी ८१८५) चिंचीणी येथे पोचला असता तो "कुटबण बोट ओनर्स डेव्हलपमेंट युनियन'च्या काही सदस्यांनी अडवून चालकाला मारहाण केली. यानंतर ट्रकमध्ये असलेल्या मालावर केरोसीन, फिनाईल तसेच ऍसिड घालून तो खराब केला. त्याच प्रमाणे त्यांनी यावेळी सदर ट्रकाच्या चाकांची हवा काढल्याची माहिती परेरा यांनी यावेळी दिली. अशा प्रकारे त्यांनी अडीच लाख किमतीचा "डब्ल्यूएफके' या व्यवस्थापनाचा माल खराब केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. खारीवाडा येथील मच्छीमार जेटी स्थानिक सदस्यांचे ट्रॉलर (सुमारे ३००) उभे करण्यास अपुरी पडत असल्याचे परेरा यांनी सांगितले. या कारणामुळे त्यांनी कुटबणच्या सदस्यांना येथे त्यांचे ट्रॉलर उभे करण्यास बंदी आणल्याने त्यांनी अशा प्रकारची बेकायदा कृती केल्याची माहिती यावेळी दिली. काल रात्री घडलेल्या घटनेनंतर येथून मासे घेऊन निघालेल्या इतर ट्रकांना पोलिस सुरक्षा पुरवण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
आज आयोजित करण्यात आलेल्या सदर पत्रकार परिषदेच्या वेळी संघटनेचे अध्यक्ष परेरा यांच्यासह सरचिटणीस एडवीन कार्व्हालो, उपाध्यक्ष रोचा बारेटो व इतर सदस्य उपस्थित होते. दरम्यान या बाबत गोवा फिशींग बोट ओनर्स संघटनेने सदर घटनेबाबत कुंकळ्ळी पोलिस स्थानकात आपली तक्रार नोंद केली असून यात आंतोनियो रॉड्रिगीस, पॅट्रीक डिसिल्वा, मिंगेल रॉड्रिगीस, विनय तारी, शिवानंद लोटलीकर, जुलियस डिकॉस्ता, सेबी डिसिल्वा, बेंजामिन डिसिल्वा, रोझारीयो डायस, कॅप्रियानो कार्दोजो, थॉमस रॉड्रिगीस, गास्पर फर्नांडिस, अंतुश फर्नांडिस व पीटर रॉड्रिगीस कुटबण बोट ओनर्सच्या सदस्यांचा हात असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, काल रात्री सुमारे १० ते १५ अज्ञात व्यक्तींनी एक बाटली केरोसीन मालावर ओतल्याचे आल्बुकर्क यांनी सांगितले. सदर घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगून ही बेकायदा कृती केलेल्यांवर योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

No comments: