Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 29 August, 2009

'स्वाईन फ्लू' : शाळांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): चतुर्थीच्या सुट्टीनंतर येत्या दोन दिवसांत म्हणजे ३१ ऑगस्टपासून शाळा सुरू होत असल्याने "स्वाईन फ्ल्यू'विषयी विद्यालयांत शिक्षकांनी काळजी घेण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यातर्फे नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
या नियमावलीनुसार शाळा व्यवस्थापनाने स्वाईन फ्ल्यूचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच दि. ३१ रोजी विद्यार्थी शाळेत येताच वर्गशिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष पुरवून जर एखाद्या विद्यार्थ्यामध्ये फ्ल्यूसदृश लक्षणे दिसत असतील (उदा. ताप, सर्दी-खोकला, घशाचे दुखणे, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या आदी) तर त्यास त्वरित वैद्यकीय उपचार उपलब्ध करावेत. त्याच्या पालकांना सूचित करून सदर विद्यार्थ्याला त्वरित घरी पाठवावे. त्याला सक्तीची ७ दिवसांची सुट्टी देऊन, त्याच्यावर उपचार करण्यात यावेत. त्याला डॉक्टरी सल्ल्यानुसार उपचार दिले जावेत याबाबत पालकांना पत्राद्वारे कळवून पालकांनीही आपल्या पाल्याची संपूर्ण काळजी घ्यावी. फ्लूसदृश लक्षणे आढळली तर त्यास योग्य उपचार देतानाच त्याचा परिणाम कुटुंबातील वा आसपासच्या इतर कोणावर होणार नाही याची दक्षता घेतली जावी.
फ्ल्यू असल्याचे निष्पन्न झाल्यास त्वरित आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. शाळांनी विद्यार्थ्यांना फ्ल्यूग्रस्त भागात पाठवणे कटाक्षाने टाळावे. शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या अन्य शालेय कर्मचाऱ्यांनीही वारंवार आपले हात साबणाने धुऊन स्वच्छ करावे. शाळा वा अन्य शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांनी नाक शिंकरताना वा खोकताना "टिश्यू पेपर'चा वापर करावा. विशेष करून कफाचे निस्सारण करण्यासाठी "टिश्यू पेपर'चा वापर करावा व ते एका प्लॅस्टिक पिशवीत गोळा करावेत, जेणेकरून त्यांना सहजपणे नष्ट केले जाऊ शकेल.

No comments: