Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 25 August, 2009

"त्या' रुग्णाचा मृत्यू स्वाईन फ्लूमुळे नाही

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) -बंगळूरहून काही दिवसांपूर्वी गोव्यात आलेले व येथील एका खाजगी इस्पितळात निधन पावलेल्या शिवमूर्ती (६७) या इसमाचा मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झालेला नाही, असे चाचणी अहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे.
गोव्यात अद्याप स्वाइन फ्लूच्या अधिकृत बळीची नोंद झाली नसली तरी रुग्णांच्या संख्येत मात्र लक्षणीय वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. काल पोहोचलेल्या चाचणी अहवालानुसार आणखी तीन संशयितांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने गोव्यातील स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या १९ वर पोहचली आहे. गोवा-पुणे महामार्गावरील एका खाजगी आराम बस चालकाचा त्यात समावेश आहे,अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
आरोग्य खात्याने नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एखाद्या संशयितांत स्वाईन फ्लूची प्रखर लक्षणे आढळल्यास त्यावर उपचार सुरू करण्याचे आदेश दिले आहे. गोव्यातून स्वाईन फ्लू संशयितांच्या लाळेचे नमुने पुणे येथे पाठवण्यात येतात व पुणे येथे सध्या या साथीने कहर केल्याने गोव्यातील चाचणी अहवाल वेळेत पोहचण्यास विलंब होत असल्याचे आढळून आले आहे.राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता थेट अशा संशयितांवर उपचार सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत.
धोका अजून कायम
स्वाईन फ्लूचा धोका अद्याप टळलेला नाही असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. विशेषत: थंड हवामानात याची लागण होण्याची शक्यता अधिक वाढल्याचे संघटनेच्या अधिकाऱ्यांनी कळवले आहे. थंड व पावसाळी वातावरणात या साथीचा प्रसार वाढण्याची शक्यता जादा असते, त्यामुळे भारताने विशेष काळजी घेण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. या रोगाने आत्तापर्यंत, १७९ देशांत १७९९ बळी घेतले आहेत. याखेरीज १,८२,००० व्यक्तींना याची लागण झाल्याचे प्रयोगशाळांतील चाचणीत आढळले आहे,

No comments: