Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 26 August, 2009

आधुनिक जगातील नैसर्गिक माटोळी
तब्बल ३११ वस्तूंची आरास

वाळपई, दि. २५ (प्रतिनिधी)- येथून सुमारे १५ किमी अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले साट्रे गाव. या गावात दीपक धानू गावकर व रामा गावकर हे युवक गेल्या चार वर्षांपासून अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहेत. या डोंगराळ प्रदेशात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या जंगली फळाफुलांची आरास गावकर बंधू गेल्या चार वर्षांपासून गणरायासमोरील माटोळीला बांधत आले आहेत. आणि या माटोळीला यंदा तब्बल ३११ फळे व फुले बांधण्यात आली आहेत!
निसर्गसौंदर्याने नटलेल्या या तालुक्यात विविध प्रकारची फुले, फळे तसेच कंदमुळे आहेत. परंतु, त्यांची संपूर्ण माहिती क्वचितच कोणाला आहे. उत्सवाच्या निमित्ताने या फळाफुलांची तसेच कंदमुळांची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने गावकर बंधूंनी अनोखा असा उपक्रम हाती घेतला. चार वर्षांपूर्वी म्हणजेच २००५ साली त्यांनी ७० विविध प्रकारच्या फळाफुलांनी माटोळी सजवली आणि कला अकादमीने आयोजित केलेल्या स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. या बक्षिसाने खरोखरच उत्तेजित झालेल्या गावकर बंधूंनी माटोळीला लावण्यात येणाऱ्या वस्तूंची संख्या वाढवत नेली. २००६ साली ११८ वस्तूंसह कला व संस्कृती खात्याने आयोजित केलेल्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त केले. यानंतर २००७ साली २१८ वस्तूंसह दुसरे बक्षीस व २००८ साली २९१ वस्तूंसह द्वितीय क्रमांक पटकावला. यंदा मात्र तब्बल ३११ वस्तूंसह प्रथम क्रमांकावर शिक्कामोर्तब करण्याचा दृढ निश्चय गावकर यांनी केला आहे.
अथक परिश्रमाने जमवलेल्या या फळांची मांडणी करण्यासाठी त्यांना घरच्या मंडळीकडून मोलाचे सहकार्य लाभले आहे. अनोख्या अशा या उपक्रमाने निसर्गाचे महत्त्व अधोरेखित व्हावे आणि आपल्या गावाला प्रसिद्धी मिळावी हाही त्यामागचा एक उद्देश असल्याचे गावकर कुटुंबीय सांगते.
म्हादई अभयारण्यात असलेल्या या गावातील युवा पिढीने निसर्गाप्रति दाखवलेली भावना इतरांसाठी प्रेरणादायी ठरावी, अशीच तर श्री गणरायाची इच्छा नाही ना?

No comments: