Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 23 August, 2009

"गणेशभक्त' सलमान..

मुंबई, दि. २२ - सलमान खान म्हणजे अजब रसायन. त्याचा मनोनिग्रह ठाम. एकदा एखाद्या दैवतावर त्याची श्रद्धा बसली की, तो अगदी प्राणपणाने त्याची सेवा करणार हे ठरलेलेच. एरवी सर्वधर्मसमभावाच्या गमजा अनेकजण मारतात. मात्र गणेशचतुर्थी, ईद व नाताळ हे तिन्ही सण तेवढ्याच उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरे करून सल्लूने आपले "वेगळेपण' सिद्ध केले आहे.
सध्या त्याला वेध लागले आहेत ते येत्या १८ सप्टेंबर रोजी येऊ घातलेल्या नव्या चित्रपटाचे. तथापि, यंदाची गणेशचतुर्थीही त्याला अपवाद असणार नाही. मुंबईतील वांद्रे येथे "खानदान' या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील त्याच्या आलिशान सदनिकेत उद्या (रविवारी) "गणपती बाप्पा मोरयाऽऽ' हा जयघोष दणक्यात घुमणार आहे. सलमानची पहिली आई म्हणजे विख्यात पटकथा लेखक सलीम खान यांची पहिली पत्नी सलमा या महाराष्ट्रीयन ब्राह्मण असून सलमानची दुसरी आई हेलन (चित्रसृष्टीच्या सुवर्णकाळातील विख्यात नर्तिका) या कॅथलिक आहेत. स्वतः सलमान मुस्लिम आहे. आपल्या या दोन्ही मातोश्रींवर त्याचे जीवापाड प्रेम आहे. यंदा गणेशोत्सवाच्या काळातच रमझान हा मुस्लिमांचा पवित्र सण आला आहे. सलमान खानचे कुटंबीय रोजे म्हणजेच कडक उपवास करत नाहीत. तथापि, रमझानच्या या पवित्र महिन्यात मेजवानी व बाकीच्या मौजमजेला हे कुटुंब फाटा देत आले आहे. या काळात सलमानच्या घरात खास पदार्थ तयार करून ते प्रामुख्याने अनाथालय व वृद्धाश्रमांत पाठवले जातात. सलमानचे मित्र आणि नातेवाइक याच पदार्थांचा आस्वाद घरी घेतात. सलमानच्या मातोश्री सलमा दरवर्षी गणेशाची मूर्ती घरी आणतात व गणरायाची मनोभावी पूजा केली जाते. या काळात शूटिंगमधून वेळ काढून सलमान आरत्या, गणेशवंदना आदी धार्मिक कृत्यांसाठी हटकून हजर असतोच. किंबहुना आपले ते परम कर्तव्यच आहे, ही त्याची त्यामागील धारणा. तो म्हणतो, "देव चराचरात पाहायला मिळतो, तो एकच आहे, त्याच्याकडे पोहोचण्याचे मार्ग भिन्न असू शकतात. माझे म्हणाल तर गणरायाने मला पैसा, यश, कीर्ती, मानमरताब आदी गोष्टी भरभरून दिल्या आहेत. म्हणूनच चला गणेशाचा जयघोष करूया.. बोला - गणपती बाप्पा मोरयाऽऽ'!

No comments: