Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 29 August, 2009

नंबरप्लेट प्रकरणी 'बंद'मध्ये सक्रिय सहभागाचे आवाहन

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) : खाजगी बस वाहतूक संघटनेने "हाय सिक्युरिटी नंबरप्लेट'च्या विरोधात पुकारलेल्या "बंद'मध्ये सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेश अध्यक्ष तथा खासदार श्रीपाद नाईक यांनी केले आहे.
आधीच महागाईमुळे भरडल्या गेलेल्या आम आदमीवर या महागड्या नंबर प्लेटचा बोजा एक मंत्री फक्त वैयक्तिक फायद्यासाठी लादत असल्याचे आता लपून राहिलेले नाही. त्याचप्रमाणे विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट विषयावर फेरविचार करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अधिवेशन संपताच सरकारने घाईघाईत या नंबर प्लेट लावण्याची कार्यवाही सुरू केल्याने हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचे आश्वासन आज विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी बस मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
ज्या कंपनीची भलावण वाहतूक मंत्री करीत आहेत, ती कंपनी गोवेकरांना वेळेवर नंबर प्लेट पुरवूच शकत नाही. चतुर्थीच्या मुहूर्तांवर ज्या गोवेकरांनी वाहने खरेदी केली त्यांना नंबर प्लेट नसतानाच वाहने रस्त्यावर चालवावी लागत आहेत. उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील वाहतूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढून या प्रश्नाला वाचा फोडली आहे. आता ३१ ऑगस्टच्या संपानंतर सरकारने हा जुलमी निर्णय रद्द न केल्यास भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे.

No comments: