Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 23 June, 2008

हळर्ण येथे हत्तीने घेतला बळी वनरक्षकास पाय ठेवून चिरडले

मोरजी, दि. २३ (वार्ताहर) : राज्यातील काही भागात गेले वर्षभर हत्तींनी हैदोस घालून शेती व बागायतींची मोठ्या प्रमाणात हानी केल्यानंतरही निष्क्रिय बनलेल्या सरकारच्या बेफिकिरीने आज एका उमद्या कर्मचाऱ्यास आपले प्राण गमवावे लागले. वन खात्याचे कर्मचारी राजेंद्र कृष्णा भगत यांना काल मध्यरात्री हत्तीने पायाखाली चिरडून ठार केले. त्यामुळे आठवड्याभरात वनखात्याचे दोन बळी गेले आहेत.
रविवार २२ रोजी रात्री एक वाजता हळर्ण-तळर्ण भागात बागायतीत हत्ती आल्याची माहिती वनखात्याला मिळताच वनरक्षक राजेंद्र भगत अन्य कर्मचाऱ्यांसमवेत बागायतीत गेले असता त्यांना हत्ती नदीतून येत असल्याचे दिसून आले. भगत गावात परतले व लोकांना जमवून हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी पुन्हा बागायतीत गेले. त्यावेळी तीन हत्ती नुकतेच नदीतून वर येताना लोकांनी पाहिले. जो समोर हत्ती होता त्याने आपली सोंड वर करून चीत्कार केला. त्याचे डोळे लालबुंद होते. त्याचवेळी वनरक्षकाने त्या हत्तीवर टॉर्च मारली असता तो जोरदार आवाज करीत लोकांवर चाल करून आला, त्यावेळी लोक भयभीत होऊन वाट मिळेल त्या वाटेने पळत सुटले. त्यावेळी वनरक्षक राजेंद्र भगत खाली जमिनीवर पडल्याने त्यांच्यावरून हत्ती गेला व ते तेथेच चिरडून ठार झाले.
वनरक्षक राजेंद्र भगत हे ४२ वर्षीय कर्मचारी मानसीवाडा धारगळ पेडणे येथे राहत होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ते मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यामुळे गावात त्यांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
शोकाकुल वातावरणात अंत्यविधी
वनरक्षक श्री. भगत यांच्यावर मानसीवाडा धारगळ येथे २३ रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यावेळी पंचायतमंत्री बाबू आजगावकर, माजी आमदार परशुराम कोटकर, पेडणे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मिरजकर, धारगळचे सरपंच भूषण ऊर्फ प्रदीप नाईक, कदंब महामंडळाचे संचालक दशरथ महाले, माजी सरपंच संतोष मळीक, मनोहर नाईक, रमेश मळीक, सुभाष डिचोलीकर, रामा नाईक, कालीस रॉड्रीग्स, सायमन डिकुन्हा, संतोष अमरे, दया गावस आदींनी भगत यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून दुःख व्यक्त केले.
अशी घडली दुर्घटना
हळर्ण भागात २२ रोजी हत्ती आल्याची कुणकुण वनखात्याला लागली होती, त्यानुसार त्यांच्या बंदोबस्तासाठी वनरक्षक राजेंद्र भगत यांच्या नेतृत्वाखाली इतर सहा कर्मचारी त्या भागात गेले असता त्यांना हत्ती येत असल्याचे दिसले. ग्रामस्थांना घेऊन वनकर्मचारी बागायतीत गेले. तेथे हत्ती समोरून आपल्याच दिशेने येत असल्याचे पाहताच सर्वांनी धूम ठोकली. ग्रामस्थ व कर्मचारी गावात आल्यानंतर कोणकोण बागायतीत गेले होते, त्याची चौकशी आपसात करीत होते. आपल्यापैकी सर्वजण आले की नाही, याची चौकशी करता राजेंद्र भगत आले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही वेळानंतर पुन्हा ग्रामस्थ व वनकर्मचारी हातात टॉर्च व उजेडासाठी मशाली घेऊन बागायतीत गेले असता वनरक्षक भगत जमिनीवर पालथे निपचित पडलेले दिसले. हत्तीने त्यांना पायाखाली चिरडून ठार मारले होते.
श्री. भगत यांचा मृतदेह ज्या ठिकाणी पडला होता त्या भागाचा पोलिसांनी पंचनामा केला नाही. बांबोळी येथे मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा केला नाही. बांबोळी येथे मृतदेहाचा पंचनामा केला. भगत यांचे तोंड जमिनीवर टेकून होते. तोंडातून रक्त आले होते. या घटनेची माहिती पेडणे पोलिसांना रात्री २ नंतर देण्यात आली. त्याअगोदर ग्रामस्थांनी व कर्मचाऱ्यांनी बागायतीतील मृतदेह गावात आणला होता.

वनखात्याचा दुसरा बळी
दि. १७ रोजी धारगळ येथे जो भीषण अपघात घडला होता त्या अपघातात पेडणेचे वनअधिकारी काशिनाथ शेट्ये हे जागीच ठार झाले होते. त्यानंतर सहा दिवसांच्या फरकाने २२ रोजी रात्री हळर्ण येथे हत्तीने पायाखाली चिरडून वनरक्षक राजेंद्र भगत यांना ठार केल्याने पेडणे वनखात्याचा दुसरा बळी गेला आहे. त्यामुळे खात्याला जबरदस्त धक्का लागला.

आजचे मरण उद्यावर
दि. १७ रोजी धारगळ येथे जो भीषण अपघात होऊन वनअधिकारी काशीनाथ शेट्ये मृत्युमुखी पडले, त्याच वाहनातून वनरक्षक राजेंद्र भगत जाणार होते, परंतु त्यांना काही महत्त्वाचे काम पडल्याने ते गाडीतून धारगळ येथे उतरले. म्हणूनच ते त्याचवेळी बचावले. परंतु काळाने त्यांच्यावर २२ रोजी झडप घातली.

हजारोंचे नुकसान
दि. २२ रोजी हत्तींनी जो हळर्ण बागायतीत धुमाकूळ घातला त्यात केळी, सुपाऱ्यांच्या पोफळी, कवाथे यांचे जवळजवळ १ लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात लक्ष्मण सावंत, पांडुरंग गरड, गणेश गरड, मुकुंद नारायण परब, रत्नाकांत परब, बापू परब, आना परब व भूषण परब आदींचे नुकसान केले आहे.
दरम्यान, बागायतीत हत्ती आल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांसोबत स्थानिक ग्रामस्थ रत्नाकांत परब, हौसराज परब, ज्ञानेश्वर परब, मयूर परब, मकरंद परब, प्रशांत परब, खाजू परब, अभय परब, गोपी परब, आना परब, कृष्णा परब, महेश परब, मिलिंद परब, भूषण नाईक, सुभाष परब गेले होते.
तीन हत्तींचा कळप
हळर्ण भागात २३ रोजी सकाळी साडे नऊ वाजता तीन हत्तींचा कळप ग्रामस्थांनी पाहिल्याची माहिती दिली. गेले वर्षभर हत्ती बागायतींची नासाडी करत आहे. आता मात्र माणसांचेही बळी घेण्याचे काम हत्ती करू लागल्याने न्याय कुणाकडे मागावा, अशी केविलवाणी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. आता कितीही हत्ती आले तरी त्यांना पिटाळून लावण्यासाठी आम्ही जाणार नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पर्रीकर असते तर...
राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर असते तर त्यांनी त्वरित धाव घेतली असती व शेतकऱ्यांना दिलासा दिला असता, सामान्य शेतकऱ्यांचे दुःख पर्रीकरांना माहीत होते. तेच आम्हाला न्याय देऊ शकले असते, असे मत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, या भागाचे आमदार तथा पंचायत मंत्री बाबू आजगावकर यांनी आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांची नुकसानी झाली आहे त्याची साधी विचारपूस केली नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला.
-------------------------------------------------------------
वनखात्याकडे सामग्री नाही
हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी वनखात्याने कर्मचारी व वनरक्षकाला केवळ हातबॉम्ब फटाके व टॉर्च एवढेच साहित्य देऊन मोहिमेवर पाठवले जाते. पिसाळलेल्या हत्तींनी जर असेच वनरक्षकांचे बळी घेतले तर सरकार काय करेल, असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
-------------------------------------------------------------

No comments: