Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 27 June, 2008

जातीय संघर्षामुळे मडगावात तणाव १४४ कलम लागू, पोलिसांची निष्क्रियता उघड

मडगाव, दि. २७ (प्रतिनिधी): गेल्या वर्षीप्रमाणेच एका मुलीच्या छेडछाड प्रकरणातून मडगावात आज जातीय दंगलीचा भडका उडाला व त्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे स्थिती अधिकच चिघळली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याची लक्षणे दिसू लागताच सायंकाळी ५-३० वाजता जिल्हा प्रशासनाने १४४ कलम लागू केले.
संपूर्ण दक्षिण गोव्यातील पोलिस यंत्रणा मडगावात तैनात करण्यात आलेली आहे. सायंकाळी उत्तर गोव्यातूनही जादा पोलिस कुमक मडगावात दाखल झाली. त्यापाठोपाठ पोलिस महानिरीक्षक किशनकुमार मडगावात दाखल झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघाला एखाद्या पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सर्व वरिष्ठ मुलकी व पोलिस अधिकारी मडगावात तळ ठोकून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
पोलिस अधिकारी तिघांना अटक केल्याचे सांगत असले तरी उपलब्ध माहितीनुसार २९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील बहुसंख्य बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत.
पोलिसांनी गांधी मार्केट येथे जमा झालेल्या जमावावर लाठीमार केला. यातून एका दैनिकाचा छायाचित्रकारही सुटला नाही. तसेच या गडबडीत आपली दुकाने बंद करणारे दुकानदारही सुटू शकले नाहीत. त्यामुळे दुकानदारांच्या एका शिष्टमंडळाने पोलिसांच्या या लाठीमाराचा निषेध केला. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन दंडाधिकाऱ्यांनी आदेश न देताच झालेल्या या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. त्यात व्यापारी, विविध सामाजिक संघटनांचे नेते व भाजपचे नेतेदेखील होते. ही मंडळी रात्री उशिरापर्यंत तेथेच ठाण मांडून होती.
अशी झाली सुरवात
रुमडामळ -दवर्ली येथे वास्तविक गेले अनेक दिवस हे प्रकरण खदखदत होते. काल त्याचा स्फोट होता होता टळला. एका हिंदू युवतीला मुस्मिम तरुण सतावत होता. काल ती कॉलेजमध्ये जात असताना त्या बसमध्ये शिरून त्याने तिची छेड काढली. त्यामुळे आज सदर मुलीच्या मित्राने त्या तरुणाला जाब विचारला. उभयतांत बाचाबाची झाली असता पंच निसार किल्लेदार व दामोदर वाकोडे यांनी त्यात मध्यस्थीचा प्रयत्न केला. त्यातच आज दुपारी पंच निस्सार याच्या गाडीत तो तरुण असल्याचे पाहून मंतेश रागी नामक त्या तरुणाने ती गाडी अडवली व जाब विचारला. तेव्हा पंचाने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. तथापि, संतापलेल्या मंतेशने त्याच्या गाडीवर लाथा हाणल्या. निस्सार गाडी घेऊन तसाच गेला व साधारण दीडच्या सुमारास एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी येऊन मंतेश याचे घर व त्याला टेकून असलेल्या दुकानावर हल्ला केला व नासधूस केली.
कोणी तरी हे वृत्त पोलिसांना कळवले. मंतेश हा बजरंगदलाचा कार्यकर्ता असल्याने हे प्रकरण चिघळणार हे ओळखून लगेचच पोलिस दवर्लीत दाखल झाले. त्यांनी निस्सार, दामोदर, मंतेश व तो तरुण यांना नेले. मात्र ते कोठे आहेत ते सांगण्याचे टाळले. सर्व मोक्याच्या जागी पोलिस तैनात करण्यात आले होते. बजरंग दलाचे कार्यकर्ते गटागटाने एकत्र जमून चर्चा करीत होते ते पोलिसांना पाहून पांगले व समर्थगडावर एकत्र आले. हे समजताच पोलिस सायरन वाजवत तेथे आले व त्यांनी मठाभोवती वेढा घालून त्यांची कोंडी केली. पोलिस बाहेर पडू देणार नाहीत हे ओळखून ते हळूहळू तेथून बाहेर पडले व मडगाव बाजारात येऊन त्यांनी घडलेल्या घटनेविरुद्ध "मडगाव बंद'ची हाक दिली. रुमडामळ दवर्लीतील बाजार दुपारच्या घटनेनंतर लगेच बंद झाला होता.
पोलिसांचा अतिरेक
बजरंग दल समर्थक आपल्या हातून निसटल्याचे समजताच पोलिस मडगावात धावत आले. तथापि, तोपर्यंत नवा बाजार पूर्णतः बंद झाला होता .बंदचे आवाहन करणारे पिंपळकट्टा परिसरात होते. तेथे राखीव पोलिस त्यांच्यावर तुटून पडले. त्याचीच पुनरावृत्ती गांधी मार्केटात झाली. तेथे पोलिसांनी दुकान बंद करणाऱ्या दुकानदारांना व त्याचे छायाचित्रण करणाऱ्या वृत्तपत्र छायाचित्रकारासही ठोकून काढले. घटना प्रत्यक्ष पाहाणाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांनी कोणतीही पूर्वकल्पना देता लाठीमार सुरू केला. त्यामुळे सर्वांचीच पळापळ झाली. लाठीमाराचा आदेश देण्यासाठी कोणीही दंडाधिकारी त्यावेळी उपस्थित नव्हता, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची विशेषतः महिलांची या घटनेने तारांबळ उडाली. दुपारच्या सुट्टीनंतरचा बाजार पुन्हा खुला होतो न होतो तोच हा प्रकार घडला. अफवांचे पिक पसरले. कोणतीच कल्पना नसताना धडाधड शटर्स बंद झाली. त्यामुळे भयभीत झालेल्यांना दिलासा देण्यासाठी वा मार्गदर्शन करणारा कुणीच नसल्याने प्रत्येकाने घरी पळ काढण्यास प्रारंभ केला. कार्यालयेही त्यामुळे लवकर सोडली गेल्याने सर्व बसथांबे व मोक्याच्या जागी प्रचंड गर्दी झाली. कुठे काय झाले ते कुणालाच माहीत नसल्याने सर्वत्र गोंधळचे वातावरण होते.
१४४ कलमाचा अंमल
जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक यांनी सायंकाळी साडेसहा वाजता पत्रकारांना बोलावून मडगाव परिसरात जमावबंदीचे १४४ कलम लागू केल्याची घोषणा केली. मात्र नेमके प्रकरण काय याबाबत स्पष्टीकरण ते देऊ शकले नाहीत. तसेच सादर केलेली नावे व तक्रारकर्ता कोण याचीही कोणतीच माहिती त्यांच्याकडे नव्हती. वादाचे संकेत सकाळी मिळत असताना खबरदारीचे उपाय घेण्यास विलंब का झाला, किती जणांना या प्रकरणी अटक केली गेली या बाबतची माहिती त्यांच्याकडे नव्हती .अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रसन्न आचार्य व पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई त्यांच्या बाजूला होते, पण तेही काही तपशील देऊ शकले नाहीत. सायंकाळी ७ च्या सुमारास पोलिस महानिरीक्षक किशनकुमार यांनी मडगावला भेट देऊन एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री उशीरा पोलिसांशी संपर्क साधला असता परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणाखाली असल्याचे सांगण्यात आले.

No comments: