Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 24 March, 2011

मराठी-कोकणीप्रेमी एकटवले!


धोरणबदल केल्यास सरकारी यंत्रणाच बंद पाडण्याचा इशारा

• प्राथमिक, पूर्वप्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच
• इंग्रजीच्या मागणीविरोधात राज्यस्तरावर तीव्र लढा


पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) ः विशिष्ट ‘लॉबी’च्या दबावाला बळी पडून प्राथमिक शिक्षणाच्या सध्याच्या धोरणात बदल केल्यास संपूर्ण सरकारी यंत्रणाच बंद पाडण्याचा स्पष्ट इशारा आज भारतीय भाषा सुरक्षा मंचाने दिला आहे. मंचाच्या निमंत्रक तथा माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी मंचाच्या वतीने हा इशारा दिला.
प्राथमिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी करावे या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी पणजीत झालेल्या शक्तिप्रदर्शनाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी कोकणी आणि मराठी भाषाप्रेमींनी संघटित होऊन स्थापन केलेल्या या मंचाने आज प्रादेशिक भाषांच्या रक्षणासाठी राज्यस्तरावर लढा उभारण्याचे निश्‍चित केले. सरकारच्या या धोरणाला विरोध करण्यासाठी या मंचाची आज स्थापना करण्यात आली असून दि. २५ रोजी येथील मराठा समाज सभागृहात सकाळी १० वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. यातशैक्षणिक तसेच सामाजिक संस्थांचे ५०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचेही श्रीमती काकोडकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, इंग्रजीवाद्यांच्या जाहीर सभेत भाषेविषयीचे धोरण ठरवणारे खुद्द शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात उपस्थित राहिल्याने त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा; अन्यथा त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, असाही इशारा सरकारला देण्यात आला आहे.
मराठी आणि कोकणी भाषातज्ज्ञांनी आज घेतलेल्या बैठकीत या विषयीचा ठराव घेतला आहे. पत्रकार परिषदेत ज्येष्ठ कोकणी साहित्यिक पुंडलीक नायक, स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, शिक्षणतज्ज्ञ माधव कामत, मराठी अकादमीचे अध्यक्ष नरेंद्र आजगावकर व फा. मोऊजीयू द. आताइद उपस्थित होते. तर, यावेळी झालेल्या बैठकीत शिक्षणतज्ज्ञ तथा पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुरेश आमोणकर, प्रा. सुभाष वेलिंगकर, प्रा. दत्ता भी. नाईक, भिकू पै आंगले, अशोक नाईक (पुष्पाग्रज), अरविंद भाटीकर, स्नेहलता भाटीकर, किरण नायक, प्रशांत नायक, सीताराम टेंगसे, गोविंद देव, प्रा. अनिल सामंत, विनायक नाईक, माणिकराव गावणेकर, चेतन आचार्य, कांता पाटणेकर, प्रा. रत्नाकर लेले, वल्लभ केळकर, सुभाष देसाई, दिलीप बोरकर, सुभाष हळर्णकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमती काकोडकर म्हणाल्या की, सरकारने प्राथमिक शिक्षणाच्या धोरणात बदल केल्यास राज्यस्तरावर हे आंदोलन पेटवले जाईल. मातृभाषेतून शिक्षण झालेल्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही; उलट मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण घेऊन मोठमोठे वैज्ञानिक तसेच अधिकारीही निर्माण झाले आहेत. इंग्रजीची मागणी म्हणजे धार्मिक कलह माजवण्याचा प्रयत्न आहे. परवाच्या सभेत सहभागी झालेल्या अनेक पालकांची दिशाभूल करून त्यांना त्या सभेत आणण्यात आले होते, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
इंग्रजीवाद्यांच्या सभेत सहभागी झालेल्या लोकांना बसमध्ये भरभरून कोणी आणले होते, या सभेचा प्रचार कोणी केला हे स्पष्ट झालेले आहे, असे यावेळी फा. आताइद यांनी सांगितले. या प्रकारामुळे दुःख होत असल्याचे सांगतानाच भारतीयत्व सांभाळले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तोमाझीन कार्दोज यांनी त्या सभेत राज्यातील शिक्षणतज्ज्ञांवर केलेला आरोप खोडून काढताना माधव कामत म्हणाले की, शिक्षणतज्ज्ञ वार्‍याच्या दिशेने सूप धरणारे असते तर सरकारच्या या प्रयत्नाच्या विरोधात उभे ठाकलेच नसते. तोमाझीन कार्दोज यांनी विचारपूर्वक बोलावे, बेताल आरोप करून लोकांची दिशाभूल करू नये, असाही सल्लाही त्यांनी यावेळी सर्व शिक्षणतज्ज्ञांच्या वतीने दिला.
तोमाझीन कार्दोज हे वसाहतवादी आहेत. त्यांना गुलामगिरीच प्रिय वाटते, अशी टीका यावेळी पुंडलीक नायक यांनी केली. भारतीय भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी उभारण्यात आलेल्या लढ्याचा एक भाग म्हणून ‘भारतीय भाषा सुरक्षा मंचा’चे कार्यकर्ते गोव्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, इतर मंत्री आणि आमदारांना निवेदन देऊन त्यांची भूमिका जाहीररीत्या स्पष्ट करण्याचे आवाहन करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

No comments: