Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 23 March, 2011

‘एस्मा’मुळे अनेक कार्यालये ओस

लोकांची गैरसोय - संमिश्र प्रतिसाद

सरकारने तोडगा न काढल्यास आंदोलन तीव्र होणार

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)
गोव्यातील सरकारी कर्मचार्‍यांनी सोमवारपासून (दि.२१) ‘समान काम - समान वेतन’ या मागणीसाठी पुकारलेले लेखणी बंद आंदोलन परिणामकारक झाले असले तरी त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सरकारने हे आंदोलन बेकायदा ठरवून अत्यावश्यक सेवा कायदा (एस्मा) लागू केल्याने व जे कर्मचारी कामावर हजर राहून काम न करता बसून राहतील त्यांच्यावर खातेप्रमुखांद्वारे कारवाई करण्याची धमकी दिल्याने अनेक कर्मचार्‍यांनी कार्यालयाला दांडी मारल्याचे दृश्य अनेक सरकारी कार्यालयांत आज दिसून आले.
‘गोवादूत’च्या प्रतिनिधीने पणजीतील विविध कार्यालयांना भेट दिली असता जादातर खुर्च्या रिकाम्या असलेल्याच दिसल्या. जे कर्मचारी हजर होते ते आपले काम करण्यात गर्क होते. मात्र अपुर्‍या कर्मचार्‍यांच्या उपस्थितीमुळे लोकांची बरीच गैरसोय झाली.
ग्रामीण भागांत परिणाम
दरम्यान, या आंदोलनाचा परिणाम ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणात जाणवला. ग्रामीण भागांत अधिकारिवर्ग कमी असल्याने तिथे हो आंदोलन पूर्णपणे यशस्वी झाल्याचे कळते. काही भागांत पिण्याचे पाणी व वीजपुरवठ्यावर या आंदोलनाचा परिणाम झाल्याची वृत्ते आहेत. आज आंदोलनाचा पहिलाच दिवस असल्याने इतर सेवांवर तेवढा परिणाम जाणवला नसला तरी हे आंदोलन सलग चालू राहिल्यास लोकांची बरीच तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
आंदोलन यशस्वी ः शेटकर
दरम्यान, गोवा सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मंगलदास शेटकर यांनी या आंदोलनाबाबत बोलताना सांगितले की ‘पेन डाऊन - टूल डाऊन’ आंदोलन पहिल्याच दिवशी बरेच परिणामकारक झाले असून सरकारने संघटनेची न्याय मागणी मान्य न केल्यास या आंदोलनाची व्याप्ती वाढून राज्याची प्रशासकीय सेवा पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या आंदोलनातून आरोग्य, वीज, पाणी आदी जीवनावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनी काही प्रमाणात शिथिलता बाळगली आहे. जर सरकारने निर्णय घेण्यास उशीर केला तर वरील सेवांमध्ये काम करणारे सर्व कर्मचारीही संपात सहभागी होतील, असे ते म्हणाले.

No comments: