Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 22 March, 2011

बीएडधारकांचे मानधन वाढवून देऊ - शिक्षणमंत्री

सेवेत कायम करण्याची पर्रीकर, पार्सेकरांची मागणी

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)
विविध विद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांत तासिका किंवा कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात येईल व जिथे शक्य असेल तिथे त्यांना कायमस्वरूपी तत्त्वावर सेवेत रुजू करून घेतले जाईल, असे आश्‍वासन आज शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिले.
गेली कित्येक वर्षे तासिका व कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या बीएडधारकांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे शैक्षणिक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत असून त्यामुळे पालकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. पूर्णवेळेच्या जागा असूनही या शिक्षकांना सेवेत कायम केले जात नाही व अतिशय तुटपुंज्या वेतनावर त्यांना राबवून घेतले जाते. त्यामुळे त्यांना सेवेत कायमस्वरूपी तत्त्वावर घेण्याची गरज आहे असे लक्षवेधी सूचनेद्वारे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताच त्याची दखल घेत शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी वरील आश्‍वासन दिले.
परीक्षेच्या काळातच या शिक्षकांनी आंदोलन सुरू केल्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांचा शिक्षणावर परिणाम होतो आहे; या शिक्षकांना अतिशय कमी वेतनावर राबवून घेतले जाते आहे. पूर्णवेळ जागा असतानाही त्या भरल्या जात नाहीत; शिवाय आठ आठ महिने त्यांना पगार दिला जात नसल्यामुळे या प्रश्‍नाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे, असे पर्रीकर म्हणाले.
दरम्यान, प्रा. पार्सेकर यांनीही या विषयाचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. एखाद्या शाळेत पूर्णवेळ नियुक्ती करण्याएवढा ‘वर्क लोड’ नसेल तर तिथे तासिका तत्त्वावर केलेली नियुक्ती समजता येते; मात्र ज्या विद्यालयांतील काही शिक्षक निवृत्त झाले आहेत व जिथे पूर्ण ‘वर्क लोड’ आहे तिथेही या शिक्षकांना सामावून घेतले जात नाही, असे ते म्हणाले. या प्रशिक्षित शिक्षकांना प्रति तासिका ८० रुपये जे दिले जातात ते अतिशय कमी असून ते वाढवण्याची गरज त्यांनी प्रतिपादिली. सभापती राणे यांनीही या संदर्भात टिप्पणी करताना ‘नरेगा’ कामगारांनाही यापेक्षा अधिक मानधन मिळत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
यावर प्रत्युत्तर देताना शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी तासिकांच्या उपलब्धतेनुसार या शिक्षकांची नियुक्ती केली जात असल्याचे सांगितले. या शिक्षकांचे मानधन वाढण्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी आश्‍वासन दिले.

No comments: