Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 21 March, 2011

शिरोडा येथे दोघांना धूलिवंदनावरून मारहाण

फोंडा, दि.२० (प्रतिनिधी)
शिरोडा येथे आज (दि.२०) दुपारी १२.१० च्या सुमारास धूलिवंदनाच्या गुलालाची उधळण करणार्‍या काही लोकांनी दंगामस्ती करून शिरोड्यात श्रीच्या दर्शनासाठी आलेल्या केपे येथील दोघांना मारहाण केली. याप्रकरणी मेघश्याम शिरोडकर व इतर तिघांच्या विरोधात फोंडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दंगामस्ती करणार्‍या लोकांमध्ये शिरोड्यातील बड्या राजकीय नेत्याच्या बंधूचा समावेश असल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, केपे येथील रोहन मडगावकर हे आपली आई व इतरांना सोबत घेऊन आज सकाळी शिरोडा येथे देवदर्शनासाठी आले होते. शिरोडा येथून परत जात असताना रस्त्यावर गुलालाची उधळण करणार्‍या या टोळक्याने श्री. मडगावकर यांची कारगाडी अडविली. त्यानंतर श्री. मडगावकर यांनी गाडीच्या बाहेर येऊन ‘त्या’ लोकांकडून गुलाल लावून घेतला. श्री. मडगावकर यांना गुलाल लावून घेऊनही त्या टोळक्याचे समाधान झाले नाही. त्यांनी जास्त दंगामस्ती करण्यास सुरुवात केली. त्यांनी श्री. मडगावकर यांना मारहाण केली व त्यांच्या कारगाडीचीही हानी करण्यात आली. त्यानंतर त्यांची आई सुप्रिया हिलासुद्धा मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे.
सदर टोळके रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत होते. या मारहाण प्रकरणाची माहिती फोंडा पोलिसांना देण्यात आल्यानंतर फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दारूच्या नशेत दंगामस्ती करणार्‍या टोळक्याने पोलिस अधिकार्‍यांशीही असभ्य वर्तन केले. या प्रकरणी फोंडा पोलिस स्थानकावर मेघश्याम शिरोडकर व इतर तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या घटनेनंतर संशयितांनी पलायन केले आहे. याप्रकरणी निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन लोकरे तपास करीत आहेत.

No comments: