Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 24 March, 2011

हे तर राष्ट्रविरोधी शक्तींचे कारस्थान - प्रा. सामंत

पणजी, दि.२४ (प्रतिनिधी)
गोव्यात सध्या प्राथमिक शिक्षणाचे माध्यम बदलण्याची होत असलेली मागणी हे राष्ट्रविरोधी शक्तींनी गोव्याविरुद्ध रचलेले मोठे कारस्थान आहे. या निमित्ताने काही राष्ट्रविरोधी शक्ती एकत्रित आल्या असून त्यांना गोव्याची शांतता भंग करण्याबरोबरच गोव्याची सांस्कृतिक ओळखही पुसून टाकायची आहे. देशी भाषा चिरडून इथे परकीय भाषेचे राज्य आणायचे आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ तथा लेखक प्रा. अनिल सामंत यांनी केले आहे.
या राष्ट्रविरोधी शक्तींना भारतातून प्रादेशिक भाषा संपवायच्या आहेत. एकदा का त्या त्या प्रदेशाची सांस्कृतिक ओळख सांगणार्‍या या प्रादेशिक भाषा संपल्या की, नागरिकांची मती गुंग करून त्यांना हवे तसे नाचवता येईल असा या लोकांचा छुपा अजेंडा आहे. म्हणूनच इथे इंग्रजी माध्यमाची मागणी मान्य झाल्यास गोव्याचा सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक र्‍हास अटळ आहे. हे गंडांतर टाळण्यासाठी या मागणीकडे सरकारने दुर्लक्षच करणे हिताचे ठरेल, असे मत प्रा. सामंत यांनी मांडले. जर सरकारने या मूठभर लोकांच्या दबावाला बळी पडून व बहुसंख्यांच्या मताला कवडीमोल ठरवून गोव्यातील प्राथमिक शाळांतील माध्यम इंग्रजी करण्याचा प्रयत्न केलाच तर कोकणी व मराठी भाषाप्रेमींना गोव्याच्या अस्मितेवरील हा हल्ला परतवून लावण्यासाठी एकत्र येऊन तीव्र लढा उभारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रादेशिक भाषांतूनच देशाभिमान अबाधित राहतो. राष्ट्राप्रति असलेल्या कर्तव्याची जाणीव प्रत्येक भारतीयाला या प्रादेशिक भाषांतूनच होत असते. समृद्ध भारतीय परंपरेने जगाला मार्गदर्शन केले आहे. या परंपरेला कमी लेखून विदेशी भाषेचा उदोउदो करणे हा राष्ट्रद्रोहच आहे, असेही परखड मत शेवटी प्रा. सामंत यांनी व्यक्त केले.

No comments: