Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 23 March, 2011

मराठी-कोकणीप्रेमी एकत्र येणार

शशिकला काकोडकर यांचा पुढाकार
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)
प्रादेशिक भाषांना डावलून इंग्रजी भाषेलाच प्राथमिक शिक्षणाचे माध्यम बनवण्यासाठी काहीजणांनी जो आक्रमक पवित्रा घेतला आहे, त्या पवित्र्याने गोव्यातील प्रादेशिक भाषाप्रेमी खडबडून जागे झाले असून प्रादेशिक भाषाविरोधी कारवाया हाणून पाडण्यासाठी मराठी व कोकणीप्रेमींनी एकत्र येण्याचे ठरवले आहे. माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांनी या कामी पुढाकार घेतला असून बुधवार दि. २३ रोजी गोव्यातील नामवंत शिक्षणतज्ज्ञांची व भाषाप्रेमींची एक बैठक पणजीत बोलावण्यात आली आहे. या बैठकीत इंग्रजी माध्यम समर्थकांना तोडीस तोड जबाब देण्याची रणनीती आखण्यात येणार असल्याची माहिती शशिकला काकोडकर यांनी दिली आहे.
प्रदेशाची अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी प्राथमिक शिक्षण हे प्रादेशिक भाषेतूनच देण्यात यावे असा सिद्धांत जगातील सर्वच प्रसिद्ध प्रज्ञावंतांनी मांडलेला आहे. मात्र हे वास्तव नाकारून गोव्यातील काही लोकांनी इंग्रजीलाच प्राथमिक शिक्षणाचे माध्यम बनवण्याचा घाट घातला आहे. काही इंग्रजाळलेले लोक प्राथमिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी करून इंग्रजी शाळांना सरकारने अनुदान द्यावे म्हणून डायसोसन सोसायटीच्या नेतृत्वाखाली सरकारवर जोरदार दबाव आणत आहेत. याकामी त्यांना काही राजकारण्यांचीही साथ मिळत असल्याने हा गट आपले ईप्सित साध्य करण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम घडवून आणत आहे. त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी मराठी व कोकणीप्रेमींनी एकजूट दाखवून लढा उभारण्याची गरज श्रीमती काकोडकर यांनी बोलून दाखवली.
अनोखा योग जुळून येणार!
दरम्यान, यामुळे गोव्यात एक अनोखी घटना घडणार असून या पूर्वी विविध व्यासपीठांवरून भाषावादामुळे एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवणारे मराठी व कोकणीप्रेमी इंग्रजी माध्यम समर्थकांचा मुकाबला एकजुटीने करण्यासाठी एकत्र येणार आहेत. गोमंतकाच्या दृष्टीने ही ऐतिहासिक घटनाच ठरणार आहे. दरम्यान, बुधवारच्या बैठकीनंतर मराठी व कोकणीप्रेमी इंग्रजी माध्यमाविरोधात आक्रमक झाल्यास गोव्यात गोव्यात पुन्हा एकदा वेगळ्याच अर्थाने भाषावाद उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

No comments: