Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 25 March, 2011

प्रादेशिक भाषेतूनच शिक्षण हा मानसशास्त्रीय सिद्धांत - प्रा. मयेकर

पणजी, दि.२४ (प्रतिनिधी)
प्रादेशिक भाषेतूनच प्राथमिक शिक्षण हा मानसशास्त्रीय सिद्धांत असून जगातील अनेक ज्ञानवंतांनी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच देणे योग्य असल्याचे मत वेळोवेळी मांडले आहे. त्यामुळे यात वाद होण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे स्पष्ट मत ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक, विचारवंत तथा शिक्षणतज्ज्ञ प्रा. गोपाळराव मयेकर यांनी व्यक्त केले आहे.
सध्या गोव्यातील प्राथमिक शिक्षणाचे माध्यम बदलण्यात यावे यासाठी काहींनी सुरू केलेल्या प्रयत्नांविषयी प्रा. मयेकर यांना विचारले असता, ही मागणी करणारे लोक परधार्जिणे असून इंग्रजी माध्यमाची मागणी करून ते येथील प्रादेशिक भाषांना, इथल्या संस्कृतीला व परंपरेला संपवू पाहत आहेत असे ते म्हणाले. त्यांचा डाव यशस्वी झाल्यास गोमंतक देशापासून दूर लोटला जाईल व इथे पाश्‍चात्त्य संस्कृती फोफावेल, असा धोक्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
प्रादेशिक भाषांना विरोध करणार्‍यांनी आधी या जागतिक सिद्धांताचा अभ्यास करावा. जगातील सर्वच देश प्राथमिक शिक्षण आपापल्या प्रादेशिक भाषेत देत असून गोवा त्यास अपवाद ठरण्याचे कोणतेही कारण नाही. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या व नाजूक विषयाबाबतचा निर्णय काही परधार्जिण्या माणसांवर सोपवण्यापेक्षा तो प्रज्ञावंतांनी व शिक्षणतज्ज्ञांनी घेणेच योग्य ठरेल, असेही प्रा. मयेकर म्हणाले. आम्ही प्राथमिक शिक्षण प्रादेशिक भाषेतूनच घेतले आहे व आम्हांला नंतर इंग्रजी शिकण्यासाठी कोणतीही अडचण आली नाही. अनेक मोठमोठी माणसे प्रादेशिक भाषेतून शिक्षण घेऊनच नावारूपाला आली आहेत हे विसरता येणार नाही, असे त्यांनी पुढे सांगितले.
प्राथमिक भाषेतून शिक्षण घेणार्‍याला किचकट संकल्पना सहज समजून येतात. प्रादेशिक भाषा शिक्षणाबरोबरच माणसाला संस्कारशील व सुसंस्कृत बनवते हे वेळोवेळी सिद्धही झाले आहे. मात्र काही स्वार्थी व उच्चभ्रू लोक स्वार्थासाठी इंग्रजीचा आग्रह धरत असून ही मागणी करणार्‍यांना वेळीच आवरले पाहिजे; नपेक्षा पुढील काळात ही परधार्जिण्यांची जमात गोव्याला घातक ठरू शकते, असेही ते म्हणाले. इंग्रजी शिकणारेच हुशार वा ज्ञानी होतात अशी चुकीची कल्पना पालकांच्या मनात बिंबवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. पालकांना वेठीस धरून हे महाभाग देशविघातक मागणीच करत असून ती गोव्याच्या हिताविरुद्ध आहे असे त्यांनी शेवटी सांगितले.

No comments: