Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 24 March, 2011

..तर नांगराचेच हत्यार!

तवडकरांचा निर्वाणीचा इशारा

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)
अनुसूचित जमातीचे खाते जन्माला घालून सरकारने त्याला बेवारशासारखे सोडून दिले आहे. या जमातीला कोणी वाली राहिलेला नाही. वारंवार मागण्या पूर्ण करण्याची आश्‍वासने देऊन या भूमिपुत्रांच्या तोंडाला पानेच पुसली गेली आहेत. मात्र आता त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून येत्या १५ मेपर्यंत मागण्यांची पूर्तता न केल्यास ही जमात त्यांच्या हातातील नांगराचे हत्यार बनवून सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा आज पैंगीणचे आमदार तथा अनुसूचित जमातीचे नेते रमेश तवडकर यांनी कपात सूचनांवर बोलताना दिला.
चार वर्षांपूर्वीच या जमातीला घटनात्मक अधिकार मिळाले आहेत. मात्र, अजूनही त्यांना कोणतीही सुविधा दिली जात नाही. या खात्याचे संचालक आपले तोंडही त्या ठिकाणी दाखवत नाहीत, कर्मचार्‍यांची वानवा आहे; ही लोकशाहीची थट्टाच असल्याचे श्री. तवडकर म्हणाले.
गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात या जमातीसाठी १७ कोटी रुपये राखून ठेवले होते. यातील एक रुपयाही खर्च झाला नाही. हे १७ कोटी रुपये कुठे गेले, याचा शोध या खात्याचा नुकताच ताबा घेतलेले मंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीस यांनी लावावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ‘ट्रायबल फॉरेस्ट ऍक्ट’ या कायद्याची अंमलबजावणी केल्यास किमान ४ ते ५ हजार गरीब वनवासी लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे. २००६ मध्ये आलेल्या या कायद्याची २०११ उजाडले तरी अंमलबजावणी होत नाही. अर्थसंकल्पात या जमातींसाठी राखून ठेवला निधी अन्य कामासाठी वळवला जातो हे दुर्दैव आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

No comments: