Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 20 March, 2011

आज तातडीची बैठक सरकारी कर्मचार्‍यांना मिळणार होळीची भेट

(‘लेखणी बंद’ आंदोलन)
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): विविध खात्यांतील सरकारी कर्मचार्‍यांना ‘समान काम - समान वेतन’ मिळावे म्हणून गोवा सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे सोमवार दि. २१ पासून ‘लेखणी बंद’ आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी उद्या दि. २० रोजी सकाळी १०.३० वाजता सचिवालयात तातडीची बैठक बोलावली आहे.
आज (शनिवारी) गोवा सरकारी कर्मचारी संघटनेच्या पाटो पणजी येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष मंगलदास शेटकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर ही ‘तोडगा’ बैठक घेण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला श्री. शेटकर यांच्यासोबत सरचिटणीस जॉन नाझारेथ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
१ ऑक्टोबर २००९ पासून कारकून विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मिळालेल्या वाढीव वेतनाएवढे वेतन विविध जीवनावश्यक सेवेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मिळावे यासाठी संघटनेतर्फे गेली दोन वर्षे सरकार दरबारी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी अनेकवेळा आंदोलनाचे हत्यारही उपसण्यात आले. परंतु प्रत्येकवेळी सरकारने दिलेल्या आश्‍वासनामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मात्र लिखित ‘ऑर्डर’ हातात येईपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही तसेच सरकारच्या कोणत्याही आश्‍वासनाला बळी पडणार नाही, असे श्री. शेटकर यांनी सांगितले. गोव्यातील सुमारे २० हजार सरकारी कर्मचारी २१ पासून कार्यालयात येतील परंतु काम न करता बसून राहतील, असे जॉन नाझारेथ यांनी सांगितले.
दरम्यान, संघटनेच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी मुख्य सचिवांनी उद्या २० रोजी सचिवालयात बोलावलेल्या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष मंगलदास शेटकर व पदाधिकारी तसेच गृह सचिव राजीव वर्मा, कायदा सचिव प्रमोद कामत उपस्थित राहणार आहेत.

No comments: