Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 16 October, 2010

राष्ट्रकुलमधील भ्रष्टाचार चौकशीला तोंड फुटले

भाजपने दंड थोपटले
नवी दिल्ली, दि. १५ : राष्ट्रकुल स्पर्धेचे सूप वाजल्यानंतर या स्पर्धेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीला ताबडतोब तोंड फुटले असून आता भारतीय जनता पक्षाने या आयोजनातील गैरव्यवहार, दिरंगाई आणि ढिसाळपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आयोजन समितीचे प्रमुख सुरेश कलमाडींच्या कंपूविरुद्ध दंड थोपटले आहेत.
भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले की, राष्ट्रकुल स्पर्धेचे सूप वाजले. आतापर्यंत या स्पर्धा सुरळीत होणे हा मुद्दा देशाच्या प्रतिष्ठेसाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे आम्ही काहीच बोललो नाही. आता जनतेचे न्यायालय सुरू झाले आहे. सर्व यशस्वी खेळाडूंचे जनतेने अभिनंदन केले आणि कलमाडींच्या कंपूची खिल्ली उडविली. आता येथून कलमाडी आणि आयोजन समितीला उत्तरे द्यायची आहेत. या खेळाच्या आयोजनात झालेला भ्रष्टाचार, ढिसाळपणा आणि तयारीतील दिरंगाई या सर्व मुद्यांना आम्ही जोरकसपणे उचलून धरणार आहोत.
यापूर्वीही भाजपने हा मुद्दा संसदेत आणि संसदेबाहेरही उचलला होता. पण, स्पर्धा सुरू होताच वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी हा महोत्सव यशस्वी होताना आपल्याला पाहायचा आहे, असे म्हटले होते. त्यामुळे यातील कोणत्याही नकारात्मक मुद्यांविषयी जाहीर चर्चा न करण्याचा अघोषित नियम आम्ही पाळला. देशाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा असल्याने आम्ही हे पथ्य पाळले. पण, आता दसऱ्यानंतर भाजप या सर्व मुद्यांना उचलणार असून केंद्र, दिल्ली सरकार आणि आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना या सर्व मुद्यांचे स्पष्टीकरण मागितले जाईल, असेही जावडेकर म्हणाले.
भ्रष्टाचाराच्या चौकशीला सुरूवात
राष्ट्रकुल स्पर्धेच्या काल पार पडलेल्या शानदार समारोप समारंभानंतर लगेचच या स्पर्धेच्या तयारीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीला महालेखाप्रबंधकांनी (कॅग) आज (शुक्रवारी) सुरूवात केली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या योजनांसंबंधीच्या आर्थिक विवरणांची तपासणी करण्यासाठी कॅगतर्फे आज वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या(सीपीडब्ल्यूडी) सी. पी. मुखर्जी स्टेडियमस्थित कार्यालयात पाठविण्यात आले होते. या योजना पूर्ण करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा, ठेकेदारांना कामाचे देण्यात आलेले पैसे आणि खेळाडूंसाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या व्यवहारांचे अंकेक्षण कॅगतर्फे करण्यात येणार आहे.
"राष्ट्रकुलच्या व्यवहारांच्या चौकशीला आम्ही सीपीडब्ल्यूडीच्या मुखर्जी स्टेडियममधील कार्यालयापासून आज सुरूवात केली आहे. आता खेळाडूंनी सर्व स्टेडियम रिकामे केले असल्याने या सर्व स्टेडियमच्या तपासणीसाठी टप्प्याटप्प्याने तपास अधिकाऱ्यांना पाठविण्यात येतील', असे कॅगच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आज येथे सांगितले. स्पर्धेवर करण्यात आलेल्या खर्चाच्या अंकेक्षणाला कॅगने ऑगस्ट महिन्यातच सुरूवात केली होती. मात्र, स्पर्धा जवळ आल्यामुळे अधिकाऱ्यांना स्टेडियम परिसरात जाण्यास परवानगी नसल्याने हे काम सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थांबवण्यात आले होते. या स्पर्धेसाठीचे सगळ्यात मोठे स्टेडियम असलेल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमचे निरीक्षण होणे बाकी आहे आणि लवकरच याठिकाणीही अधिकारी पाठविण्यात येतील. या स्पर्धेच्या व्यवहारांसंबंधीचा अहवाल जानेवारी महिन्याच्या अखेरीस सरकारला सादर केला जाण्याची शक्यता आहे आणि हा अहवाल फेब्रुवारी महिन्यात अंदाजपत्रकीय अधिवेशनादरम्यान संसदेत मांडण्यात येईल.
सत्य बाहेर यावेच : कॉंग्रेस
राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीत झालेल्या तथाकथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झालीच पाहिजे, असे कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. पक्ष या नात्याने कॉंग्रेसचा या स्पर्धेच्या तयारीशी कुठलाही संबंंध नाही. त्यामुळे या सर्व व्यवहारांची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशीच आमची भूमिका आहे, असेही तिवारी यांनी सांगितले. केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. एम. कृष्णा यांनीदेखील राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीतील भ्रष्टाचाराची सरकार सखोल चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.
----------------------------------------------------------------
कलमाडींना दूर ठेवले!
विशेष म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्यांना नवी दिल्लीत शुक्रवारी एका दिमाखदार सोहळ्यात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते गौरवण्यात आले; मात्र या कार्यक्रमापासून राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजन समितीचे सर्वेसर्वा सुरेश कलमाडी यांना दूर ठेवण्यात आले होते! एवढेच नव्हे तर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. एम. कृष्णा यांनीसुद्धा या स्पर्धेतील सर्व गैरव्यवहारांची कसून चौकशी केली जाईल, असा निर्वाळा दिला आहे!

No comments: