Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 6 October, 2010

पालिका उद्यानात अशोकस्तंभ दीनवाणा

अजूनही 'त्यांना' पोर्तुगीज प्रेमाचा पान्हा

पणजी, दि. ५ (शैलेश तिवरेकर): पणजी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून राजधानीत मध्यवर्ती ठिकाणी उभारलेल्या उद्यानात राष्ट्राप्रति आत्यंतिक स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा मानला जाणारा अशोकस्तंभ अखेर दीनवाणाच उरल्याने देशप्रेमी नागरिकांतून त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
एखाद्या लावण्यवतीप्रमाणे भरजरी शालू नेसलेल्या या उद्यानाचे आज दि. ५ रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. उपस्थित मान्यवरही ऐटीत वावरत होते; परंतु समारंभाच्या ठिकाणीच असलेला अशोकस्तंभ एखाद्या गरीब मुलासारखा अंगावर मळ आणि जुनाट वस्त्रे परिधान करून असल्यासारखा दिसत होता. एकीकडे पोर्तुगिजांच्या प्रेमाचा पान्हा पालिकेला फुटला होता; तर दुसरीकडे अशोकस्तंभ ढसाढसा रडत होता...
पोर्तुगिजांना गोव्यातून हाकलून लावण्यात आले त्या घटनेला जवळपास ५० वर्षे पूर्ण होत आली तरी आजसुद्धा गोमंतकातील काही अतिउत्साही मंडळींना त्यांची भाषा, संस्कृती आणि त्यांच्या नावांचा चांगलाच पुळका असल्याचे या उद्यानाकडे पाहिल्यावर सामान्य माणसाला जाणवल्यावाचून राहिले नाही.
गोव्याने अनेक महान कलाकार जगाला दिले. गोवा मुक्तिसंग्रामात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी समर्पणाच्या वेदीवर आपल्या सर्वस्वाचा होम पेटवला. ती मंडळी सर्वार्थाने अमर झाली. देशातही अनेक अद्वितीय व्यक्तिमत्त्वे होऊन गेली. मात्र त्यांपैकी कोणाचेही नाव या उद्यानाला देण्याची सुबुद्धी महापालिकेला सुचली नाही. तसे न करता "गार्सिया द ऑर्ता' असे पोर्तुगीज नाव या उद्यानाला देण्यात आले. मुळात या नावाच अर्थ सामान्य लोकांना कितपत कळतो हाच गहन प्रश्न आहे.पोर्तुगीज गेले पण त्यांचे भूत अजूनही स्वतःला गोमंतकीय म्हणवणाऱ्या काही जणांच्या मानगुटीवर बसून घिरट्या घालत असल्याचे जिवंत उदाहरणच यानिमित्ताने पाहायला मिळाले.
गोव्यासाठी आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे कार्यालय या उद्यानाच्या जवळच आहे. तथापि, त्यांच्या नाकावर टिच्चून या उद्यानाचे पोर्तुगीज नामकरण करण्यात आले.
ताठ कण्याच्या गोमंतकीयांचे लक्ष या समारंभाऐवजी अशोकस्तंभाकडेच वारंवार जात होते. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या स्वाभिमानाचे आपणच काढलेले धिंडवडे. अतिमहनीय आणि स्वतःला राजकीय क्षेत्रातील दिग्गज मानणाऱ्या व्यक्तीदेखील या समारंभात अशोकस्तंभाची दुर्दशा दुरूनच पाहात होत्या.
उद्यानासाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र अशोकस्तंभाची जी दारुण उपेक्षा करण्यात आली आहे ती पाहून कोणाचेही माथे भडकल्याशिवाय राहणार नाही.
एखाद्या पुरातन वास्तूचे नूतनीकरण केल्याने त्याचे ऐतिहासिक मूल्य गमावण्याची भीती असते; परंतु त्याचे सुशोभीकरण केले असते तर काय बिघडणार होते? या सर्व गोष्टी राहिल्या दूरच; उलट त्यावर पावसामुळे आलेले गवत काढण्याची अक्कलही कुणाला नसावी यापेक्षा गोमंतकीयांचे दुर्भाग्य ते कोणते?
गोवा पर्यटनासाठी जगप्रसिद्ध आहे. म्हणूनच दरवर्षी येथे लाखो पर्यटक येतात. त्यासाठीच सदर उद्यान पणजी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधण्यात आले आहे.पर्यायाने येथे आलेल्या पर्यटकांना अशोकस्ंतभाचे असे करुण दर्शन झाल्यास गोव्याची इतिहासाचे कसे आकलन होईल? मुलाखतीला येणाऱ्या उमेदवाराचा दर्जा त्याच्या अर्जावरून ठरत असतो त्याचप्रमाणे पर्यटकांच्या दृष्टीने अशोकस्तंभावरून इतिहासाचा दर्जा ठरणार नाही काय?
या संदर्भात स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांना विचारले असता ते म्हणाले की, पणजी पालिकेने विविध ४० ठिकाणांची नावे बदलावीत, अशी मागणी आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहोत; पण पालिका मात्र वेळकाढू धोरण अवलंबत आहे. शिवाय लोकांचेही अपेक्षित सहकार्य मिळत नाही. या संदर्भातही आम्हाला योग्य सहकार्य मिळाल्यास आम्ही नाव बदलण्याची मागणी करणार आहोत. काही असले तरी सध्या गोव्याच्या राजधानीतील या उद्यानाला पोर्तुगिजांच्या हुजरेगिरीचा वास येतोय यात शंका नाही.

No comments: