Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 4 October, 2010

मनोज श्रीवास्तव यांच्या आरोपांना निखिल देसाई यांचेही चोख उत्तर

फुल्ल "मनोरंजन' !

पणजी, दि.३ (प्रतिनिधी)ः गोवा मनोरंजन संस्थेचे (ईएसजी) मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनी आपणाविरोधात आर्थिक घोटाळ्यांचे आरोप करून मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल करणे हा निव्वळ दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. याप्रकरणी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार आहोत, पण त्याचबरोबर मनोज श्रीवास्तव यांनीही चौकशीच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे, असे थेट आव्हान तत्कालीन सरव्यवस्थापक निखिल देसाई यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पाठवलेल्या पत्रात दिल्याने येत्या काळात लोकांचे मात्र बरेच "मनोरंजन' होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
"ईएसजी' चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्याकडे निखिल देसाई यांच्यावर २००६-०८ या काळात ३७.६७ लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार दाखल करून बरीच खळबळ उडवली आहे. याप्रकरणी निखिल देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपणावरील आरोपांचे खंडन करणारे पत्र मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पाठवल्याची माहिती दिली. मनोज श्रीवास्तव यांनी एका पत्रकाराला हाताशी धरून आपली बदनामी करण्याचा जो घाट घातला आहे, त्याला समर्थपणे तोंड देण्याची आपली धमक आहेच, परंतु त्यांनी सरकारी शुचितेचा भंग केल्याचे श्री.देसाई म्हणाले. आता "इफ्फी' आयोजनातील व्यवहारांची चौकशी दक्षता खात्यातर्फे होणार आहेच, तेव्हा सत्य काय ते लवकरच उघड होईल, असे संकेतही श्री.देसाई यांनी दिले. "ईएसजी'चा कारभार हाताळण्यास सपशेल अपयशी ठरलेले श्रीवास्तव हे वैफल्यग्रस्त बनले आहेत व त्यामुळेच इतरांना बळीचा बकरा करून आपल्या गैरकृत्यांवर पांघरूण घालण्याचाच हा त्यांचा प्रयत्न आहे,असा टोला यावेळी श्री.देसाई यांनी हाणला.
सन २००८ साली"ब्ल्यू ओशीयन' या कंपनीला "ईएसजी'तर्फे कोणतेही कंत्राट दिले नाही. या काळात कार्यकारी समितीने "एबीएसएल' या कंपनीला इव्हेंट मॅनेजमेंटचे कंत्राट दिले होते. मनोज श्रीवास्तव यांनी मात्र चित्रपट महोत्सव संपूनही या कंपनीला लाखो रुपयांची कंत्राटे दिली व त्यामुळेच संस्थेचे कोट्यवधी रुपयांचे प्रकरण दोन वर्षांपासून न्यायप्रविष्ट बनले आहे, असा ठपका श्री.देसाई यांनी ठेवला. संस्थेच्या छपाई कामाचे कंत्राट नियमांची पूर्तता करून कार्यकारी समितीने कमी बोलीची निविदा सादर केलेल्या आस्थापनाला दिले होते व या कंत्राटाचा अंतिम निर्णय हा स्वतः मनोज श्रीवास्तव यांनी घेतला होता, याची आठवणही या पत्रांत श्री.देसाई यांनी करून दिली आहे. आपल्या विरुद्धच्या तक्रारीत "रिट्झा वाईन्स' या पुरस्कर्त्यांच्या धनादेशासंबंधी स्पष्टीकरण देताना निखिल देसाई यांनी सदर पुरस्कर्ता "इफ्फी'२००६ च्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने आणला होता. या पुरस्कर्त्यांची रक्कम यापूर्वीच संस्थेच्या खात्यात जमा झाली आहे व या कंपनीच्या व्यवहारास कार्यकारी समितीची मान्यता मिळाल्याचाही खुलासा केला आहे.
संस्थेच्या अंतर्गत व्यवहारांबाबत हिशेबतपासनीसांकडून कुठलाही आक्षेप घेतला नसताना व याप्रकरणी कार्यकारी समितीलाही थांगपत्ता न लावता मनोज श्रीवास्तव यांनी थेट मुख्य सचिवांकडे तक्रार करण्याचा एकूण प्रकारच संशयास्पद आहे. मनोज श्रीवास्तव यांनी सुरू केलेले लघू चित्रपट केंद्र हे कायमस्वरूपी वादात सापडले आहे. कार्यकारी समितीकडून ३५ लाख रुपयांची संमती मिळवून प्रत्यक्षात मात्र ७५ लाख रुपयांचा खर्च कसा केला, याची चौकशी व्हायलाच हवी. ऐन चित्रपट महोत्सवात संस्थेची गाडी भल्या पहाटे एका विजेच्या खांबाला ठोकून लाखो रुपयांचे नुकसान कुणी केले, याचाही खुलासा व्हावा, अशी मागणीही श्री.देसाई यांनी केली.अभिनेत्री खतिरा युसुफी तसेच निर्माता राहुल रवेल यांची प्रकरणे अजूनही लोकांच्या मनात तेवढीच ताजी आहेत, अशी मल्लिनाथी श्री.देसाई यांनी केली आहे. खाजगी विदेश दौऱ्यांवर असताना हजारो रुपयांची फोनची बिले संस्थेच्या खात्यातून कुणी फेडली, याचाही खुलासा व्हावा. मनोज श्रीवास्तव यांची एकतर्फी कार्यपद्धती व अनेक कारनामे उघड होतील, या भीतीनेच त्यांनी सर्वांचे लक्ष विचलित करण्यासाठी आपल्यावर विनाकारण आगपाखड चालवल्याचेही श्री. देसाई यांनी म्हटले आहे. एका पत्रकाराला हाताशी धरून आपल्याबाबत बदनामीकारक माहिती पसरवून लोकांत संभ्रम निर्माण करण्याचाच प्रकार घडल्याने आपल्याला याबाबत खुलासा करणे भाग पडले, अशी भूमिकाही यावेळी श्री.देसाई यांनी आपल्या पत्रांत घेतली आहे.

No comments: