Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 6 October, 2010

'जखमी' वाघाने केली ऑस्ट्रेलियाची शिकार!

पुन्हा एकदा व्हेरी व्हेरी स्पेशल
भारताचा रोमांचकारी विजय

मोहाली, दि. ५ : आपण खरोखरच "व्हेरी व्हेरी स्पेशल' आहोत याची प्रचिती आणून देत हैदराबादच्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या क्रिकेटमधील कसबी कलाकाराने आज पाहुण्या कांगारूंची शिकार केलीच. त्याच्या या मखमली खेळीमुळेच दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिल्या लढतीत केवळ एक गडी राखून रोमांचकारी विजय संपादून यजमानांनी पाहुण्यांवर १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींनी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या या धुरंधरांना लवून मुजरा केला. धोनीनेही "व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण' आणि "असामान्य फलंदाज' अशी स्तुतिसुमने त्याच्यावर उधळली तेव्हा मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा अभूतपूर्व गजर केला.
कांगारूंविरुद्धच्या सामन्यात लक्ष्मणची बॅट तळपली नाही असे कधीच होत नाही. आपल्या कारकिर्दीतील सोळा शतकांपैकी तब्बल सहा शतके या पठ्ठ्याने कांगारूंच्या विरोधातच ठोकली आहेत. जगातील अव्वल गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना त्याने आज कमालच केली. चिकाटी, समर्पण आणि एकाग्रता अशा त्रिवेणी संगमाने नटलेली त्याची ७३ धावांची खेळी रसिकांना अपूर्व आनंद देऊन गेली. केवळ त्याच्या धीरोदात्त खेळीनेच आज भारताला ऑस्ट्रेलियावर एका गड्याने चित्तथरारक विजय मिळवून दिला. आपल्या ७९ चेंडूतील ७३ धावांच्या नाबाद खेळीमध्ये कुठेही दुखऱ्या पाठीचा व्यत्यय आणू न देता लक्ष्मणने ईशांत शर्मा (३१) याला साथीला घेत अत्यंत मोक्याच्या क्षणी थंड डोक्याने खेळ केला. या ईशांतचेही कौतुक करावे तेवढे थोडेच. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात त्याने तीन गडी मटकावल्यावर फलंदाजीतही या जिगरबाज खेळाडूने लक्ष्मणला मोलाची साध दिली. तो टिच्चून खेळला. त्यामुळे भारताला भारतात नमवण्याचे कांगारूंचा कर्णधार रिकी पॉंटिंग याचे स्वप्न अखेर अधुरेच उरले.
गोव्यातही आनंदाला उधाण
हा थरारक सामना संपला आणि गोव्यातही आनंदाला उधाण आले. क्रिकेटप्रेमींनी परस्परांना शुभेच्छा देऊन हा ऐतिहासिक विजय साजरा केला. घराघरांत राष्ट्रकुलपेक्षाही चर्चा रंगली होती ती लक्ष्मणच्या बहारदार खेळीचीच. मंगळवारची संध्याकाळ जणू लक्ष्मणमय होऊन गेली होती.

No comments: