Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 9 October, 2010

येडियुरप्पा सरकारवरचे संकट टळल्यात जमा

गोवा भाजपची यशस्वी शिष्टाई
कॉंग्रेस नेते रणांगणातून गायब

मडगाव, दि. ८ (प्रतिनिधी): गोव्यातील भाजप नेत्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर कर्नाटकातील भाजप सरकारातील गेले चार दिवस सुरू असलेली बंडाळी शमल्यातच जमा आहे. उरलेले किरकोळ मतभेद संपुष्टात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत संबंधितांशी चर्चा सुरू होती. दुसरीकडे डाव आपल्या हातातून निसटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काल रात्री उशिरा हॉटेलातून निघून गेलेले गोव्यातील तिन्ही मंत्री व कॉंग्रेस नेते आज दिवसभरात पुन्हा हॉटेलकडे फिरकलेच नाहीत. आमदारांसाठी भलीमोठी प्रलोभने घेऊन आलेले निधर्मी जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांनी आज सायंकाळी हॉटेल सोडले व त्यामुळे येडियुरप्पा सरकारवरील संकट टळल्याचे चिन्ह स्पष्ट झाले.
बाणावली येथील "ताज एक्झॉटिका' हे पंचतारांकित हॉटेल कर्नाटकांतील राजकीय हालचालींचे आज केंद्र बनून राहिले. काल सायंकाळी येथे दाखल झालेले भाजपचे ९ व ५ अपक्ष आमदार येथे मुक्काम ठोकून असल्याने साऱ्या देशाचे लक्ष येथे केंद्रित झालेले आहे. गोवा भाजप नेते मनोहर पर्रीकर व खासदार श्रीपाद नाईक कालपासून या आमदारांबरोबर बसून त्यांची मनधरणी करीत होते. आज त्यांच्या जोडीला आमदार तथा प्रदेश भाजप अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हेही आले. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी सदर आमदारांसाठी प्रलोभने घेऊन आले असल्याची चर्चा होती पण स्थानिक भाजप नेत्यांच्या दक्षतेमुळे ते त्या आमदारांपर्यंत पोचूच शकले नाहीत.
कुमारस्वामी आज सकाळी आपण बंगलोरला जात असल्याचे सांगून हॉटेलातून बाहेर पडले; पण दुपारी परत आले व हॉटेलात राहिले. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले होते. सायंकाळी ६ पर्यंत ते हॉटेलात होते. दरम्यानच्या काळात भाजपचे युवा नेते रुपेश महात्मे हे आतून बाहेर आले व त्यांनी आमदारांसोबत बैठका सुरू असून त्यांचे मतपरिवर्तन केले जात असल्याचे सांगितले आणि पत्रकारांना वस्तुस्थितीची कल्पना आली. त्यांनंतर ७ वा. च्या सुमारास कुमारस्वामी पुन्हा बाहेर आले व आपण बंगलोरला रवाना होत असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय घडामोडींबाबत विचारता विश्र्वास ठराव सोमवारी असल्याने तोपर्यंत "थांबा व प्रतीक्षा करा,' असे ते म्हणाले. कॉंग्रेस व निजद ठरावाविरुद्ध मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हॉटेलात कर्नाटकचे पर्यटनमंत्री जनार्दन रेड्डी, कृषीमंत्री श्री. कत्ती व राज्यसभेचे खासदार प्रभाकर कोरे असून तेही राजकीय संकट टाळण्याच्या प्रयत्नांत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. स्थानिक भाजपा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील विवाद यापूर्वीच शमलेला आहे व आता उरले आहेत ते कौटुंबिक वाद व रुसवे - फुगवे. ते सोडविण्यासाठी प्रत्येकाशी वेगवेगळी चर्चा सुरू आहे. ती गरज पडल्यास उद्याही सुरू राहील. दरम्यान पर्रीकर व अन्य नेत्यांनी चौदाही आमदारांशी एकत्रितपणे चर्चा करण्याबरोबरच प्रत्येकाशी किमान चर्चेच्या पाच फेऱ्या पूर्ण केल्याचे पक्षाचे राज्य प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी "गोवादूत'शी बोलताना सांगितले.
कुमारस्वामी बरोबर हॉटेलांतून बाहेर आलेले गोव्याचे माजी मंत्री संजय बांदेकर यांनी आपण आपले जावई आनंद अस्नेाटीकर यांना भेटण्यासाठी हॉटेलात आल्याचे व त्यात कोणतेच राजकीय कारण नसल्याचे सांगितले. आज कर्नाटकातील अनेक भाजप नेते बाणावलीत दाखल झाले. त्यांतील मोजक्यांनाच आत सोडण्यात आले. बहुतेकांनी राज्यातील भाजप सरकारला कोणताच धोका पोचणार नाही, अशी आशा व्यक्त केली. त्यात कोलारमधील राज्यसभा खासदार डी. एस. वीरय्या यांचाही समावेश होता.
आज सकाळी साधारण साडेदहा वाजता पर्रीकर यांनी हॉटेलबाहेर मुख्य फाटकापाशी येऊन पत्रकारांशी संवाद साधला व सांगितले की कर्नाटकांतील राजकीय पेंचप्रसंग संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. निजद नेते तथा माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राजकीय सौदेबाजी करण्याचा भरपूर प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही. आपण व खासदार श्रीपाद नाईक हे येथे मुक्काम ठोकून गैरसमज झालेल्या भाजप व अपक्ष आमदारांची समजूत घालत असून त्यात ५५ ते ६० टक्के यश आलेले आहे. आपण भाजपच्या राष्ट्रीय सुशासन समितीचा अध्यक्ष या नात्याने राष्ट्रीय नेत्यांच्या सूचनेवरून लक्ष घातल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकरण संपुष्टात येईपर्यंत या लोकांबरोबर आपण असेन असेही त्यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेसची झाली कुचंबणा
काल रात्री पर्रीकर यांनी हॉटेलमधून बाहेर पडून मडगावात जाऊन जेवण घेतले. नंतर ते हॉटेलात परतले. त्यांच्या व श्रीपाद नाईक यांच्या असंतुष्टांबरोबर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्या आजही पुढे चालू राहिल्या. त्यापूर्वी काल सायंकाळी हॉटेलात डेरेदाखल झालेले गृहमंत्री रवी नाईक, त्यापूर्वी वीजमंत्री आलेक्स सिकेरा हे एकेक करून हॉटेलातून बाहेर पडले ते परत न फिरकण्यासाठीच. त्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव हे एका विवाह समारंभाचे निमित्त करून बाहेर पडले.पाठेापाठ प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस विजय सरदेसाई हेही गेले होते. तेदेखील परत फिरकले नाहीत. त्यामुळे कर्नाटकातील या राजकीय खेळीतून कॉंग्रेसने अंग काढून घेतल्याचे स्पष्ट झाले.
कॉंग्रेसकडून गंभीर दखल
गोव्यात मुक्काम ठोकलेल्या कर्नाटकातील आमदारांबरोबर गोव्यातील मंत्री असल्याच्या वृत्ताची गंभीर दखल कॉंग्रेस हायकमांडने घेतली. हरिप्रसाद यांनी त्याबाबत गृहमंत्री रवी नाईक व इतरांना जाब विचारल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कर्नाटकातील या संघर्षात कॉंग्रेसची कोणतीही भूमिका नाही, असे हरिप्रसाद यांनी स्पष्ट केल्याने रवी व अन्य मंत्र्यांनी बाणावलीतून काढता पाय घेतला. या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यातील एका मंत्र्याशी जवळीक असलेल्या एका नेत्याने हे आमदार गोव्यात येत असून त्यांच्या निवासाची व्यवस्था करा, असे कळविले होते. या मंत्र्याने आपल्या पक्षनिष्ठेची खात्री पटवण्यासाठी त्यांना विमानतळावरून बाहेर काढून हॉटेलापर्यंत नेले. खरे तर हे काम त्याने खास मित्र असलेल्या भाजपच्या एका नेत्याच्या विनंतीवरून केले होते. कॉंग्रेस पक्षाचा किंवा अन्य कोणाचाही त्याच्याशी संबंध नव्हता मात्र. कॉंग्रेसच्या एक मंत्री भाजपच्या आमदारांना हॉटेलमध्ये घेऊन जातो म्हणजेच हायकमांडच्या आदेशावरूनच ते असेल असे समजून कॉंग्रेसचे अन्य मंत्रीही तेथे धावत गेले व तेथील बंदोबस्ताची व्यवस्था केली. परंतु विरोधी पक्षनेते तसेच कर्नाटकांतील भाजपा खासदाराने या प्रकरणात गोवा सरकारच्या भूमिकेचा राष्ट्रीय प्रसारमाध्यमांतून भांडाफोड केल्याने कॉंग्रेसला बचावात्मक पवित्र्यात घ्यावा लागला. स्थानिक नेत्यांना त्यासंदर्भात जाब विचारला गेल्यामुळे एकेक करून मंत्र्यांनी तेथून काढता पाय घेतला. तेथेच कॉंग्रेसच्या हातातून डाव निसटला.
भाजप कार्यकर्ते आक्रमक
कर्नाटकातील येडीयुरप्पा सरकार अस्थिर करण्यामागे कॉंग्रेसचाच हात असल्याचा आरोप करून स्थानिक भाजप कार्यकर्ते काल सायंकाळपासून या हॉटेलच्या मुख्य प्रवेशव्दारालगत ठाण मांडून बसले आहेत. कोणीही भाजप नेता कर्नाटकातील आमदारांची भेट घेण्यासाठी आला असता ते भाजपचा जयजयकार करून वातावरण दणाणून सोडतात. त्याचबरोबर कॉंग्रेसची निर्भत्सना करताना दिसतात. आज गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर हॉटेलात जाण्यासाठी आले असता त्यांनी अशाच प्रकारे घोषणा देऊन वातावरण दणाणून सोडले. नंतर त्यांना गाडीतून आत सोडण्यास पोलिसांना भाग पडले. मिळालेल्या माहितीनुसार गोवा भाजपाच्या या आक्रमक पवित्र्यामुळेच ताज एक्झॉटिका हे दक्षिण गोव्यातील हॉटेल कर्नाटकातील आमदारांवर प्रभाव पाडण्यासाठी निवडण्याचा कॉंग्रेसचा डाव फसला. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेचे आज सर्वत्र कौतुकच होताना दिसून आले. रुपेश महात्मे, नवीन रायकर, मडगाव भाजप गटाध्यक्ष चंदन नायक, देवबाला भिसे व त्यांच्या सहकारी आज बाणावलीत तळ ठोकून होत्या.
पोलिस छावणीचे स्वरूप
बाणावलीतील या पंचतारांकित हॉटेलला काल सायंकाळपासून पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर व निरीक्षक संतोष देसाई यांच्या नेतृत्वाखाली किमान डझनभर पोलिस उपनिरिक्षक व सहाय्यक उपनिरिक्षक येथे तळ ठोकून आहेत. शिवाय संपूर्ण हॉटेललाच पोलिसांनी गराडा घातलेला आहे. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांत महिला कर्मचारीही आहेत. मात्र नेमका हा बंदोबस्त कशासाठी व कोणाच्या सांगण्यावरून ठेवण्यात आला हे पोलिस अधिकारी सांगू शकले नाहीत. गुरुवारी दुपारनंतर या आमदारांना येथे आणण्यात आल्यापासून तेथे पोलिस बंदोबस्त असून त्यानंतर त्यांची पाळी आज सकाळी बदलली गेली; तर सकाळी ड्युटीवर आलेल्यांना सायंकाळी जाऊ देण्यात आले. या बंदोबस्ताला आता पोलिसही कंटाळल्याचे दिसले. कोणतीही कामगिरी नसताना त्यांना उन्हात उभे राहावे लागत आहे. हॉटेलच्या मुख्य फाटकाबाहेर तर दोन्ही बाजूंना या खाकीधारींचीच गर्दी दिसते. या आमदारांना काणकोणमधील इंटर कॉन्टिनेंटल या सप्ततारांकित हॉटेलात ठेवण्याचा बेत होता; पण स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी काणकोणच्या फेऱ्या टाळण्याच्या प्रयत्नांत त्यांना ताज एक्झॉटिकामध्ये ठेवले. त्यामुळे सदर हॉटेल या राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्र केंद्र बनले आहे.
वृत्त वाहिन्यांनी टाकला तळ
ताज एक्झॉटिका हॉटेलबाहेर काल रात्रीपासूनच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी डेरा टाकला आहे. आज (शुक्रवारी) सकाळी तर कर्नाटकांतील कन्नड वाहिन्यांची पथके आपल्या साधनसामुग्रीसह येऊन दाखल झाल्याने हॉटेलबाहेर जत्रेचे स्वरूप आले. एनडीटीव्हीबरोबरच गोव्यातील वृत्तवाहिन्यांची मंडळी व अन्य प्रसारमाध्यमांनी हॉटेलच्या फाटकाबाहेर तळ ठाकला आहे. एका बाजूने पोलिस व दुसऱ्या बाजूने ही मंडळी यांमुळे हॉटेलमध्ये जाणारे पर्यटकही बिचकताना दिसत आहेत.
हॉटेल कर्मचाऱ्यांची व्यथा
कर्नाटकातील या राजकीय घडामोडींमुळे ताज एक्झॉटिका जरी सध्या राष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमांचे केंद्र बनलेले असले तरी या घडामोडींमुळे तेथे पोलिसांनी उभारलेले कडे व सुरक्षाव्यवस्थेमुळे हॉटेलमधील पर्यटक स्थलांतर करू लागल्याचे सांगण्यात येते. अशावेळी तेथील कर्मचाऱ्यांची मिळकतही बंद झालेली आहे. कधी एकदा हे नाट्य संपते अशी त्यांची अवस्था झाली आहे.

No comments: