Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 29 May, 2010

नक्षल्यांनी 'ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस' उडवली

- ७५ ठार, २०० हून अधिक जखमी
- १३ डबे घसरले, मालगाडीचीही धडक
- पीसीपीएने जबाबदारी स्वीकारली

झारग्राम (प.बंगाल), दि. २८ : मुंबईच्या दिशेने निघालेल्या हावडा-कुर्ला ज्ञानेश्वरी एक्सप्रेसला माओवाद्यांनी काल मध्यरात्री झारग्रामजवळ रूळाखाली दडविलेल्या सुरूंगांचा स्फोट घडवून ७५ निष्पाप प्रवाशांचे प्राण घेतले. या स्फोटामुळे आठ डबे घसरून कलंडले. त्याचवेळी विरूद्ध दिशेने येणारी मालगाडी कलंडलेल्या डब्यांवर आदळल्याने पाच डबे अक्षरश: चक्काचूर झाले. त्यामुळे या अपघाताची भीषणता अधिकच वाढल्याने मृतकांचा आकडाही वाढला. या अपघातात २०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. पीपल्स कमेटी अगेन्स्ट पोलिस ऍट्रॉसिटीज (पीसीपीए) या माओवादी समर्थित संघटनेने या घातपाताची जबाबदारी घेतली आहे. तशी पत्रकेही घटनास्थळी सापडली आहेत. पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात हा अपघात घडला. मध्यरात्रीनंतर दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
ज्ञानेश्वरी एक्सप्रेस खेमासोली आणि सारदिया स्थानकादरम्यान धावत असताना नक्षल्यांनी हा स्फोट घडवून आणला. जखमींना विविध ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये माओवाद्यांचा निषेध सप्ताह सुरू आहे. त्याच कालावधीत हा घातपात घडविण्यात आला आहे.
मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे एकच हाहाकार माजला. रात्रीची वेळ असल्यामुळे मदत कार्यातही अडथळे येत होते. काही प्रवासी तर चक्काचूर झालेल्या डब्यांच्या खाली असे काही अडकले होते की, त्यांना बाहेर काढणे शक्य नव्हते. सकाळ उजाडल्यावरच डबे कापून त्यांना बाहेर काढण्यात आले.
लष्कराची मदत
घटनेची तीव्रता लक्षात घेता तातडीने लष्कराला पाचारण करण्यात आले. तसेच वायुदलाचे हेलिकॉप्टर्सही मदतीसाठी पाठविण्यात आले. गंभीर जखमींना उपचारासाठी हलविण्याचे काम या हेलिकॉप्टर्सनी केले. अपघाताचे वृत्त समजताच रेल्वेने वायुदलप्रमुखांशी संपर्क साधला आणि मदतीची विनंती केली. त्यांनी मदतकार्यासाठी तत्काळ होकार दिला. याशिवाय विशेष वैद्यकीय पथकेही रवाना करण्यात आली.
पीसीपीएने घेतली जबाबादारी
हा घातपात घडवून आणणाऱ्या पीसीपीए या संघटनेने म्हटले आहे की, आम्ही यापूर्वीही जंगलमहल परिसरातून संयुक्त सुरक्षा पथक हटविण्याची मागणी केली होती. पण, आमच्या मागण्यांचा विचार झाला नाही. त्याचा निषेध म्हणून आम्ही हे पाऊल उचलल्याचे पत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तथापि, या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी यामागे आमचा हात नसल्याचे म्हटले आहे.
मागील वर्षी २७ ऑक्टोबर रोजी पीसीपीएने "बंद'दरम्यान राजधानी एक्सप्रेस अडविली होती.
योजनाबद्ध कारवाई
ज्ञानेश्वरी एक्सप्रेस ज्या मार्गावरून जाणार, त्याचवेळी विरूद्ध दिशेने मालगाडी येण्याची वेळ हेरून नक्षल्यांनी हा घातपात घडवून आणला. अधिकाधिक संख्येत प्रवासी मारले जावेत, या निर्दयी उद्देशाने त्यांनी हे निर्घृण कृत्य केले. त्यांनी आधी ज्ञानेश्वरी जेथून जाणार, त्या ठिकाणी रूळाखाली बॉम्ब पेरून ठेवले आणि गाडी येताच त्याचा स्फोट घडवून आणला. यामुळे सुमारे दोन फुटाचा रूळ तुटून पडला आणि डबा त्यावरून जाताच तो उसळून अन्य आठ डबे रूळावरून घसरले आणि कलंडले. त्याचवेळी आलेल्या मालगाडीचे डबे या कलंडलेल्या डब्यांवर जाऊन आदळले आणि त्यात ७५ प्रवाशांचे प्राण गेले. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, रूळ तीन फूट उंच उडून वाकले.
ममता बॅनर्जींची घटनास्थळी भेट
घटनेची माहिती मिळताच रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन स्थितीची पाहणी केली. यावेळी बोलताना रेल्वेमंत्री म्हणाल्या की, हावडा-कुर्ला गाडीचा घातपात स्फोटाने घडवून आणण्यात आला. घातपाताच्या ठिकाणी टीएनटी स्फोटके आणि जिलेटीनच्या कांड्याही सापडल्या आहेत. टीएनटी दारूगोळा हा रणगाड्यांमधून सोडण्यात येणाऱ्या बॉम्बसाठी वापरण्यात येतो, हे येथे उल्लेखनीय. माओवाद्यांच्या या घातपातामुळे अनेक निरपराधांना आपले प्राण गमवावे लागतात, ही अतिशय दु:खद बाब आहे. निष्पाप लोकांच्या जिवाशी असा खेळ व्हायला नको, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी घटनेबाबत खेद व्यक्त केला.
मृतांच्या आप्तांना रेल्वेतर्फे
पाच लाखाची मदत, रोजगाराची हमी

या अपघातात दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना रेल्वेतर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच जखमींना १ लाख रुपये दिले जाणार आहेत. शिवाय, मृतांच्या कुटुंबीयांपैकी एकाला रेल्वेतर्फे रोजगाराचेही आश्वासन ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.
या घटनेनंतर सर्व रेल्वेमार्गांवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.

No comments: