Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 29 May, 2010

साहित्याद्वारेच भारतीय भाषांची ताकद सिद्ध करणे गरजेचेः डॉ. नूर

पुंडलिक नायक यांना 'गोमंत शारदा'पुरस्कार प्रदान
पणजी, दि.२८ (सांस्कृतिक प्रतिनिधी): इतर भाषांपेक्षा भारतीय भाषेत दर्जेदार चांगल्या प्रमाणात साहित्याची निर्मिती होत आहे. परंतु त्याचा अनुवाद जेवढ्या प्रमाणात व्हायला हवा, तेवढ्या प्रमाणात होत नसल्याने भारतीय साहित्याला जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत नाही. जागतिक स्तरावर इंग्रजी भाषेचा दबदबा असल्याने त्या भाषेतील साहित्याला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळते, त्याकरिता भारतीय भाषांतून निर्माण होणाऱ्या साहित्याच्या जोरावर भारतीय भाषांची ताकद सिध्द करणे आवश्यक आहे, असे पंजाबी भाषेतील सुप्रसिध्द लेखक कवी आणि राष्ट्रीय साहित्यिक केंद्राचे उपाध्यक्ष डॉ.एस.एस. नूर यांनी सांगितले. कला अकादमीने आयोजित केलेल्या गोमंत शारदा पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावर्षीचे पुरस्काराचे मानकरी गोमंतकीय ज्येष्ठ लेखक नाटककार आणि कवी पुंडलिक नायक यांना यावेळी शारदा पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर अकादमीचे उपाध्यक्ष परेश जोशी, सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई उपस्थित होते.
डॉ. नूर यांनी कला अकादमीतील वातावरण आणि निसर्गाची मुक्तकंठाने प्रशंसा करत पुढे सांगितले की, प्रत्येक भाषेमागे संस्कृती असते आणि त्यातूनच राष्ट्रीय संस्कृती तयार होत असते त्यामुळे कोणती भाषा किंवा संस्कृती नगण्य मानता येणार नाही. आज भारतातील जवळजवळ सर्वच विद्यापीठांतून इंग्रजी साहित्याचा तुलनात्मक साहित्य म्हणून वापर होत असतो, परंतु तसे न होता भारतीय साहित्याचा तुलनात्मक साहित्य म्हणून प्रत्येक विद्यापीठात अभ्यास होणे नितांत गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. आज जगात १५० कोटी लोक चिनी, ५१ कोटी इंग्रजी तर ४८ कोटी लोक हिंदी भाषा बोलतात तरीही जगात इंग्रजी भाषेचाच दबदबा जास्त आहे. दर्जेदार साहित्य आणि भाषेची ताकद सिध्द करण्याकरिता भाषेतील लिपी निश्चित होणे गरजेचे आहे. कारण कोणतेही साहित्य त्या भाषेतील लिपीत वाचल्यास त्याच प्रभाव चांगला पडतो म्हणूनच भाषेची लिपी जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत भाषेची ताकद निश्चित होत नाही, असेही ते म्हणाले. कुठल्याही लेखकाने कोणत्याही भाषेत लेखन करायला हरकत नाही, परंतु त्या भाषेतील लिपीत लिहिणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पुरस्काराचा स्वीकार केल्यावर बोलताना पुंडलिक नायक यांनी कला अकादमीचे आभार मानले. लेखकाने कसे असावे हे सांगताना त्यांनी म्हटले की लेखकाने स्वतःला लेखक म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे. तसे केल्यास त्याची संवेदना तीक्ष्ण होते. लेखकाकडे केवळ प्रतिभाच नसते तर प्रज्ञा असतेे कारण तो समाजाचा प्रतिनिधी असतो.कोणतीही घटना घटताना प्रत्येक माध्यम आपापले कार्य करत असतात परंतु लेखक म्हणून लेखकाने आपले कार्य करणे आवश्यक आहे. घटना घडून गेल्यावर त्यावर लिहून काहीच उपयोग नाही. घटना घडताना त्यात लेखकाचा भाग असणे गरजेच आहे. शेवटी त्यांनी या पुरस्काराप्रमाणे ललित कला आणि संगीत नाटक यांनाही असाच पुरस्कार जाहीर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात गोमंतकातील नामवंत गायिका प्रचला आमोणकर यांनी ईशस्तवन सादर करून केली. परेश जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर डॉ. फळदेसाई यांनी मानपत्राचे वाचन केले.
आपल्या निरंतर साहित्यसेवेद्वारे साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान करून गोव्याच्या कीर्तीत बहुमूल्य भर घालणाऱ्या गोमंतकीय साहित्यिकांसाठी देण्यात येणारा हा पुरस्कार या अगोदर बा.द. सातोस्कर, रवींद्र केळेकर, डॉ. मनोहर सरदेसाई आणि मनोहर ह. सरदेसाई, शंकर रामाणी, चंद्रकांत केणी, लॅंबर्ट मास्कारेन्हस यांना देण्यात आला होता. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह, मानचिन्ह आणि रू. एक लाखाचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ साकोर्डेकर यांनी केले तर डॉ. फळदेसाई यांनी आभार मानले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments: