Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 12 December, 2010

जकात खात्याची इमारत पर्वरी येथे जमीनदोस्त

सुदैवानेच प्राणहानी टळली
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): पर्वरी येथे जकातखात्याच्या निवासी वसाहतीतील देखभालीविना जीर्ण झालेली तीन मजली इमारत आज सकाळी पावणे सातच्या सुमारास अचानकपणे कोसळली. त्यामुळे या भागात एकच हलकल्लोळ उडाला. या इमारतीची धोकादायक स्थिती लक्षात घेऊन तेथे वास्तव्य करणार्‍या दोन कुटुंबांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच आपला बाडबिस्तरा अन्यत्र हालवल्याने सुदैवाने प्राणहानी टळली. याच इमारतीच्या दुसर्‍या बाजूला राहणार्‍या तीन कुटुंबांना मात्र या घटनेनंतर तात्काळ सदनिका खाली करण्याचे आदेश जारी करून संभावित धोका टाळण्यात आला.
या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार जकात खात्याच्या मालकीची ही निवासी वसाहत असून तिथे फार पूर्वीपासून कर्मचार्‍यांसाठी या सदनिका बांधण्यात आल्या आहेत. दरम्यान, या सदनिकांच्या देखभालीकडे मात्र खात्याने पूर्णपणे दुर्लक्ष चालवले आहे. या सदनिकांच्या देखभालीची जबाबदारी केंद्रीय बांधकाम खात्याकडे आहे, परंतु हे खाते केवळ रंगरंगोटी व ‘पॅचअप’ करून वेळ मारून नेत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली. आज अपघातग्रस्त झालेली इमारत अत्यंत धोकादायी बनली होती. ती कधीही कोसळू शकते हे लक्षात घेऊनच तेथे वास्तव्य करणार्‍या दोन कुटुंबांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच आपल्या सदनिका खाली केल्या होत्या. या वसाहतीत जीर्णावस्थेत असलेल्या अन्य एका इमारतीतील कुटुंबांनाही आजच्या घटनेनंतर बाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आज सकाळी या घटनेची माहिती मिळताच पर्वरी पोलिस व म्हापसा अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या धोकादायक इमारतीच्या दुसर्‍या बाजूला वास्तव्य करणार्‍या तीन कुटुंबांचे सामान तात्काळ बाहेर काढण्यात आले. स्थानिक नागरिकांनीही यावेळी सामाजिक जबाबदारी ओळखून मदतकार्यात हिरिरीने भाग घेतला. दोड्डामणी व प्रकाश राव तसेच अन्य एक कुटुंब या कोसळलेल्या इमारतीच्या दुसर्‍या बाजूला राहत होती. दोड्डामणी हे सकाळी पावणे सातच्या सुमारास दूध आणण्यासाठी गेले असता अचानक त्यांना इमारत कोसळत असल्याचे जाणवले. इमारत कोसळत असताना अचानक वरून मातीचा धूर येत असल्याचे पाहत असतानाच अचानक ‘घस्’ असा आवाज करीत या इमारतीचा स्लॅब खाली कोसळला. या क्षणी नेमके काय होते हेच आपल्याला कळले नाही. आपले कुटुंब इमारतीत होते व हा प्रकार पाहून आपल्याला रडूच कोसळले, असे दोड्डामणी म्हणाले. इमारत पूर्ण जमीनदोस्त झाली असती तर काय झाले असते याचा विचारही मनात आला की थरकाप उडतो, असेही ते म्हणाले. ही संपूर्ण इमारतच खाली कोसळळी असती तर अनर्थ घडला असता.
दरम्यान, या घटनेमुळे या वसाहतीतील धोकादायक इमारतींचा विषय आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या सदनिकांची बिकट अवस्था पाहता त्यात वास्तव्य करणार्‍या कुटुंबीयांच्या जिवाशी एक प्रकारे खेळ सुरू असल्याचेच उघड झाले आहे. या परिस्थितीकडे कुणाचेही लक्ष नसून या घटनेमुळे जकात खातेही खडबडून जागे झाले आहे. या धोकादायक इमारतीमुळे काही लोकांनी सदनिका खाली करूनही जकात खात्याकडून नव्या लोकांना या सदनिका बहाल करण्यात आल्याचीही खबर मिळाली आहे. या इमारतीची परिस्थिती पाहून या लोकांनी या सदनिकांचा ताबा घेतला नाही म्हणूनच त्यांचा जीव वाचला,अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
मनीष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दहा वर्षांपासून या इमारतींची कोणतीच देखभाल करण्यात आलेली नाही. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याकडे या इमारतींच्या देखभालीची जबाबदारी असून त्यांना अनेक निवेदने देऊनही कुणीही याची दखल घेण्यास राजी नसल्याचे ते म्हणाले. १९८२ च्या आसपास या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानंतर एकदाही या इमारतींची महत्त्वाची दुरुस्ती करण्यात आली नाही. म्हापसा अग्निशमन दल व पर्वरी पोलिसांनी यावेळी तत्परता दाखवून मदतकार्य केले.

No comments: