Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 15 December, 2010

कोणत्याही चौकशीस तयार

कोलवाळ भूखंड व्यवहारप्रकरणी
नीळकंठ हळर्णकर यांचे आव्हान

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): कोलवाळ गृहनिर्माण वसाहतीत भूखंड घोटाळ्याचा आपल्यावरील आरोप हा निव्वळ राजकीय आकसातून होत आहे. हा संपूर्ण व्यवहार पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने झाला असून त्याबाबतच्या कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार आहोत, असे आव्हान गृहनिर्माण खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी विरोधकांना दिले आहे.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो हे हजर होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे या प्रकरणी चौकशी करण्यासाठी ट्रॉजन डिमेलो यांची निवड केली होती. चौकशीअंती या प्रकरणांत काहीच काळेबेरे नसून हा व्यवहार पूर्ण पारदर्शक असल्याचे श्री. डिमेलो म्हणाले. याप्रकरणी अधिक माहिती त्यांनी पत्रकारांसमोर ठेवली. कोलवाळ गृहनिर्माण वसाहतीतील 'हळर्णकर चॅरिटेबल ट्रस्ट'च्या नावे गृहनिर्माण मंडळाकडून देण्यात आलेले भूखंड हे पूर्णपणे कायदेशीर आहेत. या भूखंडांचा वापर वैयक्तिक कारणांसाठी नसून त्यात शैक्षणिक संस्था उभारण्यात आली आहे. या ट्रस्टवरही श्री. हळर्णकर यांच्या कुटुंबातील कोणताच सदस्य नसून थिवी मतदारसंघातील इतर नागरिक असल्याचे ते म्हणाले. ते मंत्रिपदी ८ जून रोजी रुजू झाले व हा भूखंड १८ एप्रिल रोजी मंजूर झाला होता. दुसरा भूखंड हा देखील त्यांच्या मंत्रिपदापूर्वीच मंजूर झाला होता. केवळ याबाबतचा आदेश त्यांच्या कारकिर्दीत काढण्यात आला असता सदर बैठकीचे नेतृत्व गृहनिर्माण मंडळाचे सदस्य ऍड. अविनाश भोसले यांनी केले होते, असेही श्री. डिमेलो म्हणाले. या निर्णयात श्री. हळर्णकर यांनी अजिबात भाग घेतला नाही. मुख्य सचिव व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीच या भूखंडांना मंजुरी दिल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी श्री. हळर्णकर यांनी केंद्राने मंजूर केलेल्या व्यवस्थापन संस्थेसाठी कोलवाळात जागा देण्यात आपला वैयक्तिक काहीही फायदा नसल्याचे सांगितले. या भागातील विद्यार्थ्यांना या संस्थेचा लाभ मिळेल या उद्देशानेच दक्षिणेतील ही संस्था इथे उभारण्यासाठी आपले प्रयत्न चालले आहेत, असेही ते म्हणाले. शैक्षणिक संस्थेसाठीचा भूखंड १६०० रुपये प्रतिचौरसमीटर या बाजारभावानेच घेतला व दुसरा भूखंडही त्याच दरांत घेतला. दुसर्‍या भूखंडावेळी प्रत्यक्ष या भूखंडांचे दर ३ हजार प्रतिचौरसमीटर असले तरी हा भूखंड शैक्षणिक संस्थेसाठी असल्याने त्याला विशेष सूट म्हणून १६०० रुपये प्रतीचौरसमीटर दर आकारण्यात आला. हा भूखंड घेतेवेळी कोलवाळात ३ हजार रुपये चौरसमीटर दराने एकही भूखंड देण्यात आला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या कामाच्या धडाडीमुळे वैफल्यग्रस्त बनलेल्या लोकांनी कितीही आगपाखड केली तरी थिवीवासीयांना सत्य माहीत आहे, असा टोलाही यावेळी श्री. हळर्णकर यांनी हाणला.

No comments: