Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 12 December, 2010

हिंदू संघटनांकडून करकरेंच्या जीवास धोका होता : दिग्विजय

नवी दिल्ली, दि. ११: काही हिंदू संघटनांकडून स्वतःच्या जीवाला धोका असल्याची माहिती तत्कालीन महाराष्ट्र ‘एटीएस’चे प्रमुख हेमंत करकरे यांनी २६/११ च्या हल्ल्याच्या काही तास अगोदर आपल्याला दिली होती, असे विधान कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी करून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या या विधानावर भारतीय जनता पक्षाने प्रखर टीका केली आहे.
‘२६/११ ला सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान हेमंत करकरे यांच्याशी माझी चर्चा झाली होती. त्याचदिवशी रात्री करकरे शहीद झाल्याचे ऐकून मला धक्काच बसला होता,’ असे दिग्विजयसिंग यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मालेगाव बॉम्बस्फोटात काही हिंदुत्ववादी संघटनांच्या लोकांविरुद्ध तपास करत असल्याने आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी मला सांगितले होते. आपल्याला धमक्या देणारे काही दूरध्वनी येत आहेत. मात्र, ते कोणाकडून येत आहेत हे आपल्याला माहिती नसल्याचे करकरे यांनी मला सांगितले होते. करकरे यांच्या मुलाला दुबईतून एक ५० कोटींचे कंत्राट मिळाले असल्याचा आरोप करणारा एक लेख रा. स्व. संघाशी संबंध असणार्‍या एका मासिकात छापून आला होता, असेही दिग्विजयसिंग यांनी यावेळी सांगितले.
भाजपा नेते राजनाथसिंग यांच्यासह अनेक जण आपल्या प्रामाणिकपणाबद्दल संशय घेत असल्याने आपण व्यथित झालो असल्याचेही करकरे यांनी सांगितल्याचा दावा दिग्विजयसिंग यांनी केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी काही जणांना अटक केल्याबद्दल करकरे यांचे अभिनंदन केल्यानंतर आमच्या दोघांमध्ये जवळीक वाढली होती, असेही दिग्विजयसिंग यांनी पुढे सांगितले.

अफझल गुरूला त्वरित फाशी द्या
नवी दिल्ली, दि. ११: भारतीय लोकशाहीचे मंदिर असणार्‍या संसदभवनावर अतिरेकी हल्ल्याचा कट रचणार्‍या अफझल गुरूला तात्काळ फासावर लटकवून याप्रकरणी आपण गंभीर असल्याचे सरकारने दाखवून द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय दहशतवादविरोधी मंचाचे अध्यक्ष एम. एस. बिट्टा यांनी आज केली आहे.
२६/११ आणि वाराणसी स्फोटासारख्या घटना अजूनही घडत आहेत. मग सरकारच्या दहशतवादविरोधी लढाईला काय अर्थ आहे, असा सवाल बिट्टा यांनी १३ डिसेेंबर २००१ रोजी संसदेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबियांनी काढलेल्या निषेध मोर्चाला संबोधित करताना सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करत अफझल गुरूला १३ डिसेंबरलाच फासावर लटकवा, अशी मागणी बिट्टा यांनी यावेळी केली.
आपल्या या मागणीच्या समर्थनार्थ बिट्टा यांनी आज आपले कार्यकर्ते आणि पीडित कुटुंबातील सदस्यांसह दिल्लीस्थित जंतरमंतर येथे निदर्शने केली.

अफगाणिस्तानातील बॉंबस्फोटात १५ ठार
कंदाहर, दि. ११ : दक्षिण अफगाणिस्तानमध्ये रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या बॉम्बचा भीषण स्फोट झाल्याने एका मुलासह १५ नागरिक ठार झाले असून, तालिबानी अतिरेक्यांनी हा स्फोट घडवून आणला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
हेलमांड प्रांतातील खैराबाद येथून खानसिन या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवाशांना घेऊन जात असलेल्या एका ट्रकला अतिरेक्यांनी आपले लक्ष्य केले. काल रात्री झालेल्या या घटनेत अतिरेक्यांनी गावठी बॉम्बचा उपयोग केला, असे या प्रांताचे प्रवक्ते दाऊद अहमदी यांनी एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या स्फोटात आणखी चार जण जखमी झाले आहेत.

बेजबाबदारपणाचा कळस भाजपची प्रखर टीका
नवी दिल्ली, दि. ११ : मुंबईवरील २६|११ च्या हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन महाराष्ट्र ‘एटीएस’चे प्रमुख हेमंत करकरे यांच्याविषयी कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी केलेले विधान अत्यंत बेजबाबदारपणाचे असून, दहशतविरोधात भारताने सुरू केलेल्या लढाईला त्यामुळे जबर धक्का बसल्याची प्रखर टीका भाजपने केली आहे.
दिग्विजयसिंग यांनी केलेल्या या बेजबाबदार वक्तव्यप्रकरणी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि कॉंग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी आज केली आहे. दिग्विजयसिंग यांचे हे विधान अत्यंत दुर्दैवी असून त्यामुळे देशाची सुरक्षा आणि मुंबई हल्ल्याच्या तपासाला
जबर धक्का बसला आहे. दिग्विजयसिंग यांच्या या वक्तव्यामुळे सीमेपलीकडील दहशतवाद्यांना आयते कोलित हाती लागले असून, आता ते २६/११ च्या हल्ल्याबाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण करू शकतात, असे प्रसाद यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भ्रष्टाचारात आकंठ बुडाल्याने अडचणीत आलेल्या कॉंग्रेस आणि ‘संपुआ’ सरकारपासून सामान्य जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा दिग्विजयसिंग यांनी जाणीवपूर्वक केलेला हा प्रयत्न आहे, असा आरोपही प्रसाद यांनी केला. कॉंग्रेसमध्ये एकाकी पडल्याने लक्ष वेधण्याचा दिग्विजयसिंग यांचा हा प्रयत्न आहेे. देशाची सुरक्षितता धोक्यात आणून प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा दिग्विजयसिंग यांनी यासाठी वेगळ्या मार्गांचा अवलंब करावा, असा सल्लाही प्रसाद यांनी यावेळी दिला.

No comments: