Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 12 December, 2010

२६/११ नंतर कॉंग्रेसने धर्माचे राजकारण केले

विकिलिक्सने केला सनसनाटी गौप्यस्फोट
वॉशिंग्टन, दि. ११ : मुंबईवर २६/११रोजी झालेल्या हल्ल्यात काही हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याच्या बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या विधानाचा हवाला देत कॉंग्रेस नेतृत्वाने देशात धर्माचे राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट ‘विकिलिक्स’ या वेबसाईटने अमेरिकेच्या गोपनीय कागदपत्रांच्या आधारे केला आहे.
‘तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री ए. आर. अंतुले यांनी हे वादग्रस्त विधान केल्यानंतर प्रथम कॉंग्रेसने स्वत:ला त्यापासून दूर ठेवले. मात्र, दोनच दिवसांनंतर या विधानाला छेद देणारे विधान करून अंतुले यांच्या विधानाला पाठिंबा दिला. त्यावेळी अंतुले यांच्या वादग्रस्त विधानाला भारतीय मुस्लिम समाजाकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला होता’, असे अमेरिकेचे भारतातील तत्कालीन राजदूत डेव्हिड मलफोर्ड यांनी २३ डिसेेंबर २००८ ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला पाठविलेल्या केबलमध्ये म्हटले आहे, असा गौप्यस्फोट विकिलिक्सने केला आहे. या गोष्टीचा २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत फायदा मिळेल, असा विचार करून कॉंग्रेसने प्रथम खंडन केल्यानंतर पुन्हा या विधानाला पाठिंबा दिला, असेही मलफोर्ड यांनी पुढे म्हटले असल्याचे विकिलिक्सच्या खुलाशावरून स्पष्ट होत आहे.
केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम् यांनी अंतुले यांच्या विधानाचे स्पष्टपणे खंडन केल्यानंतरही सुरक्षा यंत्रणा आपल्याला उगाचच लक्ष्य करत असल्याची भावना मुस्लिम समुदायाच्या मनात राहील आणि पर्यायाने याचा फायदा निवडणुकीत आपल्याला मिळेल, असा कॉंग्रेसचा विचार होता. जाती आणि धर्मावर आधारित राजकारण आपल्या हिताचे असेल तर कॉंग्रेस पक्ष स्वत:ला त्यामध्ये पूर्णपणे झोकून देतो, असेच या संपूर्ण घटनाक्रमावरून सिद्ध होत असल्याचे डेव्हिड मलफोर्ड यांनी पाठविलेल्या केबलमध्ये म्हटले असल्याचे, विकिलिक्सने काल आपल्या वेबसाईटवर केलेल्या खुलाशात म्हटले आहे.
अमेरिकेच्या नवी दिल्ली येथील दूतावासाकडून पाठविण्यात आलेल्या १३०० केबल्स आपल्याकडे असल्याचा दावा विकिलिक्सने केला आहे. मात्र, यापैकी फक्त सहाच केबल वेबसाईटवर सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. २६/११ च्या मुंबई हल्ल्यात तीन वरिष्ठ पोलिस अधिकारी शहीद होणे हा केवळ योगायोग असल्याचे कॉंग्रेसने पहिले म्हटले होते. परंतु, अंतुले यांच्या विधानाला पाठिंबा मिळत असल्याचे ध्यानात आल्यानंतर कॉंग्रेस पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांना याचा राजकीय फायदा घेण्याची कल्पना सुचली. या हल्ल्यापूर्वी झालेल्या काही विधानासभांच्या निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतरही कॉंग्रेसने मुंबई हल्ल्यासंदर्भात एक संशयाचे वातावरण तयार करून स्वार्थी राजकारण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली, असे मलफोर्ड यांनी पाठविलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.

No comments: