Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 18 December, 2010

जुझे व नीळकंठ यांचे पक्षश्रेष्ठींनाच आव्हान

प्रसंगी बंडाचीही तयारी

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते महसूलमंत्री जुझे फिलप डिसोझा व पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास स्पष्टपणे नकार दर्शवत पक्षश्रेष्ठींनाच जाहीर आव्हान दिले आहे. याविषयी पक्षश्रेष्ठींची भेट घेण्याचेही त्यांनी ठरवले आहे. डॉ. प्रफुल्ल हेदे हे मिकी पाशेको यांची बाजू सांभाळीत असल्याने त्यांच्यामार्फत हा आदेश स्वीकारण्यासही या उभयतांनी नकार दर्शवल्याची खबर मिळाली आहे.
आज दिवसभरात राज्यात राजकीय चर्चेला बराच ऊत आला होता. सकाळी बोलावण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीला जुझे फिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर हे उपस्थित राहिले. तदनंतर दोघाही मंत्र्यांनी विविध कॉंग्रेस मंत्र्यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केल्याचीही खबर आहे. मिकी पाशेको यांनी पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी दिल्लीत राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडे जबरदस्त लॉबींग चालवल्याचीही चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मात्र या सर्व प्रकाराबाबत आपण अनभिज्ञ असल्याचाच पवित्रा घेतला.
दरम्यान, श्री. पाशेको यांचा मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यास बहुतांश कॉंग्रेस मंत्री तथा आमदारांनीही हरकत घेतल्याचा संदेश दिल्लीत कॉंग्रेस श्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. दिल्लीत कॉंग्रेस श्रेष्ठींकडून ही माहिती राष्ट्रवादी श्रेष्ठींकडे पोहोचवली आहे. केंद्रीय विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही पाशेको यांच्यासाठी जोरदार प्रयत्न चालवल्याची खबर आहे. पाशेको यांच्यासाठी राष्ट्रवादी श्रेष्ठींनी दबावतंत्राचा वापर केल्यास राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीलाही धोका पोहोचण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस श्रेष्ठींनी जबरदस्तीने मंत्रिपद काढून घेण्याचे ठरवल्यास पक्षांतर्गत बंड करण्याची तयारीही उभयतांनी केल्याचेही बोलले जाते. पक्षांतर्गत वेगळा गट स्थापन करून सरकारला पाठिंबा देण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस समितीचा पाठिंबा दोन्ही मंत्र्यांना आहे पण अद्याप त्यांनीही उघड भूमिका घेणे टाळले आहे. हा विषय श्रेष्ठींच्या अखत्यारीत असल्याने त्याबाबतचा निर्णय तेच घेतील, अशी भूमिका पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी घेतल्याचीही खबर आहे.

No comments: