Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 1 November, 2010

मडगावात दोन ठिकाणी चकमक

मडगाव, दि. ३१ (प्रतिनिधी) : मडगावात कुप्रसिध्द मोती डोंगरावर व कालकोंडे प्रभागातील राजेंद्र प्रसाद स्टेडियमजवळील कृषी केंद्र मतदार केंद्रात झालेल्या दोन भिन्न गटांतील चकमकी हे आजच्या नगरपालिका निवडणुकांसाठी झालेल्या चुरशीच्या मतदानाचे वैशिष्ट्य ठरले, त्या वगळता शांततापूर्ण मतदान झाले. सकाळपासूनच बहुतेक सर्व मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या, त्या दुपारचा निवांतपणा सोडला तर सायंकाळपर्यंत कायम राहिल्या. मतदान संपूर्ण शांततेने व अनुचित प्रकाराविना झाल्याचे मामलेदार परेश फळदेसाई यांनी सांगितले.
सकाळी प्रभाग १६ मधील राजेंद्र प्रसाद स्टेडियमजवळील कृषी केंद्र मतदारसंघालगत असीफ शेख व खुशाली विर्डीकर यांच्यात बाचाबाची झाली व त्याची परिणती हातघाईत होऊन उभयतांनी परस्परांविरुद्ध पोलिसांत तक्रारी नोंदविल्या आहेत. मात्र मतदान प्रक्रिया आटोपल्यावर मोतीडोंगर भागात दोन गटांत चकमक उडाल्याने पोलिसांना तेथे धाव घ्यावी लागली व रात्री उशिरापर्यंत अनेक पोलिस अधिकारी तेथे तळ ठोकून होते.
मिळालेल्या माहितीनुसार तेथील रहिवाशांत या निवडणुकीतून दोन तट पडलेले असून एका गटांतील मुलगा सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जात असताना तेथे बसलेल्या प्रतिस्पर्धी गटातील काहींनी त्याला उद्देशून अपशब्द वापरले व त्याने त्याच भाषेत त्याला उत्तर दिले असता त्यांनी त्याला ओढून खाली पाडले व त्याच्यावर कसल्या तरी द्रव्याचा भपकारा मारला. त्यामुळे तो बेशुद्ध पडल्यावर त्याचे लोक धावून आले असता झालेल्या हल्ल्यात तिघे जखमी झाले. या प्रकरणी पोलिस तक्रार झाली नव्हती.
नंतर तेथे गोंधळ माजला व वातावरण तंग बनत असल्याचे पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले. दुसरीकडे त्या मुलाला हॉस्पिसियोत नेण्यात आले. तो शुध्दीवर आल्यावर त्याला घरी जाऊ देण्यात आले. एवढा सारा प्रकार होऊनही पोलिस गुन्हा मात्र नोंदविला गेला नव्हता.
मोतीडोंगर हा स्थलांतरितांचा सवतासुभा असून आजवर तो मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण या नगरपालिका निवडणुकीने त्याला छेद दिला होता. तेथील मुस्लिमांच्या एका गटाने आपला वेगळा उमेदवार उभा केला होता व त्यामुळे तेथील मतभेदांची परिणती शांतताभंगात होऊ नये म्हणून तेथील मतदान केंद्र संवेदनक्षम जाहीर करून तेथे सशस्त्र पोलिस तुकडी तैनात केली होती. परंतु मतदान आटोपल्यावर ती परत फिरली व त्यानंतर हे उभयता गट संघर्षास सज्ज झाल्याने पोलिसांची धावपळ उडाली.
यावेळी सत्ताधारी कॉंग्रेसचे अनेक उमेदवार विविध प्रभागांतून परस्परांविरुद्ध उभे ठाकल्याने व त्यातील काहींना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा आशीर्वाद लाभलेला असल्याने तेथील मतदान चुरशीचे झाले. त्यातील एका प्रभागांत तर मुख्यमंत्र्यांचा एक जवळचा नातेवाईकही रिंगणात आहे. आके, बोर्डा, कालकोंडे, घोगळ गृहनिर्माण मंडळ सारख्या मतदान केंद्रांवर दिवसभर मतदारांच्या रांगा दिसून आल्या.
प्रभाग छोटे छोटे असल्याने मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे म्हणूनही बरेच प्रयत्न झाले व त्यामुळेच मतदानात उत्साह दिसून आला. काही ठिकाणी मतदारांना आणण्यासाठी वाहनांचा वापर करण्यात आला. मुस्लिम मतदार यावेळी मोठ्या संख्येने बाहेर पडलेलेही पहायला मिळाले.
बहुतेक सर्व मतदान केंद्रांबाहेर कडक बंदोबस्त ठेवला गेलेला आढळून आला. आके, बोर्डा मल्टिपर्पज हायस्कूल केंद्राबाहेर वाढता लोकजमाव व त्यामुळे वाहतूक खोळंबत आहे ते पाहून संपूर्ण रस्त्यावर पोलिस तैनात करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक ऍलन डिसा व उपअधीक्षक उमेश गावकर यांनी एकंदर परिस्थितीवर जातीने लक्ष ठेवले होते. कोणत्याही प्रसंगाचा सामना करण्यासाठी एक पोलिस तुकडी सज्ज ठेवली होती पण तिचा वापर करण्याची पाळीच आली नाही.
आज मतदान प्रक्रिया आटोपल्यावर पत्रकारांशी बोलताना फातोर्डाचे आमदार दामू नाईक यांनी भाजप प्रणीत पॅनल पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल अशी खात्री व्यक्त केली तर पंचायतमंत्री बाबू आजगावकर यांनी संमिश्र पालिकामंडळ सत्तेवर येईल असे सांगितले. मावळते नगराध्यक्ष साव्हियो कुतिन्हो यांनी मात्र निकालाबाबत बोलण्याचे टाळले.
सायंकाळी उशिरापर्यंत मडगाव तसेच कुंकळ्ळीतील मतपेट्या आणून येथील मल्टिपर्पज हायस्कूलमधील स्ट्रॉंगरुममध्ये ठेवण्यात आल्या. तेथे उद्या सकाळी मतमोजणी सुरू होईल.

No comments: