Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 3 November, 2010

महामार्ग : सरकारला २३ पर्यंत मुदत


महामार्ग बदल कृती समितीचा इशारा
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांद्वारे विषय स्तरावर पोचवू
शेकडो आंदोलनकर्त्यांची राजधानीवर जोरदार धडक
पोलिस फौजफाटा निष्फळ वाहतुकीचा पुन्हा खोळंबा

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाला विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी आज सरकारने लागू केलेला जमावबंदीचा आदेश झुगारून राजधानीवर जोरदार धडक दिली. नियोजित महामार्गाचा मार्ग बदलण्यासाठी येत्या २३ नोव्हेंबर पर्यंत राज्य सरकारला अंतिम मुदत देण्यात आली आहे. अन्यथा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गोव्यात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमांच्या साह्याने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय मांडून न्याय मागण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे राष्ट्रीय महामार्ग बदल कृती समितीचे निमंत्रक सुनील देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
आझाद मैदानावरून शेकडोंच्या संख्येने सचिवालयावर चाल करू निघालेल्या आंदोलनकर्त्यांना जुन्या मांडवी पुलावर अडवल्यानंतर त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी जुना मांडवी पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. तर, आंदोलकांवर ताबा मिळवण्यासाठी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांच्यासह उत्तर गोव्यात सर्व उपअधीक्षक व निरीक्षक जातीने हजर होते. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी कामत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
नियोजित महामार्गासाठी लोकांची घरे पाडण्याची तरतूद असलेला राष्ट्रीय महामार्गाचा आराखडा बदलला जात नाही तोवर हा लढा असाच सुरू ठेवला जाणार आहे. येत्या एका महिन्यात गावागावांत बैठका घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर मडगाव शहरात मोर्चा काढला जाणार असल्याचे यावेळी श्री. देसाई यांनी सांगितले. आजच्या मोर्चात भारतीय जनता पार्टीचे उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक, आमदार दामू नाईक, दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक, फ्रान्सिस डिसोझा, वासुदेव मेंग गावकर, दिलीप परुळेकर, अनंत शेट, भाजप गोवा प्रदेश सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर, माजी सभापती विश्वास सतरकर, माजी आमदार विनय तेंडुलकर सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना खासदार श्रीपाद नाईक म्हणाले की, लोकांच्या घरावर बुलडोझर फिरवून राष्ट्रीय महामार्ग उभारणाऱ्यांना हा महामार्ग करण्यात रस नाही तर, त्यासाठी खर्ची पडणाऱ्या ११ हजार कोटी रुपयांचे वाटे त्यांना घालायचे आहेत. हा महामार्ग गोमंतकीयांना संपवण्याचे षड्यंत्र असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. येथील कॉंग्रेस सरकारने गोवा हा जुगाराचा अड्डा बनवला आहे. ड्रग्स, वेश्या व्यवसाय राज्यात फोफावत आहे, याची लाज वाटत असल्याचे ते पुढे बोलताना म्हणाले.
गरीब लोकांची घरे पाडून साकारल्या जाणाऱ्या महामार्गाच्या मागे केंद्रीय मंत्री कमलनाथ यांचा महाघोटाळा आहे, अशी टीका आमदार महादेव नाईक यांनी केली. राष्ट्रीय महामार्गाच्या विरोधात उडालेल्या ठिणगीची आग पेटली पाहिजे, असे ते पुढे म्हणाले. यावेळी माजी पर्यटन मंत्री माथानी साल्ढाणा बोलताना म्हणाले की, शहर आणि गावाच्या हद्दीबाहेरून हा महामार्ग नेला जावा. राष्ट्रीय महामार्गाला कोणाचाही विरोध नाही. परंतु, तो लोकांची घरे न पाडता झाला पाहिजे. चिल्लर पैसेे देऊन महामार्गासाठी लोकांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या खाजगी कंपन्यांना विकण्याचा सरकारचा डाव आहे. या सरकारला यापुढे कधीच मत देणार नाही, असा निश्चय करण्याचे आवाहन यावेळी श्री. साल्ढाणा यांनी केले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या कार्यकाळात गोव्यातील जनता रस्त्यावर उतरली नाही असा एकही दिवस नाही, अशी जोरदार टीका यावेळी डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी केली. मोर्चात सहभागी झालेल्या सर्व जनतेचे गोव्यावर प्रेम आहे म्हणून ते येथे जमले आहेत. मुख्यमंत्री कामत यांना गोव्याचे सोयरसुतक नाही. केवळ पैसाच कमवला जात आहे, अशी टीका डॉ. रिबेलो यांनी केली. या लोकांना केवळ ११ हजार कोटी दिसत आहे. हा विकास नसून हा विध्वंस असल्याचे ते पुढे म्हणाले.
वारसा स्थळापासून ३०० मीटर पर्यंत महामार्ग न बनवण्याचा कायदा असताना केंद्र सरकार हा महामार्ग बनवूच शकत नाही, असे स्पष्ट करताना सरकारने तसे केल्यास त्याच्या विरुद्ध न्यायालयीन लढा देऊ असे, प्रा. प्रजल साखरदांडे यांनी स्पष्ट केले. या महामार्गावर वाहने चालवणाऱ्या लोकांना दरमहा दोन हजार रुपये केवळ "टोल' देण्यासाठी खर्च करावे लागणार आहेत. याला सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव आणि मुख्यमंत्री दिगंबर कामत जबाबदार असल्याचा आरोप माजी मंत्री फातिमा डिसा यांनी केला.
यावेळी कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, उसगाव चर्चचे फा. लोबो, साफा मशिदीचे अध्यक्ष मूर्तझा, ऍड. सतीश सोनक यांची भाषणे झाली.
-----------------------------------------------------------------
मोर्चामुळे जुना मांडवी पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने सर्व वाहतूक नव्या मांडवी पुलावर वळवण्यात आली होती. असे असतानाही दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत पणजी शहरात वाहनांची कोंडी झाली होती. एका वाहनाला पणजी बाजार ते मांडवी पूल पार करण्यासाठी तब्बल ४५ मिनिटांचा कालावधी लागत होता. सायंकाळी ५.३० वाजता सरकारी कार्यालये सुटल्यानंतर यात अधिकच भर पडली.
--------------------------------------------------------------------
१४४ कलमाची फजिती
मोर्चाची हवा काढण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या जमावबंदीला न जुमानता पणजी शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरांची संख्या पाहून पोलिसांनी सावध पवित्रा घेतला. त्यातच बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांनी १४४ कलमाची तमा न बाळगता मोर्चा काढून निदर्शने केली.

No comments: