Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 3 November, 2010

ऑल इज नॉट वेल...

'जीसीए'च्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): फातोर्डा मैदानावरील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतीक्षित सामना लोकांची सपशेल निराशा करून रद्द झालेला असला तरी त्यानंतरचे कवित्व मात्र संपण्याचे नाव घेत नाही, अशीच परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे. आज (दि. २) घडलेल्या एका महत्त्वपूर्ण घडामोडीत गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) व्यवस्थापकीय समितीच्या कार्यकारी सदस्यांनी तडकाफडकी आपले राजीनामे संघटनेचे अध्यक्ष दयानंद नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केले. तीन उपाध्यक्ष, तीन सहसचिव, सचिव आणि खजिनदार यांचा यात समावेश आहे.
कार्यकारी मंडळाची पुनर्रचना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे जरी वरवर बोलले जात असले तरी भारत - ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान घडलेल्या तिकिटांवरील आसनक्रमांकांच्या घोळामुळेच जीसीएचे अध्यक्ष दयानंद नार्वेकर यांनी मंडळाला आपले राजीनामे सुपूर्द करण्याचा आदेश दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी एकदा तिकीट घोटाळाप्रकरणी जीसीएची भयंकर बदनामी झाली होती. त्यामुळे बऱ्याच कष्टाने मिळालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या सामन्यात यशस्वी आयोजनाचे प्रात्यक्षिक दर्शविण्याचा नार्वेकर यांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी सर्वांना जबाबदाऱ्यांचे पद्धतशीरपणे वाटप केले होते व अतिशय काटेकोरपणे आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र असे असतानाही पुन्हा एकदा तिकिटांच्या बाबतीतच घोळ निर्माण झाला. एकाच क्रमांकाची दोन तिकिटे समोर आल्याने जीसीए पुन्हा वादात सापडली. या घटनेनंतर नार्वेकर यांनी तडकाफडकी पत्रकार परिषद घेऊन संबंधितांना स्पष्टीकरण देण्यास भाग पाडले. मात्र तरीही त्यांची नाराजी मात्र दूर होऊ शकली नाही, असे सूत्रांनी सांगितले. खरे म्हणजे एकाच क्रमांकाची दोन तिकिटे आपण पाहिली असल्याची खबर एका स्वयंसेवकाने जीसीएच्या संबंधित पदाधिकाऱ्याला दिली होती. मात्र त्या पदाधिकाऱ्याने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. या हलगर्जीपणामुळेच गोवा क्रिकेट संघटनेची पुन्हा एकदा बदनामी झाली असल्याचा नार्वेकर यांचा ग्रह झाला आहे. त्यामुळे जबाबदारीत हलगर्जीपणा करणाऱ्या "त्या' पदाधिकाऱ्यावर कारवाई अटळ असल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्ष कारवाईचे स्वरूप काय असेल हे जरी सांगता येत नसले तरी जीसीएच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिलेले राजीनामे ही या कारवाईची सुरुवात असल्याचे मानले जाते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दोन किंवा तीन पदाधिकारी गोत्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, "जीसीए'चे सचिव प्रसाद फातर्पेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, कार्यकारी मंडळाच्या मते सध्या गोवा क्रिकेट असोसिएशन एका कठीण परिस्थितीतून जात आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांत बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच हे राजीनामे देण्यात आल्याचे पत्रकात म्हटले गेले आहे. मात्र कार्यकारी सदस्यांनी संघटनेचे अध्यक्ष दयानंद नार्वेकर यांच्यावर संपूर्ण विश्वास दर्शवला आहे.

No comments: