Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 4 November, 2010

सोनेरी किनारे बनले "कोकेन कोस्ट'

"इंडिया टुडे'कडून गोव्याचे धिंडवडे

पणजी, दि.३ (प्रतिनिधी) - "इंडिया टुडे' या लोकप्रिय मासिकाच्या नोव्हेंबर महिन्याच्या अंकात, एकेकाळी सोनेरी किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेला गोवा आता "कोकेन कोस्ट' बनल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. "गोवा, सेक्स ऍण्ड माफिया ऑन कोकेन कोस्ट' या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली "कव्हर स्टोरी' राज्यातील पोलिस, राजकारणी व ड्रग माफियांचे साटेलोटे प्रकरणावर नव्याने प्रकाश टाकणारी ठरली आहे. राजकीय आश्रयाखाली राज्यात अंमलीपदार्थांच्या तस्करीचा व्यवहार फोफावतो आहे. राज्याचे गृहमंत्री व त्यांचे पुत्र यांच्यावरच संशयाचे ढग असताना कॉंग्रेस आघाडी सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा ठपका या माहितीत उघड करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावरील नामांकित मासिकात प्रसिद्ध झालेल्या या माहितीमुळे राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारने आपली पत घालवली आहेच; परंतु दिल्लीतील कॉंग्रेस श्रेष्ठींना जरासुद्धा गोव्याची चाड असेल तर त्यांनी या वृत्ताची दखल घेऊन गृहमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडावे, असे जाहीर आव्हान भाजपने केले आहे.
कधीकाळी विविध क्षेत्रात गोव्याने केलेली प्रगती व विकास याची दखल घेऊन या राज्याला पुरस्काराने सन्मानित केलेल्या "इंडिया टुडे' समूहाच्या मासिकात गोव्याची अधोगती दर्शवणारीच ही माहिती प्रसिद्ध झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या माहितीमुळे कॉंग्रेस आघाडी सरकारचे अपयश अधोरेखित तर झाले आहेच; परंतु राज्याच्या अनिर्बंध व बेफाम पर्यटनाचे वाभाडे संपूर्ण जगभर पसरल्याने त्याचा फटका पर्यटन उद्योगाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गोव्याच्या किनारी भागात पहारा देणारे अपुरे पोलिस मनुष्यबळ व वर्षाकाठी सुमारे ८०० चार्टर विमानांतून येणारे पर्यटन यामुळे अंमलीपदार्थांचे सेवन बिनदिक्कत करण्याची मोकळीकच पर्यटकांना इथे प्राप्त होते, असे या माहितीत म्हटले आहे. पोलिसांनी जप्त केलेला आपल्याच गोदामातीलच माल ड्रग माफियांना विकला जातो हे देखील उघड झाल्याने पोलिस व गुन्हेगारांचे साटेलोटेही उघड होतात, याची आठवणही करून देण्यात आली आहे. राज्यात सुमारे ४०० विदेशी नागरिकांच्या बेकायदेशीररीत्या जमीन खरेदी प्रकरणांची चौकशी "एन्फोर्समेंट' संचालनालयाकडून सुरू आहे. पोलिसांनी अटक केलेला ड्रग माफिया अटाला व त्याची प्रेयसी लकी फार्महाऊस हिने यू ट्यूबच्या साहाय्याने उघड केलेल्या माहितीचा आढावा या वृत्तात घेण्यात आला आहे. या एकूण प्रकरणाच्या चौकशीबाबत उच्च न्यायालयाने ओढलेले ताशेरे व थेट राजकीय हस्तक्षेपाचा ठपका राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारच्या प्रशासकीय अपयशाचेच उदाहरण म्हणावे लागेल.
दरम्यान, राज्यातील समुद्र किनारे हे गुन्हेगारांचे अड्डेच बनल्याचा ठपकाही या माहितीत ठेवण्यात आला आहे. राज्यात १५०० नायजेरीयन, ५००० इस्रायली, ८००० ब्रिटिश व सुमारे १०,००० रशियन स्थायिक झाल्याची माहितीही देण्यात आली आहे. या लोकांनी काही ठरावीक किनाऱ्यांवर कब्जा करून त्यावर आपले अधिराज्य प्रस्थापित केल्याचे म्हटले आहे. राज्यात वर्षाकाठी २१.२७ लाख देशी पर्यटक, ३.७६ लाख विदेशी पर्यटक भेट देतात. २००८ पासून एकूण ५८ विदेशींना ड्रग व्यवहार प्रकरणी पोलिसांनी अटक केली तर ६९ भारतीयांना ताब्यात घेण्यात आले. रशियन व इस्रायली यांच्यात ड्रग व्यवहाराचा ताबा आपल्या हातात ठेवण्यावरून जीवघेणी स्पर्धा सुरू असल्याचे याच नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, गृहमंत्री रवी नाईक व त्यांचे पुत्र रॉय नाईक यांच्याबाबतही या मासिकात माहिती पुरवण्यात आली असून ड्रग प्रकरणाचा संपूर्ण आढावाच घेण्यात आला आहे. राज्यात ड्रग व्यवहार चालतच नाही, हा गृहमंत्र्यांचा दावा व त्यानंतर पोलिसांची कारवाई याचाही संदर्भ यात घेण्यात आल्याने उघडपणे या व्यवहाराकडे राज्य शासनाचे कशा पद्धतीने दुर्लक्ष सुरू आहे व पोलिस कशा पद्धतीने राजकीय दबावाखाली ही प्रकरणे हाताळत आहेत, याची माहितीही देण्यात आली आहे.

No comments: