Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 24 October, 2009

कामत सरकारची संवेदना बोथट


पर्रीकर कडाडले

त्या ५२ शिक्षकांचे उपोषण सुरूच

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)- विद्यमान सरकारची सर्वसामान्य जनतेबद्दलची संवेदना पूर्णपणे बोथट झाल्याचा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला. गोवा लोकसेवा आयोगाने गुणवत्ता व पात्रतेच्या आधारावर "५२' शिक्षकांची शिफारस सरकारकडे करून आता चार महिने उलटले तरी अद्याप त्यांची नियुक्ती होत नाही. केवळ मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्र्यांनी केलेल्या शिफारशींचा या यादीत समावेश झाला नाही म्हणून या भावी शिक्षकांच्या नियुक्तीला खो घालणे हा अत्यंत निंदनीय व घृणास्पद प्रकार असून भाजपचा या उमेदवारांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असेल, असे आश्वासन पर्रीकर यांनी दिले.
एकीकडे शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात हे ही यादी आपल्याला मान्य असल्याचे सांगतात तर दुसरीकडे मुख्यमंत्री दिगंबर कामत ही यादी नाकारतात. लोकसेवा आयोगावरच विश्वास नाही तर हा आयोगच गुंडाळा, असेही पर्रीकर यावेळी म्हणाले. आयोगाची शिफारस मान्य करणे किंवा फेटाळणे याचा अधिकार सरकारला असतो हे खरे पण नाकारताना त्यासाठी सबळ कारणे देण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांना ही यादी मान्य नसेल तर त्यांनी त्याची सबळ कारणे द्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले. या शिक्षकांच्या बाबतीत आणखी वेळ न दवडता सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा व त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या शिक्षकांना आता सर्व थरांतून पाठिंबा मिळत आहे. आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्यासह भाजप आमदार फ्रान्सिस डिसोझा, दामोदर नाईक, दयानंद मांद्रेकर आदींनी या शिक्षकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. राष्ट्रवादी युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष राजन घाटे व राजेंद्र साटेलकर यांनी त्यांची भेट घेतली. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक तथा स्वातंत्र्यसैनिक रवींद्र केळेकर यांनी याठिकाणी भेट देऊन या उमेदवारांना चकितच करून टाकले. श्री. केळेकर यांच्या उपस्थितीने उपोषणाला बसलेल्या उमेदवारांच्या डोळ्यांतून आपोआपच अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. भावी पिढीला सत्याचा मार्ग शिकवण्याची जबाबदारी असलेल्या या पिढीला असत्याचा सामना करावा लागणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे,अशी प्रतिक्रिया श्री.केळेकर यांनी यावेळी दिली. गोवा कोकणी अकादमीचे माजी अध्यक्ष पुंडलिक नायक, हेमा नायक, माधवी सरदेसाई यांनीही या उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शवला.
कालपासून आपल्या पालकांसह बेमुदत उपोषणाला बसलेले शिक्षक रात्रभर याठिकाणी उघड्यावरच झोपले. उपोषणकर्त्यांत महिलांचा समावेश आहे पण इथे संरक्षणासाठी पाठवण्यात आलेल्या पोलिसांत महिला पोलिस शिपाई उपस्थित नसल्याची माहिती देण्यात आली. दोन दिवस उपाशी असलेल्या या शिक्षकांसाठी उद्याचा दिवस हा अत्यंत आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वदा गावकर बेशुद्ध पडल्याने तिला लगेच "१०८' रुग्णवाहिकेने गोमेकॉत हालवण्यात आले. याठिकाणी उपचार घेतल्यानंतर ती लगेच संध्याकाळी परत आली व तिने पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली.
मुख्यमंत्री नकाराशी ठाम
राष्ट्रवादी युवाध्यक्ष राजन घाटे यांनी पुढाकार घेऊन या शिक्षकांच्या एका शिष्टमंडळाची मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री कामत यांनी ही निवड योग्य पद्धतीने झाली नसल्याचे त्यांना सुनावले. यापूर्वी आयोगाने केलेल्या शिफारशी अनेकवेळा सरकारने फेटाळल्या आहेत, त्यामुळे ही यादी फेटाळण्यात काहीही गैर नाही, असेही त्यांनी सुनावल्याची माहिती मिळाली आहे. ही निवड कशी योग्य नाही, असे विचारले असता मुख्यमंत्र्यांनी या शिक्षकांशी अधिक बोलणे टाळले व त्यांना परत पाठवून दिले, असेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, रवींद्र केळेकर याठिकाणी उपस्थित राहिल्याने मुख्यमंत्री कामत यांची बरीच गोची झाल्याची चर्चा आहे.श्री. केळेकर यांनी त्यांच्याशी फोनवरून बोलण्याचे प्रयत्न केला पण त्यांनी आपण बैठकीत असल्याचे सांगून तो फोन बंद केला, अशीही माहिती मिळाली. याप्रकरणी कायद्याच्या कचाट्यात सापडू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी ऍडव्होकेट जनरलांशी चर्चा केल्याचीही खबर असून या बैठकीला आणखी एक ज्येष्ठ नेते उपस्थित होते,अशीही खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.

No comments: