Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 23 October, 2009

महाराष्ट्र, हरयाणात कॉंग्रेसची सरशी

अरुणाचलमध्येही पूर्ण बहुमत

मुंबई, दि. २२- महाराष्ट्रासह हरयाणा व अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसची सरशी झाली आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेन युतीला पुन्हा एकदा विरोधक म्हणूनच भूमिका बजावावी लागेल.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बहुमत संपादन करण्याएवढ्या जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेच्या हातून विरोधी पक्षनेतेपद निसटले असून ही संधी आता भाजपला लाभली आहे.
२८८ पैकी २८७ जागांचे निकाल पाहता, कॉंग्रेसला ८१, राष्ट्रवादीला ६२, शिवसेनेला ४४, भाजपला ४६, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १३ आणि तिस-या आघाडीला ११ जागा मिळाल्या आहेत, तर तब्बल ३० जागांवर अपक्ष आणि इतर पक्षांनी बाजी मारली आहे.
मुंबई-ठाण्यात मनसेच्या कामगिरीमुळे भाजप-शिवसेना युतीला मोठाच फटका बसला. हेच चित्र यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही दिसले होते. त्याचा "रिप्ले' नव्याने आज दिसून आला. दोन मराठी माणसांच्या भांडणात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा लाभ झाला होता. तेच समीकरण विधानसभा निवडणुकीच्या निकालातही पाहायला मिळाले. सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीच्या महोत्सवात कोण बाजी मारणार, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. आघाडी सरकारच्या १० वर्षांच्या अपयशी कारभारावर जोरदार हल्लाबोल करत युतीच्या नेत्यांनी सत्तांतराची साद घातली होती. पण त्याला जनतेने तितकासा प्रतिसाद दिला नाही आणि जिथे दिला तिथे मनसेने त्यांचा घात केला. म्हणूनच, १६९ जागा लढवणा-या शिवसेनेला ४४ जागांवर समाधान मानावे लागले.
गेल्या विधानसभेत त्यांच्या खात्यावर ५६ जागा होत्या. मनसेला १३ जागा मिळाल्या असल्या तरी जवळपास २५ जागांवर युतीचे उमेदवार मतविभाजनामुळे पडले आहेत. भाजपच्या जागाही ५४ वरून ४६ वर आल्या आहेत, पण हा आकडा सेनेपेक्षा जास्त असल्यानं ते आता विरोधी पक्षनेतेपदावर दावा करू शकतील.
आघाडी आरामसे !
एकीकडे मनसेमुळे युतीला शंभरी सुद्धा गाठता आली नसताना कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बहुमत मिळवल्यात जमा आहे. गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या आघाडीनं तिस-यांदा विजय मिळवत हॅटट्रिक केली आहे. कॉंग्रेसला मिळालेल्या ८१ जागा आणि राष्ट्रवादीच्या ६२ जागा ही बेरीज १४३ इतकी होते. अजून एक जागा जाहीर होणं बाकी आहेच, पण ती मिळाली नाही तरी अनेक अपक्ष त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करणे त्यांच्यासाठी सोपे काम झाले आहे. फक्त मुख्यमंत्री कोण, यावरून आता धुमशान रंगणार आहे.
दरम्यान, गेल्या विधानसभेच्या तुलनेत कॉंग्रेसने ७० जागांवरून ८१ जागांवर झेप घेतली आहे, तर राष्ट्रवादी ७३ वरून ६२ वर गडगडली आहे. अर्थात, लोकसभा निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर फेकला गेलेला राष्ट्रवादी दुस-या क्रमांकावर आला, ही त्यांच्यासाठी समाधानाची बाबच म्हणावी लागेल.
तिसरी आघाडी पिछाडीवर
मनसेच्या तुलनेत तिस-या आघाडीचा पर्याय दाखवणा-या रिपब्लिकन डावी लोकशाही समितीला या निवडणुकीत फारशी चमक दाखवता आलेली नाही. रिडालोसला जेमतेम ११ जागा मिळाल्या आहेत. तर जवळपास ३० जागांवर अपक्ष व बंडखोर उमेदवार निवडून आले आहेत.

हरयाणा आणि अरुणाचल
सहा महिन्यांपूर्वी केंद्रात सत्तेवर आलेल्या कॉंग्रेसप्रणित आघाडी सरकारची जादू अद्याप ओसरलेली नाही. महाराष्ट्रापाठोपाठ हरयाणा व अरूणाचल प्रदेशामध्येही कॉंग्रेसच पुन्हा सत्तेवर आल्याने आम आदमी का हाथ , कॉंग्रेस के साथ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र , हरयाणा व अरूणाचल प्रदेश या तीन राज्यांमध्ये गेल्या १३ मे रोजी विधानसभा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. तिन्ही ठिकाणी पुन्हा एकदा कॉंग्रेसचेच सरकार सत्तेवर आले आहे. हरयाणातील ९० पैकी ३६ जागांवर कॉंग्रेस विजयी झाली आहे तर चार जागांवर आघाडीवर आहे. या उल्लेखनीय यशामुळे मुख्यमंत्रिपदावर पुन्हा एकदा भूपिंदरसिंग हूडा विराजमान होण्याची शक्यता आहे.
भारतीय राष्ट्रीय लोकदल राज्यात दुस-या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. लोकदल ३१ जागांवर विजयी झाले असून दोन जागांवर आघाडीवर आहे. सहा अपक्ष उमेदवार विजयी झाले असून एक आघाडीवर आहे. हरयाणा जनहित कॉंग्रेसचे सहा उमेदवार विजयी झाले. भाजपने चार जागांवर विजय मिळवला. बसपचा एक उमेदवार विजयी झाला आहे तर अन्य उमेदवारांपैकी एक विजयी झाला.
अरुणाचलमध्येही सत्तेचा मार्ग सुकर
ईशान्येतील प्रमुख राज्य असल्यामुळे अरुणाचल प्रदेशच्या निवडणुकीला बरेच महत्त्व होते. तिथे ६० पैकी ४० जागांवर विजय मिळवल्याने कॉंग्रेसचा सत्तेचा मार्ग सुकर केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस , तृणमूल कॉंग्रेसने प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळवला आहे तर भाजपने दोन जागांवर विजय मिळवला. एक अपक्ष आणि तीन अन्य उमेदवार विजयी झाले आहेत.

महाराष्ट्रातील पक्षनिहाय निकाल
एकूण जागाः २८८
जाहीर जागाः २८७
कॉंग्रेस - ८१
राष्ट्रवादी कॉंग्रेस - ६२
शिवसेना - ४४
भाजप - ४६
मनसे - १३
तिसरी आघाडी - ११
इतर - ३०

हरयाणातील पक्षनिहाय निकाल
पक्ष जागा
कॉंग्रेस ४०
इंडियन नॅशनल लोकदल ३१
हरियाणा जनहित कॉंग्रेस ०६
भारतीय जनता पक्ष ०४
बहुजन समाज पक्ष ०१
शिरोमणी अकाली दल ०१
इतर ०७
एकूण ९०


अरुणाचलातील पक्षनिहाय निकाल
एकूण जागा : ६० यातील ३ अविरोध
निकाल घोषित : ५७
कॉंग्रेस ४०
भाजप ०२
राष्ट्रवादी कॉंग्रेस ०५
ऑल इंडिया तृणमूल कॉंग्रेस ०५
इतर ०५
एकूण ५७

No comments: