Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 22 October, 2009

जुवारी पुलावर बॉंबची अफवा

वास्को, दि. २१ (प्रतिनिधी): उत्तर व दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या जुवारी पुलाखाली बॉंब ठेवण्यात आल्याची माहिती आज दुपारी वेर्णा पोलिसांची धावपळ उडाली. बॉंब असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बॉंब निकामी पथकाच्या साह्याने जुवारी पुल तसेच आजूबाजूच्या सर्व परिसरात तपासणी केली; मात्र ही केवळ अफवा असल्याचे शेवटी स्पष्ट झाले. वेर्णा पोलिस सध्या यासंदर्भात खोटी माहिती देणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या शोधात आहेत.
आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एका वृत्तपत्र पत्रकाराला जुवारी पुल परिसरात बोंब ठेवण्यात आल्याची माहिती एका अज्ञाताने दिल्याने त्याने वेर्णा पोलिस स्थानकावरील पोलिस उपनिरीक्षक जिवबा दळवी यांना याची माहिती दिली. दक्षिण व उत्तर गोव्याला जोडणाऱ्या पुलाच्या परिसरात बॉंब असल्याचे कळताच वेर्णा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. बॉंब निकामी पथकाच्या साह्याने पुलाच्या खाली, कुठ्ठाळी परिसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेण्यात आला. शेवटी हा अफवेचा प्रकार असल्याचे पोलिसांना जाणवले.
गेल्या काही दिवसांपूर्वी मडगाव येथे झालेला स्फोट व सांकवाळ येथे स्फोटक पदार्थ सापडल्यामुळे गोमंतकीय जनता आधीच भीतीच्या छायेखाली वावरत असताना या अफवेने पुलावर धावपळीचे वातावरण निर्माण झाले. या पुलावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात, बॉंब निकामी पथकाच्या उपस्थितीमुळे वाहनचालकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. शेवटी अज्ञाताने अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्पुरता का होईना सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, सदर प्रकाराबाबत वेर्णा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक जिवबा दळवी यांच्याशी संपर्क साधला असता महेश नावाच्या एका पत्रकाराला जुवारी पुलाच्या परिसरात बॉंब ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तपासणी केल्यानंतर हा अफवा उठवण्याचाच प्रकार असल्याचे उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकाराला कोणी व कुठून संपर्क केला याबाबत तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments: