Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 22 October, 2009

गोवा एक्सप्रेसला अपघात

मथुरेजवळ घटना, २२ ठार अनेक जखमी
मथुरा, दि. २१ : दिल्लीकडे जाणाऱ्या गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसने मथुरेनजीक मेवाड एक्सप्रेसला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान २२ जण ठार, तर अनेक जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना मथुरा आणि वृंदावनच्या स्थानकांच्या दरम्यान आज पहाटेच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, मेवाड एक्सप्रेसमधील प्रवाशाने साखळी ओढल्याने ती मथुरेनजीक उभी होती. या गाडीला वेगाने येत असलेल्या गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसने जोरदार धडक दिली. पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी हा अपघात घडला.
दोन गाड्यांची टक्कर झाली तेव्हा सर्वच डब्यांमधील प्रवासी गाढ झोपेत होते. वरच्या बर्थवरील लोक, तसेच सामान खाली पडले आणि एकमेकांच्या अंगावर पडल्याने सारेच खडबडून जागे झाले. अपघात झाल्याचे समजताच डब्यातील लोकांनी पळापळ सुरू केली. त्यातच चेंगराचेंगरीही झाली. लहान मुले आणि महिलांचा टाहो आजूबाजूच्या परिसरातही ऐकू येत होता. मेवाड एक्सप्रेसच्या ज्या डब्याचे सर्वाधिक नुकसान झाले तेथे अडकलेल्या प्रवाशांना काढण्यासाठी अक्षरश: गॅस आणि फोम कटर याचा वापर करावा लागला. त्यातून अनेक महिला आणि बालकांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपघाताची भीषणता पाहून मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले होते.
या अपघातामुळे मथुरेच्या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. एका बाजूची वाहतूक काही तासातच सुरळीत झाली. पण, अजूनही बऱ्याच गाड्यांचे मार्ग या अपघातामुळे प्रभावित आहेत.
प्राथमिक तपास अहवालानुसार, गोवा एक्सप्रेसच्या चालकाने सिग्नलकडे लक्ष दिले नाही, असे लक्षात आले आहे. त्याचे गाडीच्या वेगावरही नियंत्रण नव्हते. त्यामुळे मेवाड एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्याला जबर हादरा बसला. त्यात किमान २२ जण ठार झाले तर जखमींचा आकडा २० असल्याचे सांगितले जात आहे. पण, प्रत्यक्षात वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये जखमींना हालविल्याने त्यांचा निश्चित आकडा कळू शकलेला नाही.
रेल्वेतर्फे नुकसान भरपाईची घोषणा
केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत. सोबतच मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. प्रत्येक गंभीर जखमीला १ लाख रुपये तर किरकोळ जखमा झालेल्यांना प्रत्येकी १० हजार रुपये रेल्वेतर्फे दिले जाणार आहेत. याशिवाय उत्तरप्रदेशचे कृषिमंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी मृतांच्या नातेवाइकांना १० लाख रुपये आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचेही जाहीर केले आहे.

No comments: