Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 19 October, 2009

सुकूरची "ती 'तरुणी गावकरवाडा डिचोलीची

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) - सुकूर येथे डोक्यावर दगड घालून खून करण्यात आलेल्या त्या तरुणीची ओळख पटली असून ती डिचोली येथे राहणारी शर्मिला मांद्रेकर (२५) असे असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागाच्या निरीक्षक सुनीता सावंत यांनी दिली. तर, खोर्जुवे येथे अर्धवट जळलेल्या अवस्थेत मिळालेल्या त्या तरुणीची अद्याप ओळख पटलेली नसून तिचे वेर्णा औद्योगिक वसाहतीकडून अपहरण करण्यात आल्याची माहिती या खूनसत्रातील संशयित आरोपी चंद्रकांत तलवार आणि सायरन रोड्रिगीस यांनी तपास अधिकाऱ्याला दिली आहे.
दि. १० रोजी शर्मिला हिचे गावकरवाडा धबधबा येथून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिच्या अंगावर असलेली सोनसाखळी, पर्स व मोबाईल काढून सुकूर येथे तिचा खून करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दि. १० ऑक्टोबरपासून शर्मिला बेपत्ता झाल्याने सर्वत्र तिची शोधाशोध सुरू केली, तर १२ ऑक्टोबर रोजी तिचा भाऊ बुधाजी मांद्रेकर यांनी डिचोली पोलिस स्थानकात बेपत्ता असल्याची नोंद केली होती. ती एका लहानशा लाडू, चकली बनवण्याच्या फॅक्टरीत कामाला जात होती.
चंद्रकांत आणि सायरन हे दोघे पर्यटक असल्याचे भासवून रस्त्यावर जाणाऱ्या तरुणीकडे तेथून जवळ असलेल्या कोणत्याही ठिकाणाचा पत्ता विचारत असत. त्यानंतर तो रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने त्यांना गाडीत बसवून गाडीतच त्यांचा खून केला जात असे, अशी माहिती उघडकीस आली आहे. हे सर्व खून केवळ पैशांसाठी केले गेलेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून यामागे अजून काही कारण आहे का, याचा पोलिस शोध घेत आहेत.
खोर्जुवे येथे अपहरण केलेली महिला ही हिंदीत बोलत होती तर तिचा नवरा कळंगुट येथे नोकरीला असल्याने ती कळंगुटला जाण्यासाठी वेर्णा बस स्थानकावर बसची वाट पाहत थांबली होती. यावेळी हे दोघे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याठिकाणी पोचले आणि पणजीच्या दिशेने जात असल्याचे सांगून तिलाही बरोबर घेतले. यावेळी वाटेतच तिचा खून करून खोर्जुवे येथे तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली, अशी माहिती पोलिसांनी दिली. कळंगुट येथे नोकरीला असलेल्या त्या महिलेच्या नवऱ्याचा शोध घेण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
याविषयीचा अधिक तपास निरीक्षक सुनीता सावंत करीत आहे.

No comments: