Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 20 October, 2009

खूनसत्रप्रकरणी दोन महिलांना अटक


खुनात प्रत्यक्ष सहभाग

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)- मेरशी, वेर्णा, सुकूर व खोर्जुवे खूनप्रकरणात आज पोलिसांनी मुख्य आरोपी चंद्रकांत तलवार याची पत्नी ग्रेश्मा तलवार हिला मुंबई येथून अटक केली तर, सायरन याच्या अल्पवयीन प्रेयसीलाही पणजी येथून ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही महिलांचा या खूनसत्रात सहभाग असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चारही महिलांच्या अपहरणानंतर त्यांचे वाहनातच खून करण्यात आले. त्यावेळी या दोन्ही संशयित महिला प्रत्यक्ष वाहनात हजर होत्या हे सिद्ध झाले असल्याने त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आल्याची माहिती पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी दिली. या दोन्ही महिलांनी आपल्या गुन्ह्याचा कबुली जबाब दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चारही जणींचा खून करून त्यांच्या अंगावरील दागिने गोव्यातील एका सराफाला विकण्यात आले होते. ते सोने चंद्रकांत याची पत्नी ग्रेश्मा हिने विकले होते, त्यानंतर त्यांनी मुंबईत पळ काढला होता. पोलिसांनी ग्रेश्मा हिच्याकडून काही रोख रक्कम जप्त केली आहे, असे श्री. यादव यांनी सांगितले. त्याचप्रमाणे महिलांचे अपहरण करून त्यांचा मृतदेह अज्ञात स्थळी हालवण्यासाठी वापरण्यात आलेली "झेन' व "आल्टो' ही दोन वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या खुनातील चार पैकी तीन महिलांची ओळख पटली असून खोर्जुवे येथे सापडलेल्या महिलेचे नाव मालती यादव असे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. परंतु, अद्याप तिच्या कुटुंबाबद्दल कोणतीही माहिती पोलिसांच्या हाती आलेली नाही. या टोळीने सदर महिलेचे अपहरण वेर्णा बसस्थानकावरून केले होते. त्यावेळी त्या वाहनात सायरन याची अल्पवयीन प्रेयसी वाहनात उपस्थित होती. वाहनात मुली असल्याचे पाहून लिफ्ट मागणाऱ्या महिला सहजपणे जाळ्यात ओढल्या जात होत्या, आणि नेमका त्याचाच फायदा ही टोळी उठवत होती.
सायरन हा वाहन चालवत होता तर त्याची प्रेयसी पुढच्या सीटवर बसून महिलांना पत्ता विचारण्याचे काम करीत होती. ती महिला पत्ता दाखवण्याच्या निमित्ताने किंवा लिफ्ट मागून आपल्या नियोजित स्थळी जाण्यासाठी त्या वाहनाच्या मागच्या सीटवर बसल्यावर तिचा गळा आवळून खून करण्याचे काम चंद्रकांत करीत होता. महिलेचा प्राण जाईपर्यंत तिघेही त्याच वाहनात बसून राहत असत, रात्र झाल्यानंतर काळोखाचा फायदा घेऊन मृतदेह अज्ञातस्थळी नेऊन जाळण्यात येत असे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
एविटाच्या खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात
एविटा या टोळीला बऱ्यापैकी ओळखत होती. मग एविटाचा खून का आणि कशासाठी करण्यात आला हे स्पष्ट होते नाही. अन्य तिघा महिलांचे खून केवळ पैशांसाठी करण्यात आल्याचे कारण पोलिसांनी पुढे केले असले तरी एविटाच्या अंगावर कोणतेही दागिने नव्हते. तिच्या अंगावर असलेली सोनसाखळी यापूर्वीच सायरन याच्या मित्राने सहा महिन्यांपूर्वी चोरली होती. मग एविटाचा खून का आणि कशासाठी करण्यात आला, या प्रश्नाचे उत्तर अद्याप तिच्या कुटुंबीयांना मिळालेले नाही.

ग्रेश्माचा मुली पुरवण्याचा धंदा?
मुंबईहून गोव्यात मुली पुरवण्याचे काम ग्रेश्मा करत होती तर, तिचा नवरा चंद्रकांत त्या मुलींना येथे आणून त्यांच्याकडून "धंदा' करून घेता होता. या मुली गोव्यात आणण्यासाठी दलालांना आगाऊ पैसे द्यावे लागतात, ते देण्यासाठी या टोळीकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी महिलांचे मुडदे पाडून त्यांचे दागिने विकून पैसे जमवण्याची योजना आखली, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यामुळे या सर्व प्रकरणामागे "सेक्स रॅकेट' असल्याचे स्पष्ट होत आहे.

पोलिस पथकाची कामगिरी
संशयितांनी गोव्यात खून करून मुंबईत पळ काढल्याची माहिती मिळताच पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी गुन्हा अन्वेषण विभागातील उपनिरीक्षक निनाद देऊलकर, फोंडा पोलिस स्थानकात असलेले उपनिरीक्षक दीपक पेडणेकर व पोलिस शिपाई ब्रिजेश नाईक यांना त्वरित आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. चंद्रकांत तलवार आणि सायरन रॉड्रिगीस यांना अटक करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या पथकावर सोपवण्यात आली. यापूर्वी दीपक पेडणेकर यांनी मुंबईतून कुविख्यात गुंड मानशियो याच्या मुसक्या आवळून त्याला गोव्यात आणले होते. या पोलिस अधिकाऱ्यांचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून कौतुक केले जात आहे.

No comments: