Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 22 October, 2009

सनातनवर बंदी कठीण: मुख्यमंत्री

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबतचा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित झालाच नाही. एखाद्या संस्थेवर बंदी घालावयाची असल्यास त्यासाठी योग्य प्रक्रिया अवलंबावी लागते. या घटनेत सनातनचा सहभाग असल्याचे सबळ पुरावे अद्याप सापडले नाहीत. केवळ तोंडी मागणी करणे व प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणे यात फरक असतो, अशा शब्दात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी संस्थेवरील बंदीबाबतच्या विषयाला पूर्णविराम दिला.
आज पर्वरी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री कामत यांनी आपल्या मंत्रिमंडळ सहकाऱ्यांना मडगाव येथील स्फोटाप्रकरणी माहिती दिली. आपण प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्याने व इतर अनेक गोष्टी आपल्याला माहिती असल्याने आपणच या प्रकरणाची सखोल माहिती देणे पसंत केले, असेही त्यांनी सांगितले.
मडगाव येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या स्फोटाची चौकशी "सीबीआय'कडे सोपवण्याची विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची मागणी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज फेटाळून लावली. उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा विभागाचे अधीक्षक ओमप्रकाश कुडतरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष चौकशी पथकाला पूर्ण स्वतंत्र देण्यात आले आहे. हे प्रकरण गोवा पोलिस अत्यंत व्यावसायिक पद्धतीने हाताळणार असल्याचेही कामत यावेळी म्हणाले. गोवा पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांची मदत घेतली जात आहे. पोलिस या प्रकरणाच्या तळाशी जाणार असून या संपूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला जाईल, असेही ते म्हणाले.
आज मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री कामत यांच्याबरोबर गृहमंत्री रवी नाईक येतील, अशी अपेक्षा पत्रकार बाळगून होते. पण प्रत्यक्षात गृहमंत्री आलेच नाहीत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे मुख्यमंत्री कामत यांच्याबरोबर यावेळी आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
आपल्याला लक्ष्य बनवण्याचा इरादा असू शकेल
गोवा प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते ऍड. रमाकांत खलप यांनी मडगाव येथील झालेला स्फोट हा मुख्यमंत्री कामत यांना लक्ष्य बनवण्यासाठीच होता काय, याचा तपास लावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. मुख्यमंत्री कामत यांनीही ऍड. खलप यांच्या या वक्तव्याला पुष्टी देत ती शक्यता नाकारता येणार नाही, असे सांगितले. पोलिस त्या दृष्टीनेही तपास करणार, असे ते म्हणाले. नरकासूर स्पर्धेला हजारोंच्या संख्येने लोक जमतात व त्यावेळी जर हा स्फोट झाला असता तर अनर्थ घडला असता, असेही ते म्हणाले.

No comments: