Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 22 October, 2009

'बिट्स पिलानी'त काविळीचे थैमान

१३१ विद्यार्थ्यांना बाधा
वास्को, दि. २१ (प्रतिनिधी): झुआरीनगर, वेर्णा येथे असलेल्या बिट्स पिलानी तांत्रिक महाविद्यालयाच्या ४८ विद्यार्थ्यांना कावीळ झाल्याची घटना ताजी असतानाच आज तब्बल १३१ विद्यार्थ्यांना या साथीने ग्रासल्याचे उघडकीस आले आहे. महिन्याभरापूर्वीच महाविद्यालय १६ दिवसांसाठी बंद ठेवून साथ फैलावण्याचे कारण शोधण्याची वेळ प्रशासनावर आली होती; महाविद्यालय पुन्हा खुले झाल्यानंतर केवळ नऊ दिवसांतच घरी परतण्याची पाळी १३१ विद्यार्थ्यांवर आली आहे. या प्रकारामुळे येथे भीतीचे वातावरण पसरले आहे.
भारतातील वेगवेगळ्या राज्यातून मिळून २४०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. एका महिन्यापूर्वी (२५ सप्टेंबर) महाविद्यालयातील ४८ विद्यार्थ्यांना अचानक कावीळ झाल्याने त्यामागचे कारण शोधून काढण्यासाठी तसेच अन्य विद्यार्थ्यांना याची बाधा होऊ नये या उद्देशाने महाविद्यालय १६ दिवसांसाठी बंद ठेवून सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले होते. भारतातील नामांकित संस्थांमध्ये गणल्या जाणाऱ्या संस्थेच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला होता. सुटी संपवून १२ ऑक्टोबर रोजी सर्व विद्यार्थी महाविद्यालयात परतले होते. यानंतर आज २१ रोजी काही विद्यार्थ्यांमध्ये या साथीची लक्षणे आढळून आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी १३१ विद्यार्थ्यांना कावीळ झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, यासंदर्भात बिट्स पिलानीचे अधिकारी आर. पी. प्रधान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गेल्या एका महिन्याच्या कालावधीत १७९ विद्यार्थ्यांना कावीळ झाल्याची माहिती दिली. एका महिन्यापूर्वी ४८ विद्यार्थ्यांना कावीळ झाली होती. आता अन्य १३१ जणांना कावीळ झाल्याचे त्यांनी सांगितले. या साथीचा फैलाव होण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगून डॉ. प्रधान यांनी, काविळीच्या जंतूंनी गेल्या महिन्यातच या विद्यार्थ्यांच्या शरीरात प्रवेश केला असावा आणि आता त्याची तीव्रता वाढली असावी, असा कयास व्यक्त केला.
सुरुवातीला ४८ विद्यार्थ्यांना कावीळ झाल्यानंतर येथील सर्व गोष्टींची तपासणी करण्यात आली होती. यावेळी सर्व काही ठीक होते. केवळ येथील एक "बोअर वेल' खराब असल्याच्या संशयामुळे बंद करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले. नव्याने आढळलेल्या १३१ विद्यार्थी रुग्णांना उपचारासाठी घरी पाठवण्यात आल्याचे सांगून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे त्यांनी सांगितले.
एवढ्या मोठ्या प्रमाणात काविळीचा प्रसार झाल्याने आरोग्य संचालकांच्या आदेशानुसार येथील ८० टक्के विद्यार्थ्यांना लस देण्यात आल्याची माहिती डॉ. प्रधान यांनी दिली. येथील खाद्यपदार्थ व इतर गोष्टींची तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
बिट्स मध्ये शिकणाऱ्या २४०० विद्यार्थ्यांपैकी १७९ जणांना थोड्याच दिवसांमध्ये कावीळ झाल्याने यामागचे नेमके कारण शोधून काढण्याची मागणी होत आहे. शिवाय या रोगाचा फैलाव झुवारीनगर परिसरात होण्याची शक्यता लक्षात घेऊन यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

No comments: