Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 21 October, 2009

बोरी साईबाबा मंदिरातून २ लाखांचा ऐवज लंपास

शिवनाथी, ढवळी येथील मंदिरातही चोरी

फोंडा, दि.२० (प्रतिनिधी) - फोंडा तालुक्यातील विविध भागातील देवालयात चोऱ्यांचे सत्र सुरू झाले असून केरी फोंडा येथील दोन देवालयातील चोऱ्यांनंतर बोरी येथील श्री साईबाबा, शिवनाथी शिरोडा येथील श्री शिवनाथ आणि ढवळी येथील श्री कमळेश्र्वर या तीन देवालयात चोऱ्या झाला आहेत. दरम्यान, बोरी येथील श्री साईबाबा देवालयातील दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळविल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोव्यातील पोलिस यंत्रणा मडगाव येथील बॉंबस्फोटानंतर संशयाच्या घेऱ्यात असलेल्या सनातन संस्थेच्या मागे हात धुऊन लागल्याने चोरट्यांचे फावले असून त्यांनी फोंडा तालुक्यात चोऱ्यांचे सत्र आरंभले आहे.
आवेडे बोरी येथील श्री साईबाबा देवस्थानाने सुरक्षा रक्षक ठेवला आहे. मात्र, दिवसभर एकच सुरक्षा रक्षक कामाला असल्याने रात्रीच्या वेळी त्याला डुलकी लागली आणि त्याच वेळेत चोरट्याने चोरी करण्यात यश मिळविले. देवालयाचा मागील बाजूला दरवाजा तोडून चोरट्याने देवालयात प्रवेश केला. देवालयातील श्री साईबाबा यांच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट, चांदीच्या दोन पादुका, चांदीची पंचारत, एकारती, आसनाचे चांदीचे गोल व इतर चांदीच्या वस्तू चोरट्याने पळविल्या आहेत. चोरीस गेलेल्या वस्तूची किंमत अंदाजे दोन लाखांच्या आसपास आहे. यासंबंधी देवस्थान समितीचे अध्यक्ष सुभाष बाबया नाईक यांनी तक्रार दाखल केली आहे. देवालयातील चोरीच्या प्रकारामुळे भाविकात संतापाची लाट पसरली आहे. स्थानिक आमदार महादेव नाईक यांनी मंदिरातील चोरीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्वरित मंदिरात येऊन पाहणी केली. या चोरी प्रकरणाचा पोलिसांनी त्वरित छडा लावावा, अशी मागणी आमदार महादेव नाईक यांनी केली आहे.
शिवनाथी शिरोडा येथील श्री शिवनाथ देवालयात चोरट्याने चोरी करून दहा हजार रुपयांचा ऐवज पळविला आहे. चोरट्याने देवस्थानच्या छप्पराची कौले काढून आतमध्ये प्रवेश केला. मंदिरातील अभिषेक पात्र आणि चांदीची सर्प मूर्ती पळविली मात्र देवालयातील फंडपेटीला हात लावला नाही. यासंबंधी देवस्थान समितीतर्फे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ढवळी येथील श्री कमळेश्र्वर देवालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने देवालयात प्रवेश केला. मात्र, कोणत्याही वस्तूची चोरी केली नाही. फक्त काही देवालयातील वस्तूंची दिशा बदलली, असे पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी सांगितले.
पोलिसांनी या चोरीच्या प्रकरणानंतर तपास कामाला सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप ठोस माहिती हाती लागू शकली नाही. फोंडा भागात एखादी टोळी कार्यरत असल्याचा कयास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. देवालयातील चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर देवालयाच्या परिसरात रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्यात आली आहे. निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, उपनिरीक्षक निखिल पालेकर, उपनिरीक्षक परेश नाईक तपास करीत आहे. दरम्यान, केरी फोंडा येथील श्री वेताळ देवस्थान, विजयदुर्गा देवस्थान कार्यालयातील चोरी प्रकरणी पोलिस तपासात अद्याप यश प्राप्त झाले नाही.

No comments: