Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 20 October, 2009

साकोर्डे भागाला वादळाचा दणका

झाडांची पडझड, वाहतूक ठप्प, सुदैवाने जीवितहानी नाही

फोंडा, दि. १९ (प्रतिनिधी)- बोळकर्णे साकोर्डा भागात आज संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वादळाचा जोरदार तडाखा बसला. सोसाट्याचा वारा, जोडीला गडगडाटा, उन्मळणाऱ्या झाडांचे आवाज यामुळे वातावरणात भीती दाटून आली होती. ठिकठिकाणी झाडे मोडून पडल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. वा
कोणत्याही घरावर झाड पडल्याची अद्याप नोंद झालेली नाही, अशी माहिती सरपंच योगिता नाईक यांनी दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर पडलेली झाडे हटवण्याचे काम सुरू केले. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. दरम्यान एक दोन वाहनांवर झाडे पडल्याची माहिती मिळाली आहे.
वादळ आणि पाऊस यांनी असा काही रूद्रावतार धारण केला की झाडे अनेक ठिकाणी उन्मळून पडत होती. घरे पायापासून उखडून जाणार की काय अशी शोचनिय स्थिती काही क्षण निर्माण झाली होती, परंतु हे संकट झाडे मोडण्यावर आणि बागायतींची नासधूस होण्यावरच निभावले. पानस - साकोर्डा ते सातपात यादरम्यान अनेक ठिकाणी झाडे मोडून पडल्याने नंतर वाहतुकीच्या मार्गात अडथळे निर्माण झाले. सातपाल ते बोळकर्णे या दरम्यानही बरीच झाडे मोडून पडल्याने नुकसानी झाली. मधलावाडा, ते सुर्ल या दरम्यान काही ठिकाणी झाडांची वाताहत झाली. बोळकर्णे येथे एक मोठे झाड एका घराच्या शेजारीच पडले परंतु सुदैवाने जिवित किंवा मालमत्तेचे त्यात नुकसान झाले नाही. मागे बोळकर्णे येथे अशाच चक्रीवादळाच्या पट्ट्यात सुमारे दहा ते बारा वीजखांब कोसळल्याने मोठे नुकसान झाले होते. वादळात काही ठिकाणी बागायतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, साकोर्ड्याच्या सरपंच योगिता नाईक यांनी वादळासंदर्भात माहिती देताना थोडाच वेळ चाललेले परंतु अत्यंत तीव्र स्वरूपाचे हे वादळ होते असे सांगितले. या वादळात झाडांची मोठ्याप्रमाणात हानी झाली असून अनेक ठिकाणी झाडे मोडून किंवा उन्मळून पडल्याचे त्यांनी सांगितले. नुकसानीचा नेमका तपशीला उद्यापर्यंत स्पष्ट होईल असेही त्या म्हणाल्या. सुदैवाने या वादळात कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

No comments: