Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 19 October, 2009

स्फोटाची निःपक्षपाती चौकशी हवी - पर्रीकर

"कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा'

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) - दिवाळीच्या पूर्वसंध्येला मडगाव शहरात घडवून आणलेला स्फोट हे "भ्याडपणाचे कृत्य' आहे, अशी टीका करीत, गृहमंत्र्यांनी या घटनेचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न न करता पोलिसांना निःपक्षपाती चौकशी करण्याची संधी द्यावी आणि पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचा आरोपही त्यांनी केला.
आपण सत्ताधारी अथवा विरोधकांबद्दल बोलत नसून सत्ताधारी पक्षातीलच नेते आपल्याच मंत्रिमंडळाच्या सहकार्याविरोधात या घटनेचा राजकीय फायदा लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा ठपका श्री. पर्रीकर यांनी ठेवला. ते पणजी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेश सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर उपस्थित होते.
पोलिसांकडून कोणतीच ठोस माहिती न घेता गृहमंत्री माध्यमांसमोर मुक्ताफळे उधळत आहेत. नेमकी माहिती न घेता कोणाचेही नाव जाहीर करून त्याला राजकीय रंग देण्याचा खटाटोप करीत आहेत, तर काही वृत्तवाहिन्या न्यायाधीशांच्या भूमिकेत शिरून संशयितांना दोषी ठरवून त्यांची नावेही मुक्तपणे प्रसिद्ध करीत असल्याची टीका श्री. पर्रीकर यांनी केली.
ज्यांनी कोणी हा स्फोट घडवून आणला त्यांच्यापर्यंत तपासाची सूत्रे जाण्याची गरज आहे. यात जखमी झालेला योगेश नाईक याचा भाऊ सुरेश नाईक व मृत पावलेल्या मुलगोंडा पाटील याच्याबरोबर राहणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेण्याव्यतिरिक्त पोलिसांना तिसरा संशयित मिळालेला नाही. तसेच अद्याप कोणाला अटकही झालेली नाही, अशी माहिती श्री. पर्रीकर यांनी दिली.
कायदा व सुव्यवस्था कोलमडली..
गेल्या आठ दिवसांत कायदा व सुव्यवस्था पूर्ण कोलमडली असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना त्याची शरम वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली. राज्यात ७२ तासांत १० मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळले. पर्यटन व्यवसायाला याचा जबर फटका बसला आहे. अनेक हॉटेलांतील खोल्या रिकाम्या आहेत, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
स्फोटानंतरही स्पर्धा सुरूच
मडगावात स्फोट झाल्यानंतरही शहरात सुरू असलेल्या नरकासुर स्पर्धा पोलिस थांबवू शकले नाहीत. स्फोट झाल्यानंतर सर्वांत आधी गर्दी पांगण्याची जबाबदारी पोलिसांची असते. अनेकदा जेथे स्फोट होतो, तेथे नव्याने लगेचच स्फोटांची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही अतिमहनीय व्यक्तीने त्वरित घटनास्थळी जाऊ नये असा नियम आहे. तरीही मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पाहणीसाठी गेले होते. पोलिस सुरक्षा विभागाला याबाबत काय करायचे ते काहीच माहीत नव्हते, असा आरोप श्री. पर्रीकर यांनी केला.
राजकीय दबावामुळे तपास होत नाही...
गेल्या वर्षभरात मडगाव शहरात घडलेल्या काही घटना पाहता राजकीय दबावापोटी त्या दाबून टाकण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात होणाऱ्या मूर्तिफोड प्रकरणाचे काय झाले? यात पोलिसांनी कवेश गोसावी याला अटक केली होती. त्याच्या नार्को चाचणीचे काय झाले? मडगाव येथील मोती डोंगरावर तलवारींचा मोठा साठा पोलिसांना सापडला होता. राजकीय दबावामुळे १८ महिन्यानंतरही आरोपींवर आरोपपत्र दाखल होत नाही. दोषींवर आरोपपत्र दाखल होत नाही कारण त्या फाईलीवर गृहमंत्र्यांनी "वजन' ठेवले आहे. यात जे वाहन वापरण्यात आले होते, त्याला बनावट नंबरप्लेट बसवली होती. शेवटपर्यंत त्या वाहनाचा मालक पोलिसांच्या हाती लागलेला नाही. बनावट मतदार ओळखपत्र बनवून या वाहनाची नोंदणी करण्यात आली होती. तसेच यात "सिमी' या दहशतवादी संघटनेही हात असल्याने पोलिस या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊ शकले नाहीत, असे आरोप श्री. पर्रीकर यांनी केला.

No comments: