Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 4 May, 2009

राम शेवाळकर कालवश

नागपूर, दि. ३ - आपल्या वक्तृत्वाच्या सुरेल लकेरीवर अवघ्या मराठी जगताला झुलविणारे वाणीऋषी प्राचार्य राम शेवाळकर यांना रविवार दि. ३ मे रोजी देवाज्ञा झाली. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी विजया, पुत्र आशुतोष, सून मनीषा व अपाला नात व मोठा चाहता वर्ग आहे. रविवारी सकाळी उठल्यावर नित्याप्रमाणे त्यांचा दिनक्रम सुरू झाला. आंघोळ करून त्यांनी देवपूजा केली. पूजा झाल्यावर त्यांनी जप केला. जप झाल्यावर देवाला नमस्कार करून उठल्यावर त्यांच्या छातीत दुखायला लागले. तशी तक्रार त्यांनी पुत्र आशुतोष यांच्याजवळ केली. त्यानंतर ते वॉश बेसिनजवळ गेले आणि तेथेच कोसळले. त्यांचा मुलगा आशुतोष शेवाळकर यांनी ताबडतोब डॉ. उदय माहुरकर यांना भ्रमणध्वनी केला. घटनेची माहिती मिळताच डॉ. उदय माहुरकर, डॉ. हर्षवर्धन मार्डीकर व डॉ. मुंडले यांनी शेवाळकर यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांनी राम शेवाळकर यांना तपासले. परंतु तत्पूवीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
शनिवार दि. २ मे रोजी कवी श्याम माधव धोंड यांच्या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभाला ते जाणार होते. मात्र, मुलगा आशुतोष याचा वाढदिवस असल्याने ते घरीच थांबले.
राम शेवाळकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच साहित्य, संस्कृती, सामाजिक, शैक्षणिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. यात केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, आ. देवेंद्र फडणवीस, नाट्य परिषद, नागपूर शाखेचे माजी अध्यक्ष मदन गडकरी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, उपाध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी, वामन तेलंग, ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार, श्रीपाद अपराजित, चंद्रकांत वानखेडे, महेश एलकुंचवार, ग्रेस, प्रा. वि. स. जोग, निरंजन कोकर्डेकर, नगर सेवक प्रकाश गजभिये, माधव सरपटवार, रवींद्र गंधे, संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंकज चांदे, सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, विवेक रानडे, सुप्रसिद्ध प्रवचनकार विवेक घळसासी, भा. ल. भोळे, बाबा नंदनपवार, सरदार अटल बहादूर सिंग, वासुदेवराव चोरघडे, श्याम धोंड, लोकनाथ यशवंत, मधुकर रोडे, रा. स्व. संघाचे पश्चिम क्षेत्र सहकार्यवाह डॉ रवींद्र जोशी, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.

No comments: