Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 6 May, 2009

आणखी तीन बेपत्ता महिलांप्रकरणी महानंद नाईकची कसून चौकशी

रिमांडसाठी आज न्यायालयात
फोंडा, दि.५ (प्रतिनिधी): फोंडा भागातील चार युवतीचे खून आणि एका युवतीवरील बलात्कार प्रकरणातील "सीरियल किलर' संशयित आरोपी महानंद रामनाथ नाईक (तरवळे शिरोडा) याच्या पोलीस कोठडीतील चौदा दिवसांचा रिमांड बुधवार ६ मे रोजी समाप्त होत असून संशयित महानंदला बुधवारी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात उभा केला जाणार आहे. दरम्यान, संशयित महानंद याची आमलाई, पंचवाडी आणि निरंकाल येथील युवतींच्या बेपत्ता प्रकरणांमध्ये कसून चौकशी केली जात आहे.
महानंद नाईक याला सुरुवातीला शिरोडा येथील एका युवतीच्या बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी चौदा दिवसांचा रिमांड येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने दिला. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना संशयित महानंद याने चार युवतींचे त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्यासाठी खून केल्याची कबुली दिली आहे. बलात्कार प्रकरणाच्या तपासानंतर आता संशयित महानंद याला कुर्टी फोंडा येथील कु. योगिता ऊर्फ बालिका नाईक हिच्या खून प्रकरणी अटक केली जाणार असून तपासासाठी न्यायालयाकडून रिमांड घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
संशयित महानंद नाईक याने आत्तापर्यंत चार युवतींच्या खुनांची कबुली देऊन खळबळ माजवली असून त्याला "सीरियल किलर' असे संबोधण्यात येत आहे. तो "कोल्ड ब्लडेड' गुन्हेगार असून शांतपणे आणि एकाच पद्धतीने युवतींना आपल्या जाळ्यात ओढून सोन्याच्या दागिन्यासाठी युवतीचे खून करणारा संशयित महानंद आणखी काही प्रकरणात गुंतलेला असण्याची शक्यता लोकांकडून व्यक्त केली जात आहे. चारही युवतीच्या खुनाच्या प्रकरणात साम्य आहे. एकाच पद्धतीने महानंद याने त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्याचा खून केला.
संशयित महानंद नाईक याने दर्शना नाईक हिचा १९९४ साली बांबोळी येथे खून केल्याची कबुली दिली आहे. १९९५ साली सप्टेंबरमध्ये खांडेपार येथे वासंती गावडे हिचा खून, २००७ साली सावर्डे येथे मापा पंचवाडी येथील कु. केसर नाईक आणि जानेवारी २००९ मध्ये नागझर कुर्टी येथील कु. योगिता नाईक हिचा सत्तरी तालुक्यातील मोर्ले येथे काजू बागायतीमध्ये नेऊन खून केल्याची कबुली दिली आहे. १९९५ साली वासंती गावडे बेपत्ता प्रकरणी संशयित महानंद नाईक याला अटक सुध्दा करण्यात आली होती. मात्र, त्याच वेळी संशयितांची पोलिसांनी कसून तपास केला असता तर हे मोठे प्रकरण घडले नसते, अशी प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यावेळी वासंती या युवतीचा खून करून सुध्दा प्रकरणातून सहीसलामत सुटल्याने "तो' निर्ढावला.
आत्तापर्यंत चार वर्षात चार खुनाची कबुली दिली आहे. त्यामुळे इतर काळात संशयित महानंद याने काय केले? यासंबंधी सविस्तर माहिती मिळविण्याची गरज निर्माण झाली असून पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. संशयित महानंद नाईक याचा या भागातील आणखी काही प्रकरणात सहभाग असल्याचे लोकात उघड बोलले जात आहे. त्यादृष्टीने तपास होण्याची गरज आहे. वाजे शिरोडा येथील एका महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी चौकशीची मागणी केली जात आहे. सदर महिलेच्या अंगावरील दागिने नाहीस झाले होते, असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. खाजोर्डा बोरी येथे दुर्गम भागात एका युवतीचा विवस्त्र मृतदेह आढळून आला होता. संशयिताची खून करण्याची पद्धतीला मिळताजुळता असा हा प्रकार असल्याने याचीही चौकशी होण्याची गरज आहे.
संशयित महानंद नाईक पोलिस अधिकाऱ्यांना स्वतःहा कोणतीही माहिती देत नाही. एखाद्या प्रकरणासंबंधी पोलिसांकडून विचारणा झाल्यास आपणाला त्या प्रकरणाची काहीच माहिती नसल्याचे सांगतो. केसर नाईक हिच्या खुनांची कबुली "केशव' हे नाव उच्चारल्याने संशयिताने दिलेली आहे. केसर नाईक हिच्या कुटुंबीयांच्या जबान्या पोलिसांनी नोंदवून घेत आहेत. पोलीस उपअधीक्षक सेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सी.एल. पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संजय दळवी, उपनिरीक्षक सचिन पन्हाळकर, उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, उपनिरीक्षक लक्षी आमोणकर, हेडकॉस्टेबल सोनू परब, सावळो नाईक याप्रकरणी तपास करीत आहेत.
-------------------------------------------------------
निष्पक्ष चौकशीची भाजपची मागणी
महानंद एकटाच होता की आणखी कोणी त्याचे साथीदार आहेत, त्याची निष्पक्ष चौकशी केली जावी, अशी मागणी भाजपने केली आहे. बंद करण्यात आलेल्या फाईली ही पोलिसांची निष्क्रियता असून, १९९५ साली पकडलेल्या महानंदला सोडण्यासाठी कोणत्या राजकीय नेत्याचे दडपण आले होते, तेही पोलिसांनी उघड करावे, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी म्हटले आहे.

No comments: